आजच्या तरुणाईची सर्वांगसुंदर `… लव्हस्टोरी`

उदय कुलकर्णी, मुंबई

निर्माते चंद्रकांत लोकरे (एकदंत क्रिएशन्स), सहनिर्माते भूषण लिमये निर्मित ऋषिकांत राऊत लिखित आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित `ज्याची त्याची लव्हस्टोरी` ह्या नाटकाबद्दल एक ठाम विधान सुरुवातीलाच करतो – हे नाटक प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट आहे. असं बघा नाटकाचा पडदा उघडल्याबरोबर आपल्याला प्रथम दिसतं ते नेपथ्य. अनेक वर्षांपूर्वी नेपथ्याला टाळी असे कौतुकाने म्हटले जायचे, नंतर मात्र असे म्हणणे वाईट समजले जायला लागले. नेपथ्य नाटकाच्या मागणीनुसार हवे, उगाच डोळ्यावर येणारे नको असे समीक्षक म्हणतात. या नाटकाच्या बाबतीत पडदा उघडल्याबरोबर आपल्याला दिसते बोगनव्हिला रिसॉर्ट. याचा मालक विवेक हा आर्किटेक्ट आहे आणि त्याची सौंदर्यदृष्टी चांगली आहे, शिवाय हे रिसॉर्ट आहे. त्यामुळे याची सजावट छानच असायला हवी व ती तशीच आहे. रंगीबेरंगी फुले, खोल्या, त्यांची फुलांवरुन ठेवलेली नावे हा नजारा दिसतो आणि प्रसन्न वाटतं. रिसेप्शनिस्टचं अर्धवर्तुळाकार एक डेस्क असतं तेही रंगमंचाच्या डाव्या बाजूला आहे आणि मध्ये मुव्हमेंटसाठी जागाही आहे. खोल्या थोड्या वरच्या लेव्हलवर आहेत. हे बहारदार नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे. (Jyachi Tyachi Love Story)

रंगभूषा, वेशभूषा प्रशंसनीय

दुसरी बाब नाटक बघताना नंतर जाणवत राहाते ती यातील सर्वांची वेशभूषा जी व्यक्तिरेखेनुसार आहे व छान आहे. यात प्रिया ही कॉर्पोरेटमध्ये काम करणारी एक करियरीस्ट मुलगी आहे. तिचे ड्रेसेस टॉपक्लास, ब्रांडेड असावेत असे सूट, ट्राउझर टॉप आणि त्याचे रंग अतिशय छान. एक संत्रा कलरचा टॉप तर फारच छान. या उलट आरती ही रीळच्या आहारी गेलेली गावातील तरुणी आहे. ती सतत रीळ बनवत असते आणि तिचं व्यक्तिमत्व रंगीबेरंगी आहे, तिची वेशभूषाही तशीच रंगीबेरंगी आहे. प्रकाश पाटील हा तिचा नवरा. हनिमूनसाठी हे जोडपे रिसॉर्टवर आलेले आहे, तो शेतकरी आहे म्हणून प्रकाशला लगेच धोतर दिलेले नाही की जीन्स दिलेली नाही. त्याचा आणि रिसॉर्टचा मालक विवेक याचा मित्र अमित या दोघांचेही टी-शर्ट उत्तम. यात शलाका ही एक समजूतदार सोबर अशी व्यक्तिरेखा आहे. तिचे कपडेही तशाच सौम्य रंगाचे आहेत आणि विवेकची वेशभूषा कॅज्युअल आहे. वेशभूषा मृणाल देशपांडे यांनी केलेली आहे आणि शरद सावंत यांनी रंगभूषा केलेली आहे. प्रशंसनीय काम.  

अजित परब यांचे संगीत परिणामकारक आहे, अगदी नाटकाच्या अंती वाजणारी धूनसुद्धा लक्ष वेधून घेते. शीतल तळपदे यांची प्रकाशनयोजना प्रसंगांना पुरक आहे. (Jyachi Tyachi Love Story)

जादुची छडी

लेखक ऋषिकांत राऊत आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी मिळून नाटक असं रचलं आहे की यात भरपूर विनोद येतात, आपण हसत असतो. आणि त्याच वेळेला जेव्हा नाटक गंभीर व्हायचं तेव्हा ते गंभीर होतं. आणि आपण त्यातही गुंततो. एखाद्या नाटकात खूप विनोद होतात तेव्हा चिंता वाटते याचे क्लोजर कसे होणार? सहसा शेवटी काहीतरी सामाजिक उद्देश दाखवणे, बोध देणे असे केले जाते. या नाटकात तसे काहीही केलेले नाही हे फारच छान. कृत्रिमपणे काही घुसवलेले नाही. तसेच शेवटी जोड्या जुळवणे – लग्न जुळवणे असेही केलेले नाही यामुळे नाटक क्लीशे होत नाही.  नाटकात मॅजिक वॅन्ड अर्थात जादुची छडी या कल्पनेचा वापर केलेला आहे, ती कल्पना वापरत मी म्हणतो प्रत्येक समस्या सुटेल अशी जादुची छडी कोणाकडे नसते, लेखकाकडे तरी ती कशी असेल? (Jyachi Tyachi Love Story)

एखादा कलाकार पॉज – विश्रामासाठी प्रसिद्ध असतो. पूर्ण नाटकच पॉज- विश्रामवर ठेवणे हे जोखमीचे काम असते. कारण रंगमंच रिकामा असेल किंवा तिथे कलाकार असतील पण तरीही निस्तब्धता असेल, काही हालचाल नसेल तर प्रेक्षकांमध्ये चुळबूळ सुरू होऊ शकते. हा नाटकातील विश्राम किती सेकंदाचा ठेवायचा ते कौशल्याचे काम असते. दिग्दर्शकाकडे आत्मविश्वास असावा लागतो. दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांच्याकडे हे दोन्ही आहे. ते हुशार दिग्दर्शक आहेत.

तीन पुरुष व्यक्तिरेखा व तीन स्त्री व्यक्तिरेखा नाटकात असल्या तरीही यात तीन जोडपी नाहीत. प्रकाश व आरती हे एक जोडपे आहे, अमित व प्रिया हे लिव्हइनमध्ये राहात असले तरीही प्रियाचा फंडा अगदी क्लियर आहे. हे नाते लग्नापर्यंत न्यायचेच नाही. विवेक व शलाका यांची ओळख आहे. या सहाही व्यक्तिरेखांच्या कहाण्या अतिशय खुबीने यात आणलेल्या आहेत. प्रत्यक्षातही रिसॉर्टमधील कोणीतरी मॅनेजर- अँकर तिथे आलेल्या प्रवाशांना-उतारूंना एकत्र आणून संध्याकाळी काही हौसेमजेचे खेळ खेळतात. ते दृश्य यात परिणामकारकरितीने वापरलेले आहे. त्याद्वारे व्यक्तिरेखांच्या मनातील सत्य, व्यथा बाहेर आणलेल्या आहेत. (Jyachi Tyachi Love Story)

कलाकारांची मस्त भट्टी

कलाकारांच्या कामाबद्दल यात आरती ही व्यक्तिरेखाच अत्रंगी आहे – सतत रीळ बनवणारी आणि तिने एक चिरका आवाज लावून नुसती धमाल केली आहे. रीळच्या शेवटी ती एक पाय वर उचलून लावा जोर म्हणते, हे पालूपदासारखे तिला दिलेले आहे. त्याची मजा आहेच. हे काम शर्मिला शिंदे यांनी केलेले आहे ते एकदम उत्तम. याबरोबरच एकदा त्यांचा उपरोधिक संताप, कारूण्यासह छान पोचवला. शर्मिला शिंदे यांचा खरंच आवाज चिरका आहे का ते नंतर भेटून चेक करायचं राहून गेलं! आरतीचा नवरा प्रकाश मात्र या रीळ उधाणाला वैतागलेला आहे. या भूमिकेत पूर्णानंद वांढेकर आहेत. ही व्यक्तिरेखा अर्कचित्र नसूनही त्यांनी पुरेपूर हशे वसूल केलेले आहेत, एकही जागा सोडलेली नाही, त्याचबरोबर त्यांचं दुःख व राग हेही व्यवस्थित दाखवलेलं आहे. ग्रामीण आणि शहरी यामध्ये अधांतर अवस्थेत सापडलेला हा तरुण त्यांनी उत्तम रंगवला आहे. जेव्हा आवश्यक आहे तेव्हा शर्मिला शिंदे व पूर्णानंद वांढेकर पूर्ण सुटलेले आहेत. विवेकच्या भूमिकेत सुयश टिळक आहेत. त्यांनी वरवर बेफिकीर, कॅज्युअल असणारा तरूण छान रंगवला आहे. परंतु नंतर त्याच्या आत काय दुःख आहे तेही उत्तम दाखवलेले आहे. शलाकाच्या भूमिकेत सुरुची आडारकर आहेत. सुरुवातीला शलाका रिसॉर्टवर येते तेव्हा ती हसूनखेळून बोलते कारण विवेकबरोबर तिची आधीच ओळख आहे. त्या दोघांची टोलवाटोलवीही छान.  नंतर जशी शलाकाची व्यक्तिरेखा खुलत जाते व तिच्याविषयी जास्त माहिती मिळत जाते आपल्याला एक समजूतदार स्त्री दिसते. तिच्या काय समस्या आहेत, काय तणाव आहे कळतं. हे अगदी गहराईने सुरुची आडारकर यांनी प्रगट केले आहे, इतकं की असं वाटत होतं हाच त्यांचा स्वभाव किंवा स्थायीभाव असावा, परंतु नाटकानंतर प्रत्यक्षात त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्यातील मिश्किलपणा जाणवला.

तीस लाख पॅकेजची तरुणी

अमितच्या भूमिकेत रोहित हळदीकर आहे. ते विवेकचे मित्र, त्याला मदत करत आहेत, त्यांनीही विनोदी प्रसंग मस्त रंगवले आणि प्रियाबरोबरचे त्यांचे प्रसंग चांगलेच जमलेले आहेत.  त्यांनीही चांगलाच रिलीफ दिलेला आहे. प्रिया ही कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुणी. ही व्यक्तिरेखा  शर्वरी कुलकर्णी-बोरकर यांनी केली आहे. तीस लाख रुपये पॅकेज असणारी एक तरुणी मराठी नाटकात बहुदा पहिल्यांदाच आली असावी, त्याबद्दल प्रथमतःच लेखक दिग्दर्शक आणि पूर्ण टीमचे अभिनंदन. मराठी समाज व इतर रंगकर्मी यांनी या गोष्टीची विशेष नोंद घ्यावी कारण हेसुद्धा एक वास्तव आहे. ही तरूणी पूर्णपणे कामात गढून गेलेली आहे, त्यातही कॉर्पोरेट लाईफमधील आव्हाने व त्यातील तणाव तिच्यासोबत आहेत. हे काम शर्वरी कुलकर्णी-बोरकर यांनी फार उत्तम केलेलं आहे. त्यामुळेच प्रियाचं दुःख आपल्यापर्यंत पोचतं. अशी कॉर्पोरेट लाईफमध्ये करिअर करणारी, त्यापुढे नात्याला महत्त्व न देणारी, सिंगलच किंवा त्यापेक्षा खरंतर लग्न न करता राहायची ठरवणारी ही तरूणी आहे. तिला त्याबद्दल काहीही गिल्ट- अपराधभावना दिलेली नाही हे उल्लेखनीय. त्यासाठी लेखक-दिग्दर्शक यांचे आभार. तिला ‘सुधरवण्याचे’ सत्कृत्य केले नाही यासाठीही पुन्हा आभार. कॉर्पोरेट लाईफमधील स्त्री म्हटल्यावर एक पेच सहसा मराठी नाटकात दाखवला जातो ज्यामुळे ती टोकाचे पाऊल उचलते. इथेही टोकाचे पाऊल आहे, त्यामुळे तोच पेच असणे आवश्यक होतं. प्रियाबाबत आणखी एक मुद्दा, आई म्हणते मुलाचे स्थळ आले आहे. प्रिया उत्तर देते त्याचं पॅकेज बारा लाख आहे, त्याला तीस लाख पॅकेज असणारी मुलगी चालेल का हे आधी विचार. (Jyachi Tyachi Love Story)

आजच्या तरुणाईचे नाटक

मराठीत नाटकाची एक दीर्घ परंपरा आहे, त्या परंपरेनुसार काही गोष्टी त्यात असतात. हे नाटक आजच्या तरुणांचेच आहे, आजच्या परिस्थितीवरच आहे, ते चांगले दाखवलेले आहे त्याचबरोबर आपल्या नाट्यपरंपरेतील धागेही त्यात आहेत. जसे पूर्वी नाटकात पालूपद वापरले जायचे. ते नंतर बंद झाले. त्याची झलक इथे मिळते. आरतीने मोबाईल व त्यावर रीळ काढणे सुरू ठेवल्यामुळे हनिमून मार्गी लागलेला नाही. प्रकाश वैतागलेला आहे. शेवटी आरती मोबाईल ऑफ केला आहे सांगते. तो इशारा प्रकाशच्या लक्षात येत नाही. मग पुन्हा सांगते तेव्हा तो त्याला कळतो आणि तो तिच्याजवळ जातो. पूर्णानंद वांढेकर यांनी हा प्रसंग मस्त खुलवला आहे. यावेळी इशारा कळल्यावर तिच्याकडे जाताना त्या चालीत व देहबोलीत परंपरेतील अभिनयाची झलक दाखवलेली आहे. त्यातून प्रचंड हशा मिळतो. जयंत पवार यांच्या `काय डेंजर वारा सुटलाय` नाटकात पूर्णानंद वांढेकर यांनी बबन येलमामे ही भूमिका केली होती. त्यात ते गावावरून आलेला एक  स्थलांतरित कंगाल मजूर होते, संतप्त होते. ती भूमिका कायम लक्षात राहणारी, आता ही एकदम त्याविरुद्ध, पण हीसुद्धा लक्षात राहील. (Jyachi Tyachi Love Story)

प्रचलित राजकारणावर विनोद पेरणे हेही मराठी नाटकांचे वैशिष्ट्य. या नाटकातही महायुती – महाविकास आणून विनोद पेरले आहेतच. त्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीचे स्मरण करत हे नाटक बघण्यापासून तुम्ही वंचित राहू नका असे मी म्हणतो.

Related posts

अलविदा सुपर नानाजी!

Report in Sputnik India: मोसादचा ‘तो’ अहवाल अन् रशियन प्रोपगंडा!

Mahesh babu : तेलगू सुपरस्टारला ईडीची नोटीस