वॉशिंग्टन : भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि अॅक्सिओम-४ क्रू यांना घेऊन गेलेले ड्रॅगन अंतराळयान मंगळवारी (१५ जुलै) पृथ्वीवर पोहोचेल. या यानाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. १५ जुलै रोजी ते भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता परत येण्याची अपेक्षा आहे. (Dragon begins return journey)
यानाचा अनडॉकिंग आणि स्प्लॅशडाउन दोन्ही वेळेचा कालावधी सुमारे एक तासाचा असतो. ड्रॅगन ग्रेस आयएसएसवरून अनडॉक केले आहे. शुभांशू शुक्ला आणि अॅक्सिओम-४ मिशनवरील अन्य अंतराळवीरांचा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू झाला आहे.
२५ जून रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन-९ रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आलेले अॅक्सिओम-४ हे यान २६ जून रोजी आयएसएसशी जोडले गेले. १८ दिवसांत, या पथकाने मानवी आरोग्य, अवकाशातील शेती, मानसिक आरोग्य आणि अंतराळ सूट साहित्यावरील अभ्यासांसह ६० हून अधिक प्रयोग केले आहे. हे अभियान ५८० पौंडांपेक्षा जास्त साहित्य घेऊन परत येणार आहे. यामध्ये वैज्ञानिक उपकरणे आणि संशोधन नमुन्यांचा समावेश आहे. (Dragon begins return journey)
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि तीन आंतरराष्ट्रीय क्रू मेटस् ना घेऊन ॲक्सिओम-४ चे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले होते. राकेश शर्मा यांच्यानंतर ४० वर्षांनी अवकाशात जाणारे कॅप्टन शुक्ला हे पहिले भारतीय आहेत. (Dragon begins return journey)
अनेक अडथळ्यानंतर अॅक्सिओम-४ (अॅक्स-४) मोहीम सुरू झाली होती. शुक्ला यांच्यासोबत अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन (अमेरिका) कमांडर म्हणून, पोलिश अभियंता स्लावोस उझनान्स्की, हंगेरियन संशोधक टिबोर कापू आहेत.
चार दशकांपूर्वी भारताने आपले पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांना अवकाशात पाठवले होते, परंतु शुक्ला यांच्या माध्यमातून भारताने एक मोठी झेप घेतली आहे. ते केवळ अवकाशात उड्डाण करत नाहीत तर ते आयएसएसच्या आतापर्यंतच्या सर्वात संशोधन-केंद्रित व्यावसायिक मोहिमांपैकी एकावर पायलट म्हणून काम करत आहेत.
गगनयान मोहिमेतही शुक्ला यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे अवकाशात माणूस पाठवणाऱ्यांच्या देशाच्या यादीत भारताला स्थान मिळणार आहे.