कोल्हापूर : प्रतिनिधी : डिजिटल अरेस्टची भिती दाखवून सेवा निवृत्त प्राध्यापिका आणि निवृत्त अभियंताला कोट्यवधींचा गंडा घालणारी पुण्यातील भामट्यांची टोळी पोलिसांनी उघडकीस आणली. टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या खात्यावरील ४८ लाख रुपये गोठवण्यात आले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कोल्हापूरातील दोन्ही गुन्ह्यातील या टोळीतील सदस्यांचा हात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. (Digital arrest Case)
अशी आहेत संशयितांची नावे
बंडू हरिबा पाटील (वय ३७ रा. चाकण, पुणे, मुळ गाव तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव), तेज राहूल भालेराव (२१, रा. खोरवडे, ता. दौड, जि. पुणे), विवेक उर्फ विकी भास्कर गवळी (२८, रा. तळवडे, निगडी, पुणे) अक्षय रमेश कामठे (३० रा. सासवड, ता. पुरंदर, पुणे), क्षितीज चंद्रकांत सुतार (२४ रा. वडगाव बुद्रुक पुणे) अशी अटकेतील संशयिताची नावे आहेत. सुतार हा टोळीचा प्रमुख असून तोच ऑनलाईन फसवणूकीचे नेटवर्क चालवत होता. (Digital arrest Case)
हॉटेलमध्ये कोर्ट, पोलिस अधिकारी कार्यालयाचा सेटअप
ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी पुण्यातील या भामट्यांनी एक हॉटेलची मोठी खोली भाडयाने घेतली होती. हॉटेलच्या खोलीत न्यायालय आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा सेटअप तयार केला होता. फसवणुकीतील रक्कम अटकेतील बंडू राठोड याच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. ती पुढे अन्य खात्यावर वळवण्यात आली. पुढील खातेधारांकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. (Digital arrest Case)
४८ लाख गोठवण्यात यश
राजारामपुरी पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भिती दाखवली होती. या गुन्ह्यातील २८ लाख रुपये गोठवण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आले आहे. तसेच जुना राजवाडा पोलिस ठाण्यात निवृत्त अभियंताला ११ कोटींचा गंडा घातल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील २० लाख रुपये गोठवण्यात आला आहे. घोटाळ्यातील रक्कम पुढे अनेक खात्यावर वर्ग झाली आहे. या खात्यांचा शोध घेऊन रक्कम गोठवण्यासाठी बँकांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Digital arrest Case)