जागतिक बाजारात सोन्याला इतके महत्त्व का?

  • संजीव चांदोरकर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केले. त्या निमित्ताने सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कसे प्रभावित होतात यावर एक नजर टाकूया. (Gold market)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव ५,५०० डॉलर्स प्रती औंस वर पोचून आता ४,७०० डॉलर्स प्रती औंस वर खाली आले आहेत. २०२१ मध्ये हा भाव १७०० ते १९०० डॉलर्स प्रती औंस होता. (एक औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम्स) भारतातील सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय सोन्याच्या भावाला बॅक टू बॅक फॉलो करतात. अर्थात रुपया डॉलर विनिमय दर त्यावर निर्णायक प्रभाव टाकतो. त्यानुसार भारतात १० ग्रामची किंमत १,६२,००० रुपयांवर जाऊन आता १,५५,००० रुपयांवर आली आहे.

एक हजार टन सोने खरेदी

सोन्याच्या बाबतीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. २०२५ मध्ये साडेपाच लाख कोटी रुपयांचे परकीय चलन सोने आयातीसाठी देशाने खर्च केले. हे झाले फक्त एका वर्षाचे. काही दशकांचा हिशेब किती होईल विचार करा. असे जरी असले तरी आंतरराष्ट्रीय म्हणून भारतीय बाजारात सोन्याचे भाव वाढण्यामागे कुटुंबांची सोने खरेदी हे कारण नाही. तर विकसित आणि विकसनशील देशांच्या जवळपास सर्व केंद्रीय बँकांनी गेली काही वर्षे केलेली सोने खरेदी कारणीभूत आहे. २०२२, २०२३ आणि २०२४ या तीन वर्षात जगातील केंद्रीय बँकांनी दरवर्षी सरासरी एक हजार टन सोने खरेदी केली. २०२५ मध्ये थोडी कमी, ९०० टन खरेदी झाली. ( एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम. हजार टन म्हणजे किती तोळे ते तुम्हीच काढा) जगातील सर्व केंद्रीय बँकाकडील एकत्रित सोन्याचे साठे ऐतिहासिक उंचीवर आहेत. (Gold market)

डोनाल्ड ट्रम्प आणि अनिश्चितता

का करत आहेत केंद्रीय बँका सोने खरेदी ? आपापल्या चलनाची स्थिरता ठेवणे हे प्रत्येक केंद्रीय बँकेचे प्राथमिक कर्तव्य असते. त्यासाठी त्यांच्याकडे साठलेले परकीय चलन कोणत्यातरी स्थिर किमतीच्या वित्तीय / भौतिक मत्तेमध्ये गुंतवले जाते. अनेक वर्षे अमेरिकेचा डॉलर असे स्थिर चलन मानले जायचे. त्यामुळे केंद्रीय बँकांकडे जमा होणारे परकीय चलन अमेरिकन सरकारच्या रोख्यांमध्ये मोठया प्रमाणावर गुंतवले जात होते. पण संदर्भ वेगाने बदलत आहेत.

अमेरिकेअंतर्गत आणि जागतिक पातळीवर देखील गेल्या वर्षभरातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदाला शोभा न देणाऱ्या अनेक निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्था / व्यापार / भू राजनैतिक संबंधांमध्ये प्रचंड अनिश्चितता तयार झाली आहे. हे सगळे कोठे जाणार आहे कोणालाच माहित नाही. एवढेच नाही तर अमेरिकेन अर्थव्यवस्था, तेथील महागाई व व्याजदर, अमेरिकेचे सतत वाढणारे कर्ज आणि डी-डॉलरायझेशनच्या चर्चा यामुळे भविष्यात डॉलर कमकुवत आणि अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Gold market)

अमेरिकेची भीती

केंद्रीय बँकांच्या अमेरिकन डॉलर ऐवजी सोन्याचे साठे करण्याला अजून एक निर्णायक कारण ठरले. रशिया युक्रेन युद्धानंतर रशियाच्या केंद्रीय बँकेने अमेरिकेन रोख्यात गुंतवलेले काही शे बिलियन्स डॉलर्स अमेरिकेने गोठवले. सर्वच देशांना भीती वाटते की “ भविष्यात आपले अमेरिकन सरकारबरोबर काही बिनसले तर अमेरिका केव्हाही आपल्या त्यांच्याकडील गुंतवणुकी गोठवू शकते ; पुढे जाऊन आपल्याच गुंतवणुकीचा आपल्या विरुद्ध ब्लॅकमेल साठी वापर करू शकते “ (Gold market)

सोन्याची सद्यस्थिती

एक स्पष्टीकरण: आपल्या देशातील कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्यामुळे परकीय चलनांवर ताण येतो, सोने एक अनुत्पादक मत्ता आहे. त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत उत्पादक मत्तांसाठी भांडवल वळत नाही. त्यामुळे कुटुंबांनी सोन्या बद्दलचे नको तेवढे आकर्षण कमी केले पाहिजे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. गरीब कुटुंबासाठी सोने विकत घेणे, ते गहाण ठेवून कर्ज घेणे सारे आतबट्ट्याचे आहे. सोन्याचे भाव सर्वांच्या जिव्हाळयाच्या विषय आहे. त्याची सद्यकालीन राजकीय अर्थव्यवस्था समजून घेणे गरजेचे आहे.

Related posts

मातीपासून ताटापर्यंत प्लास्टिकचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक

जिवंत झालेल्या ओढ्यांनी आदिवासींचे जगणे बदलले

तो काळ जागल्यांचा !