Dr. B R Ambedkar : आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले? : वास्तव आणि विपर्यास

-राज कुलकर्णी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भाषणादरम्यान म्हणाले, ‘सारखं सारखं आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… आंबेडकर यांचे नाव घ्यायची जणू फॅशनच निघाली आहे. देवाचे असे सारखे नांव घेतले असते तर सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती.’ (Dr. B R Ambedkar)

डॉ. आंबेडकर संविधान निर्माते आहेतच पण या देशातील दलितांचे, शोषित पीडितांचे दैवतही आहेत. अमित शाह यांचा पक्ष हिंदूंना सनातनी भारतीय म्हणून गौरवीत असताना आंबेडकरांनी याच सनातनी हिंदू धर्मातील भेदभावाला त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्माच्या स्वीकारावेळी मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही, अशी प्रतिज्ञाही घेतली होती. राम मंदिराच्या धार्मिक भावनेवर स्वार होऊन सत्ता संपादन करणाऱ्या मोदींना आणि शाहांना बाबासाहेबांची ही प्रतिज्ञा माहीत असेलच.

अमित शाह यांनी बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लेली आहे. यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने बाबासाहेबांना १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईतून आणि १९५४ च्या पोटनिवडणुकीत भंडारा येथून, असे दोनदा पराभूत केले. त्यांचा अपमान केला.

काँग्रेसने बाबासाहेबांना १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईतून आणि १९५४ च्या पोटनिवडणुकीत भंडारा येथून पराभूत करून त्यांचा अपमान केला, हा आरोप नवा नाही. आज मोदींनी हा आरोप केला आहे, पण हा आरोप यापूर्वी आंबेडकरांच्या काही अनुयायी, समर्थकांनीही अनेकदा केला आहे. (Dr. B R Ambedkar)

सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईतून आणि १९५४ च्या पोटनिवडणुकीत भंडारा येथून काँग्रेस उमेदवाराकडून पराभूत झाले. ही बाब ऐतिहासिक सत्य आहे. बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसकडून किंवा काँग्रेसच्या सहयोगी पक्षाकडून या दोन्ही निवडणुका लढले नव्हते; तर ते या दोन्ही निवडणुका काँग्रेस पक्षाविरोधात शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) या पक्षातर्फे लढले होते. दोन्ही पक्ष निवडणूक जिंकण्यासाठीच लढले आणि तोच निवडणूक लढण्याचा मुख्य उद्देश असतो. मात्र याबाबतीत दोन बाबी समजून घेणे आवश्यक आहे. एक आहे निवडणुकीतील राजकारण आणि दुसरा भाग आहे, राजकीय नैतिकतेचा आणि सद्भावनेचा !

राजकीय नैतिकता आणि सद्भावनेचा विचार करता काँग्रेसने बाबासाहेब यांच्या विरोधात उमेदवार न देणे ही योग्य कृती असती. पण सद्भावना आणि नैतिकता यांना निवडणूक जिंकण्याच्या इर्ष्येत कितपत स्थान असते, हे आजही आपण पाहतो. सख्खे भाऊ, बहीण, मुलगा, वडील, चुलते-पुतणे यांच्यातही निवडणुका होताना निवडणुकीतील प्रचारात सद्भावना आणि नैतिक भूमिकांना स्थानच नसते. शिवाय १९५२ च्या निवडणुकीत आंबेडकरांच्या समकक्ष राष्ट्रीय स्तरावरील एकही नेता प्रदेश काँग्रेस कमिटीत नसल्यामुळे आंबेडकरांच्या प्रचाराचे टिकेचे लक्ष्य हे काँग्रेसचे तत्कालीन सर्वोच्च नेते नेहरू आणि गांधी हेच होते. नेहरूंच्या १९४६ पासून १९५१ पर्यंतच्या काळातील परराष्ट्र धोरणावर, शैक्षणिक धोरणावर, संरक्षण धोरणावर आंबेडकर प्रखर टीका करत होते. विशेष म्हणजे आंबेडकर ज्या नेहरूंच्या ज्या काळातील नेतृत्वावर नि धोरणावर टीका करत होते, त्याच काळात ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, कायदे मंत्री होते आणि याच मंत्रिपदावर राहून त्यांनी घटनेची निर्मिती केली होती. म्हणजे आंबेडकर आपल्याच मंत्रिमंडळाच्या नेतृत्वावर नि या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर टीका करत होते. सन १९५२ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जनाधार आणि लोकप्रियता अत्युच्च शिखरावर होती. याला स्वातंत्र्यलढ्यातील पार्श्वभूमीमुळे एक प्रकारचे सर्वव्यापित्व लाभले होते. आंबेडकरांना याची माहीती असूनही आंबेडकर कोणत्याही परीणामाची तमा न बाळगता काँग्रेसवर, काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रखर टीका करत होते आणि काँग्रेसचे नेतेही आंबेडकर हे आपल्याच सरकारमधील एक मंत्री आहेत, घटना निर्मितेचे शिल्पकार आहेत हे न पाहता प्रखर टीका करत होते. यामुळे सद्भावना नि राजकीय नैतिकता या दोन्ही बाबींना स्थानच नसणे हे स्वाभाविक होते. (Dr. B R Ambedkar)

डॉ. आंबेडकर १९५२ च्या निवडणुकीत उत्तर मुंबई मतदार संघातून उमेदवार होते. समाजवादी पक्षाच्या अशोक मेहता यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी संयुक्त मतदार संघ असल्यामुळे दोन उमेदवार निवडले जात असत. या मतदार संघात आंबेडकर ‘शेकाफे’चे उमेदवार होते. काँग्रेसचे काजरोळकर होते आणि कम्युनिस्ट पार्टीचे एस. ए. डांगेही उमेदवार होते. आंबेडकर १५,००० मतांनी पराभूत झाले. ते लोकसभेत पोहचू शकले नाहीत, मात्र या निवडणुकीच्या वेळीही आंबेडकर राज्यसभेचे सदस्य होते कारण काँग्रेसच्या समर्थनावर आधारीत त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची टर्म अजून संपलेली नव्हती.

कम्युनिस्ट पक्षावर टीका

निवडणुकीचे निकाल आल्यावर अशोक मेहता आणि आंबेडकर यांनी निवडणूक आयोगासमोर तक्रार दाखल करून ही निवडणूक चुकीची असल्याचा तक्रारी अर्ज दिला. यात जवळपास ७८,००० हजार मतदार बाद ठरवले गेले आणि ते मोजले गेले नाही, असा आरोप केला होता. पण त्यांचा मुख्य आरोप हा कम्युनिस्ट पक्षावर होता. कारण या मतदार संघात मतदार म्हणून प्रामुख्याने गिरणी कामगार होते जे अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय होते. आंबेडकरांना वाटत होते की, अनुसूचित जातीचे नि इतर मागास वर्गाचे मतदार शेड्युल्ड कास्ट फेडरेशनला मतदान करतील, पण तसे घडले नसल्याचाही आरोप केला गेला. त्यानंतर आंबेडकरांनी कम्युनिस्ट पार्टी विरोधात निवडणुकीत कम्युनिस्टांनी दोन उमेदवारांना मतदान करण्याऐवजी एकाच उमेदवाराला मतदान करा, असा बेकायदेशीर प्रचार करून निवडणूक प्रक्रियेत फसवणूक केली असल्याच्या आरोपावर आधारीत कोर्टात इलेक्शन पिटीशन दाखल केली. ही पिटीशन न्यायालयाने फेटाळून लावली. पण यावेळीही आंबेडकर राज्यसभा सदस्यपदी होतेच पण हे सदस्यत्व काँग्रेसच्या सहकार्याने आहे हे माहीत असल्यामुळे त्यांनी १९५४ ला भंडारा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. (Dr. B R Ambedkar)

काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर

भंडारा मतदार संघातील पोटनिवडणुकीत डॉ. आंबेडकर पुन्हा उमेदवार झाले. या निवडणुकीच्या प्रचारातही त्यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य नेहरू आणि त्यांचे परराष्ट्र घोरण हेच होते. यावेळी नेहरू १९५२ साली निर्वाचित होऊन पंतप्रधान पदावर होते. रशियाबरोबर मैत्री करार झाला होता. जागतिक पातळीवर नेहरू आशियायी नेते म्हणून स्थापित झाले होते. अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांनीही म्हणजे समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष यांनी त्यांचे जागतिक नेतृत्व मान्य केले होते. अशा स्थितीत त्यांची ओळख पंतप्रधान विरोधी उमेदवार अशी होऊन ते जनाधार प्राप्त करू न शकल्यामुळे पराभूत झाले आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विशेष म्हणजे यावेळीही आंबेडकर राज्यसभा सदस्यपदावर विराजमान होतेच!

आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय संशोधकांच्या लेखनानुसार, आंबेडकर यांच्या भंडारा येथील पराभवाचे विश्लेषण करताना लिहिले आहे की, आंबेडकर ज्या पक्षातर्फे निवडणूक लढले तो शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित झाला होता. त्यातही त्याला सर्व शेड्युल्ड कास्ट मतदारांचा नाही; तर शेड्युल्ड कास्टमधील केवळ महार समाजाचा पाठिंबा शिल्लक राहिला होता. याची जाणीव या पराभवानंतर डॉ. आंबेडकर यांनाही झाली म्हणून त्यांनी आपल्या पक्षास केवळ शेड्युल्ड कास्ट जनतेचा नव्हे; तर सर्वजातीय आणि सर्वधर्मीय अल्पसंख्याक शोषित, पीडित, दलित आणि मागासवर्गीयांचा पक्ष या स्वरूपात विस्तारीत करण्याचे ठरवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना १९५६ साली केली. पण या पक्षासाठी ते वेळ देऊ शकले नाहीत. त्याच वर्षी १४ ऑक्टोबरला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतर दोन महिन्याच्या आतच त्यांचे ६ डिसेंबर १९५६ ला महापरिनिर्वाण झाले. (Dr. B R Ambedkar)

डॉ. आंबेडकर यांना खरेतर जनतेने निवडून द्यायला हवे होते, असेच माझे मत आहे. निवडणुकीतील पराभव डॉ. आंबेडकरांनी दोन्ही वेळेला प्रगल्भ स्टेट्समनप्रमाणे स्वीकारून पुन्हा जनाधार मिळविण्याचा प्रयत्न केला. कारण लोकशाहीवर त्यांचा विश्वास होता. आज ७० वर्षानंतरही मतदारांवर जात, धर्म या बाबींचा मतदान करताना प्रभाव दिसून येतो. १९५०-६०च्या दशकातील मतदार तर या दोषाने किती प्रदूषित असतील याचा विचारही करणे शक्य नाही. जनता हीच मग ती कशीही असो तीच सरकार बनवते, तीच उमेदवार आपल्या लायकीनुसार निवडते. तीची लायकी ठरविण्याचा अधिकार कोणासही नाही, तिचे प्रबोधन गरजेचे आहे म्हणूनच आंबेडकरांनी राजकारणाबरोबर समाज प्रबोधन करण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारला. संपूर्ण भारत बौद्धमय होईल, असा विचार केला होता. आंबेडकर यांचे हे अपुरे कार्य पूर्ण करणे हेच आपल्या हातात आहे.

काँग्रेसने आंबेडकरांचा पराभव केला हे तेवढेच असत्य आहे, जेवढे अमुक तमुक पक्ष भाजपाची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसचे काही समर्थक करतात. हा तर्क जसा चुकीचा तसे भाजपाने एक अजब तर्कट वॉटस युनिव्हर्सिटीतून विकसित केले आहे. जणू काही एखाद्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात उभारलेल्या उमेदवाराच्या विजयाची काळजीही त्याच पक्षाने घ्यावी. (Dr. B R Ambedkar)

भारतातील प्रत्येक पक्षाला, प्रत्येक उमेदवाराला आपण लढवतो ती निवडणुक वैध मार्गाने जिंकण्याचा अधिकार आहे. निवडून येणे ही प्रत्येक उमेदवाराची स्वत:ची जवाबदारी असते आणि विरोधी पक्षातील उमेदवार निवडून यावा ही जवाबदारी कोणत्याही पक्षाची नसते. त्यामुळे त्यात पराभूत करून कोणी अन्याय केला ही बाब निरर्थक असते. पण जनतेने डॉ. आंबेडकरांना १९५२ साली किंवा १९५४ साली निवडून द्यायला हवे होते. ते अधिक चांगलं झालं असतं!

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

पोटातले ओठावर!