ऑलिव्ह रिडले कासवांची १.६५ लाख पिल्ले समुद्रात

Screenshot

चेन्नईः तमिळनाडू किनारपट्टीवर यंदाच्या अंडीउबवणी हंगामात आतापर्यंत सुमारे १.६५ लाख ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील कासव संवर्धन मोहिमेसाठी हे मोठे यश मानले जात आहे. (Olive Ridley Conservation)

तमिळनाडू वन विभागाच्या माहितीनुसार, २०२६ च्या अंडीउबवणी हंगामात आतापर्यंत १,९८५ कासवांची घरटी नोंदवण्यात आली असून सुमारे २.२९ लाख अंडी गोळा करून संरक्षित करण्यात आली.

यंदाच्या हंगामात कासवांच्या मृत्यूदरातही लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी १,५७२ कासवांचा मृत्यू झाला होता, तर यंदा हा आकडा जवळपास ५० टक्क्यांनी घटून ७८४ वर आला आहे. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवक आणि किनारी समुदाय यांच्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Olive Ridley Conservation)

चेन्नई विभागात सर्वाधिक घरटी

राज्याच्या पर्यावरण आणि वन सचिव सुप्रिया साहू यांनी यासंदर्भात समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, चेन्नई वन्यजीव विभागात सर्वाधिक कासवांची घरटी आढळली. येथे ६५६ घरटी आणि ७४,१४३ अंडी नोंदवण्यात आली.

कडलूर जिल्हा संवर्धनाच्या दृष्टीने आघाडीवर असून तेथून ४८,६१७ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. (Olive Ridley Conservation)

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अंडीउबवणी हंगाम अद्याप सुरू असून आणखी ६२ हजारांहून अधिक पिल्ले अंड्यांतून बाहेर येण्याची शक्यता आहे.

यशस्वी हंगामाची पुढची पायरी

यंदाचे आकडे २०२५ मधील यशस्वी संवर्धन मोहिमेचीच पुढची पायरी मानले जात आहेत. (Olive Ridley Conservation)

एप्रिल २०२५ अखेरपर्यंत तमिळनाडूमध्ये ३.१९ लाखांहून अधिक अंडी गोळा करून संरक्षित करण्यात आली होती आणि त्यातून २.२९ लाखांहून अधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती.

त्या वेळीही कडलूर जिल्हा सर्वाधिक पिल्ले समुद्रात सोडणारा जिल्हा ठरला होता. त्यानंतर मयिलादुथुराई आणि चेन्नईचा क्रमांक होता. (Olive Ridley Conservation)

सुरुवातीला होती मोठी चिंता

२०२५ च्या सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत शेकडो ऑलिव्ह रिडले कासवांचे मृतदेह किनाऱ्यावर आढळले होते. त्यामुळे संवर्धनासाठी झटणा-या घटकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

मात्र, वन विभाग, मत्स्य विभाग, भारतीय तटरक्षक दल आणि संवर्धन संस्थांच्यावतीने संयुक्त प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे नंतरच्या काळात घरट्यांचे संरक्षण आणि पिल्लांच्या जगण्याचे प्रमाण सुधारल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक वैज्ञानिक संवर्धनाकडे भर

वन विभागाने संवर्धन उपाययोजनाही अधिक मजबूत केल्या आहेत.

यामध्ये :

  • कासवांच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी ‘टेलिमेट्री’ प्रकल्प
  • ‘टर्टल टास्क फोर्स’मार्फत सातत्यपूर्ण देखरेख
  • नैसर्गिक परिस्थितीसारखी अंडीउबवणी केंद्रे तयार करण्यासाठी सुधारित माहिती संकलन

यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

वन विभागाने या मोहिमेत योगदान दिल्याबद्दल ‘स्टुडंट्स सी टर्टल कन्झर्वेशन नेटवर्क’, ‘ट्री फाउंडेशन इंडिया’, भारतीय तटरक्षक दल, मत्स्य विभाग, अंडीउबवणी केंद्रातील कर्मचारी, वन कर्मचारी, किनारी निरीक्षक, स्वयंसेवक आणि मच्छीमार समुदाय यांचे विशेष कौतुक केले आहे.

Related posts

३०० कोटी वृक्षलागवडः नवीन लागवडीबरोबर जुन्या झाडांचे संरक्षण आवश्यक

अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा (IMD Weather Predictions)

दहापैकी चार विद्यार्थ्यांचा बारावीपूर्वीच शाळेला रामराम