पुणे : प्रतिनिधी : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला मटण बिर्याणी देणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्यानंतर पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलिस निरीक्षकासह पाच पोलिसांना निलंबित केले. (Gaja Marne)
पुणे पोलिसांनी २४ फेब्रुवारी रोजी मारणे व त्याच्या टोळीतील गुंडांना एका सॉफ्टवेअर इंजिनीअरवर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली होती. मारणेवर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला येरवडा कारागृहात डांबण्यात आले. मात्र, तिथे त्याला विशेष वागणूक मिळू नये, यासाठी त्याची रवानगी सांगलीच्या कारागृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन मार्च रोजी गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांच्या देखरेखीखाली मारणेला सांगलीला हलवण्यात आले. यावेळी पोलिस व्हॅनच्या मागे आणि पुढे गजा मारणेचे जवळपास ८० ते १०० साथीदार वेगवेगळ्या अलिशान गाड्यातून पाठलाग करत होते. त्यांनी गजा मारणेशी संवाद साधल्याचेही समोर आले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी लोकेशनची माहिती देत या गुंडांना पोलिसांच्या गाडीसोबत येण्याची परवानगीही दिली होती. त्यावेळी, हे पथक साताऱ्याजवळ एका महामार्गाशेजारील धाब्यावर थांबले आणि त्यांनी मटण बिर्याणी मागवली. त्यावेळी, घेण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस मारणेसाठी व्हॅनमध्ये बिर्याणी नेताना दिसत आहेत. (Gaja Marne)
हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर आल्यानंतर पोलिसांवर चहुबाजूंनी टीका झाली. त्याची दखल घेत कुमार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज राजगुरु यांच्यासह चार पोलिसांना निलंबित केले. तसेच गजा मारणे टोळीची सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.