नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे शुक्रवारी (९ मे) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) ये-जा करणाऱ्या किमान १३८ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांनी प्रवाशांना त्यांच्या सामानासंबंधीच्या नियमांचे पालन करण्याचे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.(Flight cancelled)
शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत विमानतळावर येणारी किमान ६३ आगमन आणि निघणारी ६६ देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
याच काळात चार आंतरराष्ट्रीय आगमन आणि पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील रद्द करण्यात आली, असे सूत्राने सांगितले. (Flight cancelled)
दिल्ली विमानतळाने एक्सवर पोस्ट करून प्रवाशांना सूचना जारी केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की विमानतळाचे कामकाज सामान्य असले तरी, काही उड्डाण वेळापत्रकांवर ‘‘विकसित होत असलेली हवाई परिस्थिती आणि मजबूत सुरक्षा उपायांमुळे’’ परिणाम होऊ शकतो. प्रवाशांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमान उड्डाणाच्या किमान तीन तास आधी रिपोर्ट करण्याचे आवाहन केले आहे. ‘‘नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने विमानतळांवर वाढवलेल्या उपाययोजनांबाबत दिलेल्या आदेशानुसार, भारतातील प्रवाशांना चेक-इन आणि बोर्डिंग सुरळीत करण्यासाठी नियोजित प्रस्थानाच्या किमान ३ तास आधी त्यांच्या संबंधित विमानतळांवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. चेक-इन प्रस्थानाच्या ७५ मिनिटे आधी बंद होते,’’ असे एअर इंडियाने एक्सवर पोस्ट केली आहे. (Flight cancelled)
इंडिगोनेही असेच आवाहन केले होते, ज्यामध्ये म्हटले होते : “सुरक्षा तपासणी आणि औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रवासासाठी काही अतिरिक्त वेळ द्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.”
भारताने आधीच २७ विमानतळांवर व्यावसायिक उड्डाणे स्थगित केली आहेत. प्रामुख्याने भारत-पाकिस्तान सीमेजवळील किंवा प्रमुख हवाई दलाच्या तळांवर असलेल्या विमानतळांवर ही काळजी घेतली आहे.