सोलापुरात ऐनवेळी काँग्रेसचा अपक्षाला पाठिंबा

सोलापूर : प्रतिनिधी : सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे मविआतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली. सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सकाळी मतदान केले. त्यांनी त्यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली.

महाविकास आघाडीने अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाकडून सुपारी घेऊन अपक्षाला पाठिंबा दिला, असा संताप उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी व्यक्त केला.

हे दोघेही काँग्रेसचे नसून ही भाजपाची बी टीम आहे. प्रणिती शिंदे स्वत:च्या राजकारणासाठी पक्षाचे काम करत नाहीत. त्यांना लोकसभेला भाजपाने मदत केली अशी चर्चा आहे. त्यामुळे आता त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी दिलेले उमेदवार अमर पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल. यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर कुठेही खासदार म्हणून निवडून येणार नाही याचा बंदोबस्त शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाहीत. शिवसैनिकांचा केसाने गळा कापण्याचे काम तुम्ही केले, असा आरोपही त्यांनी केला.

तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही, प्रणिती शिंदे यांनीही केला नाही. प्रणिती शिंदे यांना शिवसैनिकांनी मदत केली नसती तर स्वप्नातही खासदारकी बघता आली नसती. डिपॉझिट जप्त झाले असते, असे ते म्हणाले.

काडादी संयमी उमेदवार : सुशीलकुमार

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा मतदार संघ आहे. येथून मी दोनदा निवडणूक लढविली आहे. जागावाटपात ठाकरे शिवसेनेने घाई केली. त्यामुळे मतदारसंघ शिवसेनेला सुटला. येथे काँग्रेसची मोठी ताकद आहे. तसेच धर्मराज काडादी हे शांत, संयमी उमेदवार असल्याने ते सर्वांचे ऐकून घेतात. त्यांना पुढे मोठे भविष्य असल्याने काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी