बिश्नोई टोळीकडून काँग्रेस आमदाराला धमकी; विधानसभेत विरोधकांचा हल्लाबोल 

Congress MLA threatened by Bishnoi gang

जमीर काझी : मुंबई : काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना गँगस्टर बिश्नोई टोळीकडून वारंवार धमकीचे फोन येत असताना राज्य सरकार व पोलीस त्याकडे  गांभीर्याने पहात नसल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी विधानसभेत गदारोळ घातला. यावेळी विरोधी सदस्यांनी घोषणाबाजीकरीत सभात्याग केला. (Congress MLA threatened by Bishnoi gang)

वडेट्टीवारांकडून स्थगन प्रस्ताव

 काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केकेली .शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरही चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळली. सरकारकडून मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकार ही तक्रार गांभीर्याने नोंदवेल आणि संबंधित आमदारांकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती मागवण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र, सरकारच्या उत्तराने असमाधानी विरोधी सदस्यांनी सरकार या मुद्द्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा टाळत असल्याचा आरोप केला. याच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. (Congress MLA threatened by Bishnoi gang)

गँगस्टर लोणकरचा आमदार पठाण यांना खंडणीसाठी फोन

 बुधवारी रात्री आमदार साजिद पठाण यांना अमेरिकेतून कार्यरत असलेल्या गँगस्टर शुभम लोणकर  याचा खंडणीसाठी फोन आला. मुख्यमंत्री  फडणवीस यांनी एक दिवस आधीच सभागृहात परदेशातून आणि देशांतर्गत कार्यरत गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही धमकीचा फोन येणे गंभीर असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री सर्व आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचे स्पष्ट करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यांनी विरोधकांवर या मुद्द्याचे राजकारण करण्याचा आरोपही केला.

मुख्यमंत्र्यांकडून सरंक्षणाचे आश्वासन, तरीही धमक्यांचे फोन

साजिद पठाण यांनी सांगितले की, पहिल्यांदा धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री स्वतः त्यांना फोन करून संरक्षणाचे आश्वासन दिले होते आणि सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, पुन्हा धमकीचे फोन येत असल्याने नेमके काय सुरू आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मुख्यमंत्र्यांनी सभागृहात टोळ्यांचा बंदोबस्त करू ,असे सांगितले आणि काही तासांतच मला खंडणीचा फोन आला. मला धमक्यांची भीती नाही,” असे पठाण म्हणाले. ते पुढे म्हणाले “याच लोकांनी बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. मला सुरक्षा नको, पण माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी हवा आहे.”

लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवली जाईल

वडेट्टीवार यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना धमकीनंतर सुरक्षा देण्यात आली असल्याचा उल्लेख करत, लोकप्रतिनिधींनाही तशाच प्रकारचे संरक्षण देण्याची मागणी केली.या प्रकरणावर अध्यक्ष  नार्वेकर यांनी सरकारची जबाबदारी सार्वजनिक प्रतिनिधींची सुरक्षा सुनिश्चित करणे असल्याचे सांगत, धोका लक्षात घेऊन योग्य सुरक्षा पुरवली जाईल, असे स्पष्ट केले. (Congress MLA threatened by Bishnoi gang)

Related posts

तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो….

आमदार क्षीरसागरांनी मांडले वकिलांना संरक्षण देणारे महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक

राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; उद्धव ठाकरेंचे भाजपा विरुद्ध रणशिंग