‘लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा फोटो छापण्यात निष्काळजीपणा

Controversy over Dr. Ambedkar's photograph in Lokrajya magazine

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या एप्रिल २०२६ च्या अंकात, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र अत्यंत बेजबाबदारपणे ‘उलटे’ छापल्याचा (मिरर इमेज) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  आ. डॉ. नितीन राऊत यांनी  विधिमंडळात स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारला धारेवर धरले. या अक्षम्य चुकीचा निषेध करत, हा प्रकार म्हणजे केवळ तांत्रिक चूक नसून महामानवांच्या अस्मितेशी खेळ असल्याचा आरोप त्यांनी केला. (Controversy over Dr. Ambedkar’s photograph in Lokrajya magazine)

आमदार डॉ. नितीन राऊत यांचा स्थगन प्रस्ताव

 स्थगन प्रस्तावावर बोलताना सरकारचा खरपूस समाचार घेत डॉ. राऊत म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हे मासिक केवळ पुस्तक नसून महाराष्ट्राचा शासकीय दस्तावेज आहे. या मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र उलटे छापल्यामुळे ते डावखुरे असल्याचा चुकीचा आणि खोडसाळ संदेश जनमानसात जात आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या पार्श्वभूमीवर असलेला ‘भारतरत्न’चा लोगोसुद्धा उलटा छापला आहे. हा Emblems and Names Act, 1950 आणि Prevention of Insults to National Honour Act, 1971 या केंद्रीय कायद्यांचा थेट भंग असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ५-५ टप्प्यांवर प्रूफ-चेकिंग होत असताना कोणाच्याही हे लक्षात कसे आले नाही, असा सवाल करत, हे सरकार महामानवांच्या अस्मितेबाबत किती बेफिकीर झाले आहे, हे यातून स्पष्ट होत असल्याचे डॉ. राऊत म्हणाले. (Controversy over Dr. Ambedkar’s photograph in Lokrajya magazine)

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

या घोर चुकीबद्दल मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची या सभागृहात तात्काळ बिनशर्त माफी मागून बाजारातील सर्व छापील अंक जप्त करून नष्ट करावेत आणि ऑनलाईन माध्यमांतून पीडीएफ आवृत्ती त्वरित हटवावी तसेच संबंधित संपादक, माहिती अधिकारी आणि जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ७ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात यावा. या मागण्या डॉ. राऊत यांनी सभागृहात लावून धरल्या. विधीमंडळाचे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार  यांनीही सरकारचा तीव्र निषेध केला.

२४ तासांत कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 या गंभीर विषयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले की, ही घटना अतिशय गंभीर असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ‘लोकराज्य’ मासिकात चुकीच्या पद्धतीने (रिव्हर्स) छापला गेला आहे, हे सत्य आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि येत्या २४ तासांच्या आत यासंदर्भात कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Controversy over Dr. Ambedkar’s photograph in Lokrajya magazine)

Related posts

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

मुख्यमंत्र्याकडून कोल्हापुरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अहवाल करण्याच्या सूचना