कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (दि.९) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथील ११०० खाटांच्या विविध रूग्णालयांच्या इमारतीच्या भूमिपूजनासह विविध पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण होणार आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शेंडा पार्कात जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. शेंडापार्क येथे २५० खाटांचे कर्करोग रूग्णालय, ६०० खाटांचे सामान्य रूग्णालय व २५० खाटांचे अतिविशेषोपचार रूग्णालयांचा प्रामुख्याने समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अगोदर दुपारी चार वाजता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.