नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर आरोप करीत अनेक पुरावे सादर केले होते. बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकनाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे एका महिलेचे वय १२४ वर्षे दाखवण्यात आले आहे. तथापि, तिचे मतदार म्हणून नाव पहिल्यांदाच नोंदवल्याचे समोर आले आहे. (Fake voters and SIR)
बिहारमधील मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन आणि विविध मतदारसंघांमध्ये झालेल्या अशा कथित मतदार घोटाळ्यांविरोधात मंगळवारी (१२ ऑगस्ट) निदर्शने करणाऱ्या काँग्रेस खासदारांनी मिंता देवी या महिला मतदाराचा चेहरा असलेला टी-शर्ट परिधान करून निषेधात भाग घेतला. (Fake voters and SIR)
प्रियंका गांधी वद्रा आणि गौरव गोगोई यांच्यासह काँग्रेस खासदारांनी निदर्शनात सहभाग घेतला. मतदार यादीनुसार दरौंधा विधानसभा मतदारसंघातील मतदार म्हणून नाव असलेल्या मिंता देवी या महिलेचा फोटो असलेला पांढरा टी-शर्ट या खासदारांनी परिधान केला होता. मतदार यादीत तिचे वय १२४ वर्षे नमूद करण्यात आले होते. म्हणून टी-शर्टच्या मागील बाजूस ‘१२४ नॉट आउट’ असे लिहिले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट २०२५ रोजी पत्रकार परिषदेत अशा महिलांची नावे आणि मतदार यादीनुसार १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असल्याचा दावा करणाऱ्या इतर दोन महिलांची नावे नमूद केली होती. (Fake voters and SIR)
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार सर्वात वयस्कर जिवंत व्यक्ती युनायटेड किंग्डममधील एथेल कॅटरहॅम असल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणून दिले आहे, ज्यांचे वय ११५ वर्षे आहे.
काँग्रेसच्या माणिकम टागोर यांनी पीटीआयला सांगितले की, ‘मिंता देवी’ या पहिल्यांदाच मतदार म्हणून नोंदवण्यात आल्या आहेत. ‘‘मिंता देवी पहिल्यांदाच मतदार म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत आणि त्या १२४ वर्षांच्या आहेत. हे असे काय असू शकते? आम्हाला अशा मुद्द्यांवर चर्चा हवी आहे. निवडणूक आयोग भाजपचा पक्ष कसा बनला आहे. मतदार यादी अशा फसवणुकीने भरलेली आहे,’’ असा आरोप त्यांनी निषेधात भाग घेताना केला. द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा), शिवसेना – उद्धव गट, डाव्या पक्षांचे अनेक विरोधी खासदारही निषेधात सहभागी झाले. इंडिया आघाडी गेल्या १५ दिवसांपासून संसदेच्या आवारात एसआयआर विरोधात निदर्शने करत आहे.
काय आहे हे प्रकरण?
दरौंडा विधानसभा मतदारसंघातील सिसवान ब्लॉकच्या सिसवा कला पंचायतीच्या अर्जनीपूर गावचे आहे. येथील मतदार यादीत मिंता देवी नावाच्या १२४ वर्षीय महिलेचे नाव नोंदवले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अर्जनीपूरमधील धनंजय कुमार सिंह यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांचे वय फक्त ३५ वर्षे आहे. डेटा एन्ट्री करताना बूथ लेव्हल ऑफिसर उपेंद्र शाह यांनी ही चूक झाल्याचे मान्य केले. यात दुरूस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.