- विजय चोरमारे
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार असल्यासंदर्भातील वक्तव्य केले आहे. आणि वृत्तवाहिन्या त्याला गौप्यस्फोट म्हणून सादर करीत आहेत. खरेतर पृथ्वीराज चव्हाण जे सांगताहेत त्यात नवीन काहीच नाही. त्यांच्याशी संबंधित जो भाग आहे, की मंत्रिपदासंदर्भात चर्चेचा तेवढाच नवीन आहे. बाकी मुंडेंचा काँग्रेस प्रवेश डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे थांबला, ही गोष्टही जगजाहीर आहे आणि त्याचा वेळोवेळी अनेक माध्यमांतून उच्चार झाला आहे. फार जुन्या काळातल्या घटना नाहीत. दीड दशकांपूर्वीच्या तर घटना असल्यामुळे स्पष्टपणे आठवताहेत. अर्थात एखादा संदर्भ इकडे तिकडे होण्याची किंवा एखादा सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणी भर घातली तरी हरकत नाही. (Gopinath Munde Congress Controversy)
मनमोहन सिंग यांचा विरोथ
गोपीनाथ मुंडे तेव्हा भाजपचे लोकसभेतील उपनेते होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मते, विरोधी पक्ष फोडणे योग्य नाही. मी पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्या उपनेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश टळला होता. फक्त पंधराएक वर्षांचाच काळ गेला आहे. पण विरोधी पक्ष फोडणे योग्य नाही, असे म्हणणारे पंतप्रधान इथं होऊन गेले. त्याच्याही दहा वर्षे आधी, भ्रष्टाचाराच्या मार्गानं मिळालेल्या सत्तेला चिमट्यानंही स्पर्श करणार नाही, असं अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते.
आणि आता भ्रष्ट मार्गानं विरोधी पक्ष फोडण्यातच मर्दमुकी मानणारे नेते सत्तेत आहेत. भीती घालून, अमिषं दाखवून पक्षात किंवा आघाडीत आलेल्या बाहेरच्या खासदारांना, घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे, असं निर्लज्जपणे सांगणारे पंतप्रधान आहेत. आणि पक्षफोडीसाठी हुडी घालून बाहेर पडत होतो, अशा बढाया मारणारे मुख्यमंत्री आहेत. राजकारण किती बदललंय, हे या दोन घटनांवरून दिसून येतं. (Gopinath Munde Congress Controversy)
तर त्यावेळचा सीन काय होता बघूया.
प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यावर गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणातला आधार गेला. मुंडे हे लोकनेते आणि नितीन गडकरी हे संघाच्या आतल्या गोटातले आणि मागच्या दाराने निवडून येणारे नेते होते. गडकरी यांनी पहिली निवडणूक २०१४ मध्ये लढवली, हे पाहिल्यावर त्याची कल्पना येते. तरीही संघातील ताकदीच्या बळावर मुंडे यांना गडकरी वारंवार उपद्रव करीत होते. दोघांमध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगत होते. प्रमोद महाजन होते तोपर्यंत महाराष्ट्र भाजपमध्ये अंतिम शब्द मुंडे यांचाच होता.
त्यानंतर परिस्थिती बदलत गेली. गडकरींचा प्रभाव वाढत गेला. मुंडे यांचे पक्षात खच्चीकरण होऊ लागले. गोपीनाथ मुंडेंची अस्वस्थता वाढत गेली. प्रदेश पातळ्यांवरील नियुक्त्यांमध्येही मुंडे यांच्या समर्थकांना डावलले जाऊ लागले होते. प्रदेशाध्यक्षपदी गडकरी समर्थक सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली. विधान परिषदेतील नेतेपदी पांडुरंग फुंडकर यांना बाजूला करून विनोद तावडे यांना नेमण्यात आले. आणि पुणे शहराध्यक्षपदी मुंडेसमर्थक योगेश गोगावले यांना डावलून गडकरी समर्थक विकास मठकरी यांची नियुक्ती करण्यात आली.
पवार, ठाकरेंशीही चर्चा
या घटनांमुळे मुंडे यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतला. ज्या महाराष्ट्र भाजपला शेठजींच्या कोठीवरून खेड्यापाड्यांत, वाड्यावस्त्यांवर नेण्यासाठी रक्ताचे पाणी केले, तिथे एखाद्या शहराचा अध्यक्षही आपल्या मर्जीने होत नसल्याचे पाहून मुंडे व्यथित झाले. जिथे फुले वेचली तिथे गोव-या वेचण्याची वेळ आल्यामुळे व्यथित झालेल्या मुंडे यांनी आपल्या भात्यातील शेवटचे अस्त्र काढले, ते बंडखोरीचे. मुंडे यांनी शरद पवार यांची भेट घेऊनही चर्चा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली.
याच दरम्यानच्या काळात पृथ्वीराज चव्हाण सांगताहेत त्या घटना घडत होत्या. काँग्रेसचा रस्ता बंद झाल्यानंतर पुन्हा मुंडे दिल्लीला जाऊन भाजपच्या केंद्रीय नेत्यांना भेटले. त्यात प्रामुख्याने लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांचा समावेश होता. सुषमा स्वराज यांनीही त्यांची समजूत काढली. मुंडे यांच्या मनाप्रमाणे काही नियुक्त्या झाल्या आणि हे बंड शमले. यानिमित्ताने मुंडे यांनी पक्षातील आपला खुंटा अधिक मजबूत केला होता. (Gopinath Munde Congress Controversy)
प्रमोद महाजनोत्तर कालखंडात मुंडे भाजपमध्ये बाजूला फेकलेले नेते होते. पुढे गडकरी यांचे पूर्ती उद्योगसमूहाचे प्रकरण आले आणि गडकरी यांच्या राजकीय कारकीर्दीला त्याचा फटका बसला. राष्ट्रीय राजकारणात गडकरी पुन्हा थोडे मागे ढकलले गेले आणि पुन्हा मुंडे आक्रमकपणे पुढे आले.
मुंडेंनीच फडणवीसांना पुढे आणले
राजनाथसिंह अध्यक्ष झाले तरीसुद्धा मुनगंटीवारांनाच आणखी एक टर्म द्यावी, असा गडकरींचा आग्रह होता. तसे घडल्यास आपण निवडणुकीत प्रचारच करणार नाही, असा इशारा मुंडेंनी दिला होता. भारतीय जनता पक्षात गोपीनाथ मुंडे हेच एकमेव जनाधार असलेले नेते आहेत, त्यांनी पक्ष सोडल्यास भाजपचे मोठे नुकसान होईल, याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला जाणीव होती. राजनाथ शिंह राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरही मुनगंटीवार यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी मुदतवाढ देण्याची गडकरी गटाची मागणी होती. परंतु मुंडे यांनी तो प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. मुनगंटीवार नको, तर मग विनोद तावडेंना प्रदेशाध्यक्ष करा, असा गडकरी गटाचा प्रस्ताव होता. त्यावेळी मुंडे यांनी रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे पुढे केली. २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि मुंडे यांनी गडकरी यांच्या नागपुरातच त्यांच्याविरोधात एक नवा मोहरा उभा केला. (Gopinath Munde Congress Controversy)
गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या नेतृत्वाच्या पातळीवर आले. आणि पुढे मुंडे यांच्या मृत्यूनंतर फडणवीस यांनीच महाराष्ट्राच्या राजकारणातला मुंडे गट संपवला. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे ही त्याची ठळक उदाहरणे.