General Rahul Singh :ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत तीन शत्रूंशी लढत होता : लेफ्टनंट जनरल सिंग

General Rahul Singh

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत दोन नव्हे तर तीन शत्रूंशी सामना करत होता, असे लष्कराचे उपप्रमुख (कपॅसिटी डेव्हलपमेंट ॲण्ड सस्टेन्स) लेफ्टनंट जनरल सिंग यांनी तुर्कीचे नाव घेत सांगितले. (General Rahul Singh)

चीनकडून भारताच्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल पाकिस्तानला रिअल टाइम इनपुट मिळत होते, अशी धक्कादायक माहिती सांगून जनरल राहुल आर सिंग यांनी, चार दिवसांच्या संघर्षादरम्यान भारताने सीमेवर दुहेरी धक्क्याचा सामना केला, असे सांगितले.

दिल्लीत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (General Rahul Singh)

‘‘पाकिस्तान आघाडीवर होता. चीन त्याला सर्वतोपरी मदत करत होता. तुर्कीनेही त्याला मिळालेल्या मदतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली,’’ असे लेफ्टनंट जनरल सिंग यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतली तर चीनने पाकिस्तानला मदत केल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे भारताचा पश्चिमेकडील शेजारी इतरांविरुद्ध शस्त्रांची चाचणी करण्यासाठी एक प्रयोगशाळा बनला आहे, यात विशेष आश्चर्य नाही, असे सिंग यांनी अधोरेखित केले.

‘‘आकडेवारी पाहिली तर गेल्या पाच वर्षांत, पाकिस्तानला मिळत असलेल्या लष्करी साधनांपैकी ८१% चिनी आहेत. चीन इतरांच्या शस्त्रांविरुद्ध आपली शस्त्र चाचणी करण्यास सक्षम आहे. म्हणून ते (पाकिस्तान) त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेसारखे आहे,’’ असे जनरल सिंग म्हणाले. (General Rahul Singh)

चीनवर हल्ला चढवताना, जनरल सिंग यांनी चीनच्या डावपेचाचा उल्लेख ‘उधार घेतलेल्या चाकूने मारणे’ असा केला. प्रत्यक्ष रणभूमीवर उतरण्याऐवजी त्यांनी पाकिस्तानचा वापर भारताविरुद्ध केला. चीन तो उत्तर सीमेवर काही कुरापती करण्यापेक्षा शेजाऱ्याचा वापर त्रास देण्यासाठी करेल, असे जनरल सिंग यांनी सांगितले.

सिंग यांनी आपल्या भाषणात तुर्कीचाही उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूरपासून तुर्की पाकिस्तानला ‘‘भाऊ’’ म्हणून वारंवार पाठिंबा देत आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या नरसंहाराचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ जणांना गोळ्या घालून ठार मारले. बळींमध्ये बहुतेक पर्यटक होते. त्यात पर्यटकांना मदत करणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीचीही गोळीबारात हत्या करण्यात आली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर