मुंबई : प्रतिनिधी : नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून महानगरपालिका निवडणुकाही लवकरच होत आहेत. परंतु निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्या अद्याप प्रकाशित केल्या जात नाहीत. मतदारयाद्या प्रकाशित करण्यास होणारा विलंब चिंताजनक आहे. राज्य सरकारने यात लक्ष घालून निवडणूक आयोगाने बीएमसीसह सर्व महापालिकांसाठीची मतदारयादी विना विलंब प्रकाशित करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. (Demand for Varsha Gaikwad)
निवडणूक आयोग व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबत पत्र पाठवून ही मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने पहिल्यांदा चार नोव्हेंबरला मतदारयादी प्रकाशित करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मतदार यादी १४ नोव्हेंबरला प्रकाशित करु, असे सांगितले. पण अजुनही मतदारयादी जाहीर केलेली नाही. मतदार यादी प्रकाशित करण्यात विलंब का होत आहे, याबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळे झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह सातत्याने उघड केले आहे. महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये असाच घोळ झाल्याचेही राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे. निवडणुकीसाठी मतदार याद्या महत्वाच्या आहेत त्या वेळेवर प्रकाशित केल्या पाहिजेत. पण निवडणूक आयोगाचा एकूण कारभार पाहता काही गडबड घोटाळा तर केला जात नाही ना, असा संशय बळावत चालला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Demand for Varsha Gaikwad)