मानवमुक्तीच्या `महाड` सत्याग्रहाची शताब्दी

Centenary of the 'Mahad' Satyagraha for Human Liberation

“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरता जावयाचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे!”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दुसरी बहिष्कृत परिषद, महाड १९२७

महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या व मनुस्मृती दहनाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ २० मार्च २०२६ पासून झाला आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत व मानव मुक्तीच्या संग्रामात, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे मोठे महत्त्व आहे. या चवदार तळे सत्याग्रहाच्या संघर्षातूनच स्वतंत्र ‘दलित चळवळी’चा पाया घातला गेला.

सुबोध मोरे

या सत्याग्रहाच्या पूर्वी, अस्पृश्यतेच्या रुढी, परंपरांच्या विरोधात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रयत्न, लढे झाले, त्यात दलितेतर समाज सुधारक, समाज क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रामस्वामी पेरियार, छत्रपती शाहू महाराज आदींचा सक्रिय सहभाग होता.परंतु महाड चवदार तळे सत्याग्रहाचे, लढ्याचे वैशिष्ट्य हे होते की, हा परिवर्तनाचा, सामाजिक विषमतेविरोधातील लढा हा अस्पृश्यांवरील, दलितांवरील सामाजिक विषमतेच्या, अन्याया विरोधात, दलितेतर, अस्पृश्येतरांच्या पुढाकाराने सुरू झाला नव्हता तर तो जातिव्यवस्थेचे, धर्मव्यवस्थेचे जे बळी, पीडित होते, मनुस्मृतीच्या विचारांमुळे ज्यांना हीनतेचे अमानवी जीवन कंठावे लागत होते, त्यांनी पुढाकार घेतला होता व नेतृत्वही केले होते. भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत हे प्रथमच घडत होते. (Centenary of the ‘Mahad’ Satyagraha for Human Liberation)

महाड मध्ये सामाजिक परिवर्तन चळवळीचा जोर

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ‘रायगडाच्या’ पायथ्याशी असलेल्या कोकणातील महाड येथे हा ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रम झाला. यामागे काही ऐतिहासिक सामाजिक पार्श्वभूमी होती. ब्रिटिशांच्या आगमनानंतर कोकणातील अस्पृश्यांना ब्रिटिश सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली व त्यांच्या दैनंदिन जगण्यात जे परिवर्तन झाले व गुलामगिरीची मानसिकता झुगारून स्वतंत्रपणे स्वाभिमान अंगिकारला, त्यांना शिक्षणाचा लाभ मिळाला. त्याच काळात महात्मा जोतिबा फुलें सारखे समाज क्रांतिकारक ज्या समाज परिवर्तनाच्या चळवळी उभ्या करत होते, त्यांच्या विचारांच्या, कार्याच्या प्रभावातील, ब्रिटिश सैन्यातील गोपाळबाबा वलंगकरांसारखे समाज सुधारक महाड, दासगाव, दापोली या कोकण परिसरात ‘अनार्य दोष परिहार मंडळ’ यांसारख्या संस्थांमार्फत सामाजिक विषमतेच्या विरोधात अस्पृश्यांमधे जनजागृती, प्रबोधन करीत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ, दासगावचे माडीवाले जोशी उर्फ विठ्ठल हाटे, वीरचे गंगाराम भागोजी सवादकर, पनवेलचे सुभेदार गंगाराम भातणकर आदी कार्यकर्ते कोकणातील सामाजिक चळवळीत अग्रभागी होते.

पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचा पत्रकार वलंगकराचा ठराव

कोकणातील आद्य समाजसुधारक व आद्य पत्रकार गोपाळ बाबा वलंगकर हे अनार्य दोष परिहार मंडळ, संस्थेचे चिटणीस होते. त्यांनी जे सामाजिक जागृतीचे, प्रबोधनाचे कार्य केले होते त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने गोपाळ बाबा वलंगकरांना महाड लोकल बोर्ड सदस्य म्हणून १८९५ साली नियुक्त केले होते. त्याच काळात त्यांनीच प्रथम, सर्व सार्वजनिक तलाव, विहिरी, पाणवठे अस्पृश्यांना खुले करावे व अस्पृश्य मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठीही ठराव मांडला होता हा इतिहास आहे.नंतर १९२३ साली मुंबईच्या असेम्ब्लीत रावबहादूर सी. के. बोले यांनी वलंगकर बाबांप्रमाणे, सर्व सार्वजनिक ठिकाणे, विहिरी, तलाव, पाणवठे आणि धर्मशाळा अस्पृश्यांसह सर्वांना खुली करावीत असा ‘बोले ठराव’ मंजूर करून घेतला होता. तसाच ठराव १९२४ साली महाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनीही मंजूर केला होता. परंतु त्या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र त्यांना महाड व इतरत्र करता आली नव्हती.

दासगावच्या रामचंद्र मोरेंचा पुढाकार

सार्वजनिक स्थळं, विहिरी, तलाव पाणवठे खुले करणाऱ्या या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला तो दासगावच्या रामचंद्र मोरे या शिक्षित अस्पृश्य तरुणाने. रामचंद्रला स्वतःचे शिक्षण घेतानाही अस्पृश्यतेचेचटके बसले होते, त्यासाठी त्याला महाडमधील सनातनी विचारांच्या लोकांसोबत शाळेत प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागले होते. कलेक्टरला निवेदन नि वर्तमानपत्रात पत्रलेखन केल्यानंतरच कलेक्टरच्या सांगण्यावरुन रामचंद्रला हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला होता. या रामचंद्र मोरेला वैचारिक प्रेरणा गोपाळ बाबा वलंगकरांकडूनच व डॉ. आंबेडकरांचे मोठे बंधू बाळारामदादा आंबेडकरांमुळे मिळाली होती. याच तरुण रामचंद्र मोरे यांनी पुढाकार घेऊन महाड नगरपालिकेच्या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी, दासगाव, वीर, महाड परिसरातील अस्पृश्य समाजातील तरुणांची पहिली सभा १९२४ साली महाडमधील तत्कालीन महारवाड्यात (आजच्या क्रांती भूमी शेजारी) घेतली. या सभेत रामचंद्र मोरे यांनी ‘बोले ठरावा’ ची माहिती सर्वांना दिली व या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी महाडमध्ये डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ‘बहिष्कृत परिषद’ घेण्याचे ठरवले. या सभेत कोणीही अस्पृश्येतर लोक उपस्थित नव्हते. याच सभेने रामचंद्र मोरेंवर डॉ. आंबेडकरांना परिषदेला आणण्याची जबाबदारी दिली. या सभेनंतर मोरे मुंबईत राहणारे कोकणातील दलित समाजातील ज्येष्ठ नेते संभाजी तुकाराम गायकवाड यांच्यासोबत डॉ. आंबेडकरांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटले. त्यावेळी बाबासाहेबांसोबत सामाजिक कार्यकर्ते भाई अनंत चित्रेही होते. त्या दोघांनीही मोरेंकडून परिषदेसंदर्भात माहिती घेतली व निर्णय नंतर कळवितो, असे सांगितले. त्यानंतर रामचंद्र मोरे ज्या ज्या वेळी मुंबईत येत असत ते डॉ. आंबेडकरांकडे परिषदेला येण्यासाठी पाठपुरावा करीत असत.

‘महार समाज सेवा संघ’ संघटनेची स्थापना

परिषदेची महाड मध्ये काय तयारी सुरू आहे यासाठी बाबासाहेबांनी एकदा, ‘बहिष्कृत हितकारणी सभे’चे सदस्य व त्यांचे सहकारी कमलाकांत चित्रे यांना महाडला पाठविले. त्यांच्या सोबत मोरेंनी महाड परिसरातील प्रमुख अस्पृश्य समाजातील कार्यकर्त्यांची सभा घेतली, ज्यात सुभेदार विश्राम सवादकर, चर्मकार समाजाचे भानुदास कांबळे आदी लोक उपस्थित होते. या सभेनंतर कमलाकांत चित्रे मोरे, सवादकर यांच्यासह महाडचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांना भेटले व ठरावाची कायदेशीर बाजू समजावून घेतली आणि आगामी काळात लवकरच महाडमध्ये, बोले ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत परिषद घेणार असल्याचे सांगितले. त्यावेळी या परिषदेला सहकार्य करण्याचे आश्वासन सुरबानाना टिपणीसांनी दिले. यानंतर पुढील दोन वर्षे रामचंद्र मोरे परिषदेच्या बाबतीत बाबासाहेबांना व मुंबईत राहणाऱ्या चाकरमानी दलित तरुणांना भेटत असत. याच काळात १९२६ साली मुंबईत मोरेंनी संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या मदतीने ‘महार समाज सेवा संघ’ या तरुणांच्या संघटनेची स्थापना केली. ते स्वतः सरचिटणीस, तर अध्यक्ष भिकाजी गायकवाड व खजिनदार केशवराव आड्रेकर हे होते. या संघटनेचे कार्यकर्ते मुंबई व कोकण परिसरातील आगामी परिषदेचा प्रचार प्रसार व निधी जमा करण्यासाठी अहोरात्र झटत होते. यांच्याच पुढाकाराने महाड परिषदेच्या निधीसाठी मुंबईतील दामोदर हॉल नाट्यगृहात ‘संत तुकाराम’ या नाटकाचा खास प्रयोग आयोजित केला होता.

दासगावमधील क्रॉफर्ड तळे व विहिरीवर पाण्याचा सत्याग्रह

रामचंद्र मोरे यांनी बोले ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःच्या दासगावमधील क्रॉफर्ड तळे व विहिरीवर जाहीर कार्यक्रम करण्याची सूचना तहसीलदार व पोलिस प्रशासनाला देऊन सुमारे दोनशे अडीचशे लोकांच्या उपस्थितीत दि. ४/१२/१९२६ रोजी, तळ्याचे व विहिरींचे पाणी प्यायले व बोले ठरावाची अंमलबजावणी महाड सत्याग्रहाच्या आधी केली. या कार्यक्रमात महाड पंचक्रोशीतील अस्पृश्य समाजातील नामी कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गावातील सोनार समाजाचे रा. बा. पोतदार होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत चवदार तळे आंदोलन

  दासगावच्या या कार्यक्रमानंतर महाड व कोकण परिसरातील अस्पृश्य समाजात नव चैतन्य व उत्साह निर्माण झाला आणि लोक महाड बहिष्कृत परिषदेच्या कामाला जोमाने लागले. याच काळात भाई अनंत चित्रे यांनी बापू सहस्रबुद्धे यांना पत्राने (जानेवारी १९२७) कळविले की, रामचंद्र मोरे व विश्राम सवादकर हे परिषदेची तयारी जोरात करत आहेत तरी, डॉ. आंबेडकरांकडून परिषदेची तारीख मिळवावी. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आंबेडकरांनी दि. १९-२० मार्च १९२७ ही तारीख कळवली. महाडच्या विरेश्वर थिएटरच्या सभामंडपात डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कोकणचे पहिले दादासाहेब उर्फ कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या स्वागताध्यक्षपदाखाली ऐतिहासिक ‘बहिष्कृत परिषद’ पार पडली. परिषदेचे प्रमुख संघटक आर. बी. मोरे होते. त्यांनीच पाहुण्यांचा परिचय करून दिला. यात दलितेतरांपैकी मुंबईहून आलेले भाई अनंत चित्रे, बापुसाहेब सहस्रबुद्धे हेच फक्त मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस व महाडमधील एक दोनच स्पृश्य दलितेतर समाजातील लोक या परिषदेत सहभागी होते. २० मार्च रोजी दुपारी परिषदेत भाई चित्रे यांनी प्रतिनिधींना आवाहन केल्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक बाजारपेठेतून मिरवणुकीने चवदार तळ्यावर गेले आणि सगळ्यांनी जाहीरपणे ओंजळीने पाणी पिऊन ‘बोले ठरावा’ ची व मानवी मूलभूत हक्कांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

महाडमध्ये सनातनीकडून सत्याग्रहींना मारहाण

या घटनेनंतर गावातील जातियवादी, सनातनी, धर्मांधांनी खोट्या अफवा पसरवल्या की, हे अस्पृश्य लोक आता विरेश्वराच्या मंदिरात घुसून, देऊळ बाटवणार आहेत. यामुळे सामान्य लोकांची, भाविकांची माथी भडकली व त्यांनी परिषदेला आलेल्या सत्याग्रहींना बेदम, जीवघेणी मारहाण केली. त्यात अबालवृद्ध, स्त्रियाही मोठ्या संख्येने जखमी झाल्या. काही ठिकाणी सत्याग्रहीनींही हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले व प्रतिकार केला. संपूर्ण महाडमध्ये धुमश्चक्रीचे व तणावपूर्ण वातावरण होतं. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हल्लेखोरांना पिटाळले व डॉ. आंबेडकरांसह सर्व सत्याग्रही कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरवली. अशा त-हेने पहिली परिषद पार पडली.

अस्पृश्यांनी तळ्याचे पाणी प्यायल्याने, ‘चवदार तळे बाटले, अपवित्र झाले’ असा गहजब महाडमधील ब्राह्मणांनी व सनातनी संस्कृतीच्या ठेकेदारांनी केला. त्यांनी ते तळे तथाकथित ‘पवित्र’ शुद्ध करण्यासाठी १०८ घागरी शेण, गोमूत्र (पंचगव्य) मंत्राग्नीच्या जयघोषात तळ्यात ओतले व ब्राह्मणी धर्माचे पालन केले. तसेच हे चवदार तळे सार्वजनिक नसून खाजगी मालकीचे आहे, असा दावा कोर्टात टाकून अस्पृश्यांना पाणी भरण्यास पुन्हा मनाई केली. (Centenary of the ‘Mahad’ Satyagraha for Human Liberation)

महाड चवदार तळे सत्याग्रहाने अस्पृश्यांना आले आत्मभान

या परिषदेमुळे अस्पृश्यांना, आपल्या ताकदीची जाणीव झाली. एक नवं आत्मभान व आत्मविश्वास निर्माण झाला. अस्पृश्यांनी सामूहिकरित्या, संघटीत होऊन पाणी प्राशन केल्यामुळे संबंध महाराष्ट्रात व देशभरात असा संदेश गेला की, अस्पृश्य जनता आता जागृत झाली आहे व ती आता लाचारीचे, मानहानीचे अवमानकारक जीणं जगणार नाही. त्यांच्यातील स्वाभिमानाला जागृत करण्याचे काम या चवदार तळे ‘बहिष्कृत परिषदे’तून झाले. अस्पृश्यांना आतास्वतःच्या समाजातील डॉ. आंबेडकरांसारखं, कर्तृत्ववान, देदीप्यमान नेतृत्व मिळालं आहे. या लढ्यातून दलितांची ‘स्वतंत्र अस्मिता’ पुढे आली आहे. याच चवदार तळे सत्याग्रह आंदोलनातून डॉ. आंबेडकरांचे स्वतंत्र नेतृत्व उद्यास आले ! हा ऐतिहासिक सत्याग्रह व बहिष्कृत परिषद आयोजित करण्यात ‘महार समाज सेवा संघा’चा सिंहाचा वाटा होता, हे अधोरेखित करण्याची गरज आहे. कारण डॉ. आंबेडकरांच्या अनेक चरित्रकारांनी व अभ्यासकांनी याची योग्य नोंद घेतलेली नाही.

बहिष्कृत भारत पाक्षिकाची सुरूवात, दुसऱ्या बहिष्कृत परिषदेची तयारी

या ऐतिहासिक परिषदेनंतर डॉ. आंबेडकरांनी स्वतःच्या संपादकत्वाखाली ‘बहिष्कृत भारत’ नावाचं नवं पाक्षिक ३ एप्रिल १९२७ रोजी सुरू केलं. त्यात त्यांनी महाड चवदार तळे बहिष्कृत परिषदेचा सविस्तर वृत्तांत दिला व जाहीर केले की “आम्ही पुन्हा डिसेंबरला महाडला येऊन, दुसरी बहिष्कृत परिषद घेऊ” डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चवदार तळे आंदोलनाची दखल तत्कालीन इंग्रजी वर्तमानपत्रांनी ‘महत्त्वाची पुरोगामी, सामाजिक घटना’ म्हणून घेतली. परंतु लोकमान्य टिळकांचा ‘केसरी‘ ‘कुलाबा समाचार’, भोपटकरांचा ‘भाला’, ‘चाबुकस्वार’ यांसारख्या वर्तमानपत्रांनी मात्र डॉ. आंबेडकर व दलित चळवळीतील सत्याग्रहींवरच दंगलीचे खापर फोडले व आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर तोंडसुख घेतले. या वर्तमानपत्रांनी पीडित, जखमींची, अस्पृश्यांची बाजू घेण्याऐवजी, जातीयवादी, सनातन्यांचीच बाजू घेतली. या वरील सर्व वर्तमानपत्रातील टीकाकारांचा परखड समाचार आंबेडकरांनी अत्यंत सडेतोड शब्दांत, नेमका युक्तिवाद मांडून ‘बहिष्कृत भारता’त अग्रलेख व विविध स्तंभातून केला. त्यामुळे दुसऱ्या ‘बहिष्कृत परिषद’चा संदेश अस्पृश्य समाजापर्यंत गेला. लोक लहान, मोठ्या सभा, बैठका घेऊन परिषदेला जाण्याची तयारी करू लागले. पहिल्या परिषदेनंतर सत्याग्रहींना जी मारहाण झाली होती, त्यापासून सावध होऊन, आक्रमकपणे, संघर्षाच्या तयारीने जाण्यासाठी, प्रमुख संघटक आर. बी. मोरे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली काँग्रेस सेवा दलाच्या धर्तीवर ‘आंबेडकर सेवा दल’ या तरुणांच्या लढाऊ संस्थेची स्थापना केली. (नंतर याच संस्थेचे नामांतर ‘समता सैनिक दल’ असे बाबासाहेबांनी केले.) दुसऱ्या परिषदेला लोक लढण्याच्या जिद्दीने, मरण्याच्या तयारीने आले होते. काही जण तर आपल्या पत्नीचं कुंकू पुसून आले होते, ‘महार समाज सेवा संघा’चे प्रमुख कार्यकर्ते आड्रेकर तर स्वतःचे कफन सोबत घेऊन आले होते.

मनुस्मतीचे दहन

याच २५ ते २७ डिसेंबर १९२७ या तीन दिवशी भरलेल्या दुसऱ्या ‘बहिष्कृत परिषदेत’ स्त्री-शूद्रातिशूद्रांवर, अमानुष जीणं लादणाऱ्या, माणुसकीचे हक्क हिरावून घेणाऱ्या व सनातनी विचारांचे गुणगान करणाऱ्या, विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या, हिंदू धर्माच्या तथाकथित ‘पवित्र’ मनुस्मृती या ग्रंथाचे बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांनी महाराष्ट्रात प्रथमच जाहीर दहन महाडच्या, आजच्या ‘क्रांती भूमी’वर केले आणि हिंदू धर्म मार्तंडांना आव्हान दिले. थोडक्यात ९९ वर्षांपूर्वी याच महाडमध्ये, विद्रोहाचे पाणी पेटले व सनातनी विचारांना आग लावली गेली. २५ डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन, ‘भारतीय महिला मुक्ती दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.

सद्यस्थितीत मनुस्मृतीचे वारसदार आक्रमक

  हा झाला थोडक्यात महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहनाचा रोमहर्षक इतिहास ! परंतु आज या जाज्वल्य इतिहासाची वर्तमानात काय स्थिती झाली आहे, याचाही विचार महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन स्मृती शताब्दी वर्ष साजरं करताना करणे गरजेचे आहे. आज त्याच मनुस्मृतीचे वारसदार अधिक आक्रमक होऊन दलितांवर, स्त्रियांवर हल्ले करीत आहेत. राजस्थानच्या राजधानीत, जयपूर उच्च न्यायालयाच्या आवारात आजही विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुचा पुतळा पोलिस संरक्षणात, दिमाखात उभा आहे. साहजिकच त्याच राजस्थानातील एका शाळेतील इंद्र मेघवाल नावाचा दलित विद्यार्थी तथाकथित सवर्ण शिक्षकाच्या मडक्यातील पाणी प्यायला म्हणून त्या जातीयवादी शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला अमानुष बेदम मारहाण केली, ज्यात इंद्र मेघवाल हा कोवळा मुलगा मृत्युमुखी पडला (२०२२). महाराष्ट्रातील खानदेशातील एका खेड्यात दलित समाजातील लहान मुलांनी सार्वजनिक विहिरीवर आंघोळ केली म्हणून, गावातील जातीयवाद्यांनी त्या लहानग्यांना बेदम मारहाण केली होती (२०१८). याच्या काही वर्षांपूर्वी जालन्यातील उच्चवर्णीय मंत्र्याच्या नातेवाईकांनी गावातील सार्वजनिक हापश्यातील पाणी घेतले म्हणून दिलीप शेंडगे या दलित तरुणाची हत्या केली व त्याचं राहतं घर पेटवून दिले होते (२००३).

संविधानावर चालणाऱ्या आपल्या या देशात, दलितांनी पायात चप्पल घातली म्हणून, नवरदेव फेटा बांधून घोड्यावर बसला म्हणून, मिशी ठेवली, जय भीमची रिंग टोन वाजवली म्हणून त्याला जीवानिशी मारले जाते. काही राज्यांत दलितांनी गावात पक्की घरं बांधली म्हणून, घरात नवं कपाट, सामान आणलं म्हणूनही मनुवाद्यांच्या रोषाला बळी पडावे लागलं आहे. दलितांना लहान, मोठ्या शहरात भाड्याने, तथाकथित उच्चवर्णीय घर देत नाहीत. महाराष्ट्रात व देशातील काही राज्यात दलितांना मेल्यानंतरही, पुरायला वा दहनासाठी जागा द्यायला उच्चवर्णीय तयार नाहीत. थोडक्यात मेल्यानंतरही अस्पृश्यता, भेदभाव उघडपणे पाळला जातो आहे.

दलित विद्यार्थ्यांना विषमतेची वागणूक

  आय.आय.टी., टी.आय.एस.एस., केंद्रीय विद्यापीठे, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्यांना विषमतेच्या वागणुकीला पदोपदी सामोरे जावे लागते. जातीय टोमणे सहन करावे लागतात. त्यामुळे अशा संस्थामध्ये दर्शन सोलंकी, डॉ. पायल तडवी यांसारख्या हुशार विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते. अशा संस्थांमधून व्यवस्थापनाकडून होणाऱ्या सामाजिक विषमतेच्या वागणुकीमुळे रोहित वेमुलासारख्या हुशार दलित विद्यार्थ्यांची संस्थांत्मक हत्या घडलेली आहे.

जातीव्यवस्था बळकट करण्याचा संघ परिवाचा छुपा अजेंडा

खैरलांजी (२००६) पासून ते उत्तर प्रदेशातील हाथरस (२०२०) येथे दलित महिलांवरील बलात्कार, अत्याचाराच्या घटना अजूनही राजरोस घडत आहेत. पीडितांना न्याय मिळणे तर दूरच त्यांच्या वरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या, आक्रोश करणाऱ्या कुटुंबियांनाही उच्चवर्णीय गुन्हेगार जीवंत जाळीत आहेत, त्यांचे खून करत आहेत आणि जातीय व धर्मांध सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारी पोलिस, प्रशासन व न्याय यंत्रणा केवळ मूक दर्शक बनले आहेत. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून सामाजिक समतेचा, धर्मनिरपेक्षतेचा, विज्ञाननिष्ठ विचारांचा पाया घालण्याचा प्रयत्न, भारतीय संविधानाच्या सहाय्याने केला. आज हीच संविधानिक मूल्ये धर्मांध सत्ताधारी रोज पायदळी तुडवीत आहेत. अध्यात्मिक विचार शिकविण्याच्या नावाखाली, छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’चा शिरकाव महाविद्यालये व विद्यापीठ अभ्यासक्रमात करवून मनुस्मृतीचा गौरव करण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने सुरू आहे. ‘कौशल्य विकासा’च्या नावाखाली पारंपरिक जातीव्यवसायाचे गौरवीकरण करुन, जातिव्यवस्था अधिक बळकट करण्याचा संघ परिवाराचा छुपा अजेंडा सरकार शिक्षणाच्या नावाखाली राबवित आहे.

डॉ. आंबेडकरांनी काळा राम मंदिर आंदोलनानंतर, हिंदू धर्मातील जातिव्यवस्था व विषमतेच्या विरोधात १९३५ साली नाशिक जवळील येवला येथे घोषणा केली की, ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ आणि नंतर सुमारे २१ वर्षांनी, विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून, समतेचा, विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला. तसेच धम्म दिक्षे प्रसंगी, २२ प्रतिज्ञाही लोकांना घेण्यास सांगितल्या, ज्यात हिंदू देव, देवतांना मानणार नाही, त्यांची पूजा अर्चा करणार नाही आदी गोष्टी वदवून घेतल्या व हिंदू धर्माशी, रुढी परंपरांशी फारकत घेतली.

देशभर मनुस्मृती दहन दिन साजरा करणार का? 

आज संघ परिवार व मुख्यमंत्री महाड चवदार तळे शताब्दी उत्सव, इव्हेंट साजरा करीत आहेत. तसेच समतेची नव्हे तर ‘समरसते’ची भाषा बोलत डॉ. आंबेडकरांना, धर्माध, हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या गोळवलकर, हेडगेवार, सावरकरांच्या पंक्तीत बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संघ परिवाराचे हे ब्राह्मणी कटकारस्थान पुरोगाम्यांनी व स्वतःला आंबेडकरी म्हणवणाऱ्यांनी हाणून पाडायला हवे. आणि महाड तळे सत्याग्रह शताब्दी उत्सव साजरे करणाऱ्यांनी सरकारला जाब विचारायला हवा की, हे सरकार आगामी २५ डिसेंबरला देशभर ‘मनुस्मृती दहन दिन’ साजरा करणार आहे का? मनुस्मृती दहना संदर्भातील धडा शाळा महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात लावणार आहे का? तसेच या शताब्दी वर्षात, राजस्थानाच्या कोर्टातील मनुचा पुतळा हटवणार आहे का? याची हिंदू राज्य स्थापन झाल्याची शेखी मिरवणाऱ्यांकडून यातले काही होणार नाही हे सांगण्यास कोणा भविष्यवेत्याची गरज नाही.

डॉ. आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्या वेळीसच हिंदू राज्याचा धोका ओळखला होता. महाडच्या दंगलीचा संदर्भ देऊन ते १९२७ साली म्हणतात, “परवाच्या महाड येथील दंग्यातच तुमची स्वराज्यविषयक नालायकी शाबित झाली आहे. तुम्ही अल्पसंख्याक लोकांचे नागरिकत्वाचे हक्क कबूल करावयाला तयार नाही. गरीब दुबळ्या लोकांशी न्यायपूर्वक वागण्याची तुमची इच्छा नाही, मग हिंदू राज्य झाले असते तरी बहिष्कृत वर्गाची पुरी कंबख्ती भरली असती… कलेक्टर युरोपियन… पोलिस इन्स्पेक्टर मुसलमान असे अधिकारी नसते आणि महाडच्या मुसलमानांनी आपापल्या घरातून बहिष्कृत वर्गातील स्त्री-पुरुष मंडळींना व मुलांना आसरा दिला नसता तर स्पृश्यवर्गीय म्हणविणाऱ्या हिंदूंनी अत्याचाराची कमाल केली असती” (बहिष्कृत भारत, १९२७). (Centenary of the ‘Mahad’ Satyagraha for Human Liberation)

संदर्भ सूचीः

गोपाळ बाबा वलंगकर आंबेडकरी चळवळीचे आधारवड, प्रेम हनवते, २०२१, स्वयंदीप प्रकाशन

(लेखक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

subodhvidrohi@gmail.com

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

आपले घर, आपला किल्ला !

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या