Constitution club Election: भाजपमधील संघर्षात अमित शाह यांना धक्का

Constitution club Election

देशात सध्या इव्हीएमवरून संघर्ष सुरू असला तरी कुठल्याही निवडणुकीचं वातावरण नाही. परंतु राजधानी दिल्लीत मात्र एका निवडणुकीची चर्चा खूप रंगली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे चर्चेला अधिक रंगत आली आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या या निवडणुकीत भाजपचे राजीवप्रताप रूडी जिंकले असले तरी त्यांनी आपल्याच पक्षाच्या संजीव बलियान यांचा पराभव केला आहे. (Constitution club Election)

डॉ. विजय चोरमारे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवडणूक कौशल्याची चर्चा सातत्याने होते. अनेकदा ते धाडसी निर्णय घेतात आणि हे धाडस त्यांच्या अंगाशीही येत असते. आपल्याला आठवत असेल की २०१७ साली त्यांनी गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एक जादा उमेदवार उभा केला. आणि काँग्रेसच्या अहमद पटेल यांना राज्यसभेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु ती निवडणूक काँग्रेसने जिंकली आणि भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर गेला. त्या विजयामुळं काँग्रेसमध्ये जो उत्साह संचारला त्यामुळं विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तोंडाला फेस आला होता. त्या निवडणुकीची आठवण कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीमुळं आली आहे. (Constitution club Election)

राजीव प्रताप रुडी यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या प्रशासन सचिव पदाच्या निवडणुकीत संजीव बालियान यांचा पराभव करून आपले पद कायम राखले. राजीव प्रताप रूडी हे भाजपचे परंतु सध्या अडगळीत टाकलेले आक्रमक नेते. प्रवक्ते म्हणून उत्तम छाप पाडलेले. त्यांचा विजय भाजपसाठी थेट धक्का मानला जातो. कारण भाजपमधील अंतर्गत गटबाजी या निवडणुकीने चव्हाट्यावर आणली आहे. भाजपने साईडलाईन केलेल्या राजीवप्रताप रुडी यांना काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, तेलुगू देसम पक्ष अशा विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. भाजपच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत होती. त्यामुळे ही निवडणूक भाजपमधील अंतर्गत मतभेदांचे आणि नेतृत्वाच्या स्पर्धेचे प्रतीक बनली आहे. (Constitution club Election)

संजीव बालियान यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खासदार निशिकांत दुबे यांचा पाठिंबा असल्याची सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चा होती. काही पत्रकारांनी एक्सवर असा दावा केला आहे की, भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये नवीन नेतृत्व हवे होते. बालियान यांची उमेदवारी याच दिशेने टाकलेले एक पाऊल होते. भाजपचे काही वरिष्ठ नेते राजीवप्रताप रुडी यांच्या दीर्घकालीन वर्चस्वाला आव्हान देऊ इच्छित होते. तरीही, रुडी यांनी शंभरहून अधिक मतांनी विजय मिळवला. ज्यामुळे त्यांचा वैयक्तिक प्रभाव आणि रणनीतिक कौशल्य दिसून आले. (Constitution club Election)

विशेष म्हणजे भाजपचे नेते असलेल्या रुडी यांना काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर विरोधी नेत्यांचा पाठिंबा मिळाला. समाजवादी पक्षाचे अक्षय यादव आणि दक्षिण भारतातील काही खासदारांचा समावेश असलेल्या रुडी यांच्या पॅनलमुळे त्यांना व्यापक समर्थन मिळाले. त्याचमुळे रुडी यांचा विजय हा इंडिया आघाडीचा विजय असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी भाजपच्या अंतर्गत मतभेदांचा फायदा घेतला. अर्थात हा भाजपला धक्का असला तरी हा विजय पूर्णपणे काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचा म्हणता येणार नाही. रुडी यांचा विजय हा त्यांच्या वैयक्तिक प्रभावाचा, क्लबमधील दीर्घकालीन कामाचा आणि विरोधकांच्या रणनीतीचा परिणाम आहे.

ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप अशीच होती. त्याचमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पहिल्यांदाच उघड करणारी ठरली. भारतीय जनता पक्षात तेही राजधानी दिल्लीत हे घडावे, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रुडी आणि बालियान हे दोघेही भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. परंतु त्यांच्या उमेदवारीने पक्षातील वेगवेगळ्या गटांना समोर आणले. काही अहवालांनुसार, रुडी यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाठिंबा होता. तर बालियान यांना अमित शहा आणि निशिकांत दुबे यांचा पाठिंबा होता. सोशल मीडियावर काही पत्रकारांनी याला भाजपच्या शीर्ष नेतृत्वातील सत्ता आणि प्रभावाची लढाई असे संबोधले. भाजपच्या खासदारांचा पाठिंबादेखील विभागला गेला होता, ज्यामुळे पक्षातील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली.

निवडणुकीला इतके महत्त्व का मिळाले?

कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक यापूर्वी कधीही इतकी चर्चेत नव्हती. विशेष म्हणजे यंदा २५ वर्षांनंतर प्रशासन सचिव पदासाठी मतदान झाले. साठ टक्क्यांहून जास्त मतदान झाले. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अमित शहा यांसारख्या दिग्गज नेत्यांनी मतदानात सहभाग घेतला, ज्यामुळे या निवडणुकीचे राजकीय महत्त्व वाढले.

कॉन्स्टिट्यूशन क्लबचे प्रशासन सचिव पद क्लबच्या कार्यकारी उपक्रमांचे संचालन करते. कॉन्स्टिट्यूशन क्लब हा विद्यमान आणि माजी खासदारांचा एक प्रभावशाली मंच मानला जातो.

निवडणुकीत जातीय समीकरणेही महत्त्वाची ठरली. राजीवप्रतीप रुडी हे ठाकूर आणि संजीव बालियान हे जाट. त्याचमुळे राजपूत आणि जाट लॉबीजमधील ही लढत मानली जात होती. रुडी यांना राजपूत लॉबीचा मजबूत पाठिंबा मिळाला, तर बालियान यांना जाट लॉबी आणि भाजपच्या एका गटाचा पाठिंबा होता.

काँग्रेस आणि इंडिया आघाडीने रुडी यांना पाठिंबा देऊन भाजपमधील अंतर्गत मतभेदांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. कॉन्स्टिट्यूशन क्लब हे खासदारांचे नेटवर्किंग आणि राजकीय चर्चेचे केंद्र आहे. प्रशासन सचिव पदावर नियंत्रण ठेवणे म्हणजे क्लबच्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे. ही निवडणूक भाजपमधील अंतर्गत गटबाजी, जातीय समीकरणे, आणि विरोधकांच्या रणनीतीमुळे लक्षवेधी ठरली. रुडी यांचा विजय हा त्यांच्या वैयक्तिक प्रभावाचा आणि विरोधकांच्या पाठिंब्याचा एकत्रित परिणाम असला, तरी याने भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता आणि नेतृत्वाच्या स्पर्धेचा मुद्दा अधोरेखित केला. या निवडणुकीने भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे दर्शन एवढ्या मोठ्या मंचावर पहिल्यांदाच घडवले. हा विजय काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचा पूर्ण विजय नसला, तरी भाजपच्या अंतर्गत मतभेदांचा फायदा घेण्यात विरोधक यशस्वी ठरले. भाजपमधील नेतृत्वाची स्पर्धा त्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचमुळे निवडणुकीला विशेष महत्त्व आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर