कोल्हापूर : प्रतिनिधी : आजचे सामाजिक आणि राजकीय वास्तव मला अस्वस्थ करते. अशा वातावरणात सामाजिक न्यायाच्या तत्त्वाशी बांधील राहणे नेहमीच आव्हानात्मक असते, असे मत प्रख्यात हिंदी कवयित्री गगन गिल यांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) येथे व्यक्त केले. (Gagan Gill)
‘महाराष्ट्र दिनमान’ आयोजित साहित्य उत्सवात संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गिल यांनी साहित्यनिर्मितीमागच्या प्रेरणा, लेखक आणि साहित्यिकांची जबाबदारी याविषयी भाष्य केले. (Gagan Gill)
परंपरेतील वाढती प्रदूषणे दूर करण्याचा माझ्या लेखनातून प्रयत्न असतो. सामाजिक प्रदूषणाविरोधात संवेदनशील लेखकाच्या मनात विद्रोह आणि आक्रोश निर्माण होतोच, असे सांगून त्यांनी स्त्रीला समानतेची वागणूक देण्याची जबाबदारी अंतिमत: पुरुषाचीच राहते, असे स्पष्ट मतही नोंदवले.
महाराष्ट्र-पंजाब साधर्म्य
स्वातंत्र्य चळवळीपासूनच महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये एक सांस्कृतिक साधर्म्य राहिले असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख गिल यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान केला. विशेषत: स्वातंत्र्य चळवळीत या दोन राज्यांचे अग्रस्थान आणि संत नामदेवांच्या अभंगांच्या माध्यमातून दोन्ही भाषांमध्ये झालेली सांस्कृतिक देवाणघेवाण गिल यांनी यावेळी अधोरेखित केली.
भाषा हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही : डॉ. बोधिसत्व
कोल्हापूर : महाराष्ट्र दिनमान आयोजित साहित्य उत्सवात प्रसिद्ध हिंदी कवी आणि गीतकार डॉ. बोधिसत्व यांची मुलाखत टिकम शेखावत यांनी घेतली.
‘‘रामराज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेच पाहिजे. माध्यम कोणतेही असो त्यातील अभिव्यक्ती मुक्तच असली पाहिजे, ’’असे मत प्रख्यात हिंदी कवी आणि गीतकार डॉ. बोधिसत्व यांनी यावेळी व्यक्त केले. कवी टिकम शेखावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी बोधिसत्व यांनी खुल्या संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
भाषेवरून कुणाला राजकारण करायचे असेल त्यांनी करावे. परंतु, भाषेवर मर्यादा घातली तर आपण संकुचित होऊ. आपण आपापल्या कोशात राहायचे की मुक्तपणे विहारायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आपल्याला समृद्ध माणूस म्हणून पुढे जायचे असेल मोकळेपणा ठेवलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.