कसबा बावड्यात शिवसेनेच्या दोन गटांत वाद

कोल्हापूर;  प्रतिनिधी :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील  कसबा बावडा परिसरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. बावड्यात राडा झाला, अशी माहिती मिळाल्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. दोन्ही गटांनी सामंजस्यांची भूमिका घेतल्याने  तणाव निवळण्यास मदत झाली. आमदार सतेज पाटील यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे वाद निवळण्यास मदत झाल्याची चर्चा कसबा बावड्यात सुरू होती.

कसबा बावड्यातील सर्व मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान सुरू होते. दुपारी शिवसेनेचे उमेदवार कसबा बावडा येथील बलभीम विद्यालय मतदान केंद्रावर आले. यावेळी क्षीरसागर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील जाधव यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख राहुल माळी यांना ‘तू निष्ठावंत नाहीस’ असे म्हणून शिवीगाळ केली. राहुल माळी यांनी शिवगाळ करून सुनील जाधव यांना प्रत्युत्तर दिल्याने तणाव निर्माण झाला. जाधव यांचे चिरंजीव आदर्श जाधव हे राहुल माळी याच्या अंगावर धावून गेले. ही घटना वाऱ्यासारखी कसबा बावड्यात पसरली. बावड्यातील तरुण दत्त मंदिर कार्यालयाजवळ बलभीम विद्यालयाजवळ जमू लागले. घटनेचे गांभीर्य ओळखून राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम यांनी सुनील जाधव आणि त्यांचा चिरंजीव यांना आपल्या वाहनात घेतले आणि बलभीम गल्लीतून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ बावड्यातील काही तरुण मोटारसायकलवरून पाठलाग करत बावड्याच्या मुख्य रस्त्यावर पोचले.

कवडे गल्लीच्या कोपऱ्यावर बावड्यातील तरुणांनी राहुल माळी यांना धक्काबुक्की का झाली म्हणून क्षीरसागर आणि कदम यांना विचारणा केली. यावेळी परिसरात मोठा जमाव जमला. काही जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान राखून क्षीरसागर आणि कदम यांना कसबा बावडा मिसळ येथील हॉटेलमध्ये बसण्यास सांगितले. दरम्यान, वादाची घटना कळताच आमदार सतेज पाटील कसबा बावड्यात कवडे गल्लीत आले. यावेळी जमाव आक्रमक होता. कवडे गल्ली ते बावडा मिसळ हॉटेल हे अंतर अवघे १५ ते वीस फुटांचे होते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सतेज पाटील यांनी जमावाला भगव्या चौकात नेले. भगवा चौकात त्यांनी तरुणांना शांततेचे आवाहन केले. .” मी राहुलच्या पाठीशी भक्कम आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा हिशेब करायचा. पण अजून मतदान व्हायचे आहे, प्रत्येकाने आपल्या बूथवर जाऊन जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे, अशी विनंती त्यांनी तरुणांना केली. भगवा चौकात जमाव असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम यांना दुसऱ्या रस्त्यावरून बाहेर काढून समयसूचकता दाखवली. सतेज पाटील यांनी संयम दाखवून कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यामुळे परिसरातील तणाव निवळला आणि पुन्हा मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी