CJI’s felicitation : राज्यघटनेमुळे कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी : सरन्यायाधीश गवई

CJI’s felicitation

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भक्कम राज्यघटनेमुळे देशातील कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकते. राज्यघटनेची ही ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मंगळवारी (८ जुलै) येथे केले. (CJI’s felicitation)

न्या. गवई यांचा विधानमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना ‘भारताची राज्यघटना’ या विषयावर ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह र्व मंत्रीगण, दोन्ही सभागृहाचे सदस्य उपस्थित होते. (CJI’s felicitation)

गवई म्हणाले की, एक देश आणि सर्वसमावेशक एकाच राज्यघटनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाम भूमिका घेतली. यामुळेच जात, पात, धर्म बाजूला ठेवून न्यायदानात आणि सर्व बाबतीत देश एकसंध राहण्यास मदत मिळाली आहे. गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडात कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाने राज्यघटनेला अभिप्रेत काम केले आहे.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे दालन खुले झाले. यामुळे महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा सभापती या देशाच्या सर्वोच्च पदावर महिला राज्यघटनेच्या समानतेच्या तत्त्वामुळेच पोहोचल्या. आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती या घटकातील नागरिकांनाही राज्यघटनेमुळे उच्च पदावर विराजमान होता आल्याचे सरन्यायाधीश श्री. गवई यांनी सांगितले. (CJI’s felicitation)

मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान : मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे सुपुत्र, मराठी माणूस भारताच्या सर्वोच्चपदी पोहोचल्याचा राज्याला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

ते म्हणाले, ‘‘मानवता आणि संवेदनशीलता हा सरन्यायाधीश गवई यांच्या स्वभावातील महत्त्वाचा गुण आहे. राज्यात न्यायाधीश असताना त्यांनी व्यापक जनहित पाहून न्यायदानाचे काम करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नागपूरमधील झोपडपट्टी तोडून टाकण्याचा निर्णय झाला, त्यावेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावून त्यावर तोडगा काढून स्थगिती मिळवून दिली. एक सामान्य माणूस असामान्य पदापर्यंत जाऊ शकतो, हे सरन्यायाधीश गवई यांनी दाखवून दिले आहे.’’ (CJI’s felicitation)

सामाजिक समतेचा विजय : एकनाथ शिंदे

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती होणे म्हणजे भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विजय आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांच्या अनेक निर्णयांमधून मानवता, संवेदनशीलता आणि संवैधानिक मूल्यांची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले.

एका स्तंभाचा दुसऱ्या स्तंभाकडून  गौरव : अजित पवार

विधिमंडळात अनेकांचे सत्कार झाले, मात्र सरन्यायाधीश गवई यांच्या सत्काराची इतिहासात नोंद होईल. कारण हा सत्कार एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभाचा केलेला गौरव असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

देशाच्या सरन्यायाधीशांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन राज्यघटनेचे महत्व, विविध पैलू समजावून सांगणे, ही घटना विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाणारी आहे. लोकशाहीला देखील अधिक बळकटी देणारी आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक सभापती राम शिंदे यांनी केले .सूत्रसंचालन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. विधानसभा अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी आभार मानले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर