Deshom Guru : सावकार विरोधी सशस्त्र आंदोलन जागविणाऱ्या योद्धा

Deshom Guru

     झारखंडचे आदिवासी ज्यांना देशोम गुरू म्हणत ते ८१ वर्षीय शिबू सोरेन यांनी आज दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संथाली भाषेतील देशोम गुरूचा अर्थ आहे, दाही दिशांचा परत्वे देशाचा गुरू.

– किशोर मांदळे

    १३ वर्षांच्या पौगंडावस्थेच्या सीमेवरील अडनिड्या वयात शिबू सोरेन यांनी आपल्या संघर्षशील पित्याची, सोबरन मांझींची हत्या पाहिली (२७ नोव्हें १९५७). ते शिक्षकी पेशात होते. तत्कालीन बिहारच्या निबिड अरण्यातील आदिवासींची तेथील महाजन उर्फ सावकार अतोनात लूट करीत. महाजनांची रगेल व रंगेल तरुण मुले आदिवासी महिलांवर अनन्वीत लैंगिक अत्याचारही करीत. याविरोधात सोबरन यांनी संघर्ष छेडल्यावर एका षडयंत्राद्वारे त्यांची महाजनांनी निर्घृण हत्या केली. पित्याच्या हत्येनंतर शिबू सोरेन यांच्या जीवनात थेट महाजनविरोधी सशस्त्र लढ्याचे पर्व सुरू झालेले दिसते. त्यांनी महिलांच्या हातात हंसिया (कोयता) व पुरुषांच्या हातात तीर कामठा दिला. महिला शेतातील उभे पीक कापून काढायच्या व शेतांच्या चौफेर पुरुष तीर कामठा घेऊन संरक्षण कवच उभे करायचे. या आंदोलनाला ‘धनकटनी’ म्हणत. महाजनांनी पोलिस प्रशासनाची मदत घेऊन ही आंदोलने चिरडण्याचे केलेले प्रयत्न संथालांच्या एकजूटीपुढे निष्प्रभ ठरले. यांत अनेकांना जीव गमवावे लागले पण अखेर स्वतंत्र झारखंड राज्य घेऊनच हा संघर्ष थांबला.

    १९७२ ते १९७६ या कालखंडात पेटरवार, जैनामोड, बोकारो, धनबाद या जंगलातील महाजनांनी फसवून लाटलेल्या शेकडो एकर जमिनी आदिवासींनी सोडवून घेतल्या. हा लढा प्राय: हिंसक वळण घेई व सिबू सोरेन यांना भूमीगत व्हावे लागत असे. आदिवासींच्या वनजमिनी हक्काचे हे लढे ‘सोनोत संताल’ या संघटनेद्वारे शिबू सोरेन लढत. असेच लढे लढणाऱ्या कुडमी नेता विनोद बिहारी महतोंची ‘शिवाजी समाज’ नावाची संघटना व कॉ. ए.के. रॉय हे शिबू सोरेनशी संलग्न झाल्यावर ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ १९७३ ला स्थापन झाला. या राजकीय पक्षाद्वारे ‘दुमका’ मतदारसंघातून शिबू सोरेन १९८०ला खासदार झाले. बिहार विधानसभेच्या संथाल परगण्यातील १८ पैकी ९ जागा ‘झामुमो’ने जिंकल्या.

    १५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारमधून १८ जिल्हे वेगळे काढून स्वतंत्र झारखंड राज्य निर्माण झाल्यावर शिबू सोरेन यांना तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान लाभला तरीही त्यांच्या एकूण बंडखोर स्वभावामुळे ते एकदाही आपला कार्यकाल पुरा करू शकले नाहीत. २००५(१० दिवस), २००८(१४५दिवस), २००९(१५३दिवस) ते मुख्यमंत्री राहिले. तीन वेळा लोकसभेत व एकदा राज्यसभेत संथाल आदिवासींचे प्रतिनिधीत्व केलेल्या शिबू सोरेन यांना डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये कोळसा मंत्री बनण्याची संधी मिळाली. त्यातही एकदा जुन्या खून, अपहरण वगैरेच्या गुन्ह्यांमुळे व्यत्यय आला. त्यातून जामीन मिळून पुन्हा मंत्री झाले.

    त्यांनी महाजन सावकारांविरोधात सशस्त्र संघर्ष केल्यामुळे शत्रू सतत पाठीवर घेऊनच वावरावे लागले. २५जून २००७ ला त्यांना जेलकडे नेणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यावर बॉम्ब हल्ला झाला. पण त्यातून ते सुखरूप बचावले. त्या खटल्यात सूडबुद्धी होती. २३ ऑगस्टला न्यायालयाने त्यांना मुक्तही केले.

    शिबू सोरेन यांनी संथाल आदिवासींना जीवावर उदार होऊन लढण्यासोबतच शिक्षण, स्वावलंबन, व्यसनमुक्ती हे मूल्यभान देखील दिले. संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवण्यापर्यंत ते आदिवासींना घेऊन आले. त्यांना तीन मुले (दुर्गा, हेमंत, बसंत) व एक मुलगी (अंजली) आहे. मुलगा हेमंत सध्या झारखंडचा मुख्यमंत्री असून कॉंग्रेसच्या आघाडीत भाजपविरोधात लढतो आहे. २०१९ला दुमका मतदारसंघातून भाजपाकडून शिबू सोरेन पराभूत झाल्यावर हे कुटुंब विद्यमान राजकीय परिस्थितीत आपली सत्ता टिकविण्याची धडपड करताना दिसते आहे. ही धडपड सरळ रेषेत आहे, असं म्हणता येणार नाही. शिबू सोरेन यांची एक सून भाजपकडून आमदार आहे, एवढं सांगितले तरी पुरेसे आहे.

    शिबू सोरेन यांचे समग्र जीवन, सशस्त्र साहसवादी बंडखोरीचा रोमांचक रस्ता आणि संसदीय मार्गाचा लांब पल्याचा मूल्यात्मक संघर्षांचा रस्ता यातील पेच ओळखण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते.  संथालांच्या या देशोम गुरूला अखेरचा क्रांतिकारी सलाम !

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर