आपले घर, आपला किल्ला !

Our Home, Our Castle

अमेरिकेत ‘स्नोडेन ‘सारखा जागल्या जन्मतो, तो अचानक नव्हे. तो तेथील सरकारी पाळतशाहीचा गौप्यस्फोट करतो, ते अविचाराने नव्हे. त्या कृतीमागे त्या आणि एकूणच पाश्चात्य समाजात व्यक्तीचे अधिकार, तिचा खासगीपणाचा हक्क यांविषयी असलेली आस्था उभी आहे. पण ही आस्थाही अचानक क्रांती वगैरे होऊन उगवलेली नाही. त्या संस्कृतीलाही पाळतखोरीचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे…

  • रवि आमले

स्नोडेनला जन्म देणाऱ्या अमेरिकी पाळतखोरीचा ऐतिहासिक वारसा पाहायचा, तर दिवसेंदिवस रुपयाच्या डोक्यावर पाय देऊन त्यास पाताळात ढकलत चाललेली अमेरिकी डॉलरची नोट पाहा. तिच्या पाठीमागे एक पिरॅमिडसारखी आकृती दिसते. त्या पिरॅमिडच्या टोकावरील त्रिकोणात एक उघडा डोळा आहे. त्याला म्हणतात ‘आय ऑफ प्रॉव्हिडन्स’. प्रॉव्हिडन्स म्हणजे दैवी कृपा. आय ऑफ प्रॉव्हिडन्स म्हणजे दैवी कृपेचा नेत्र, दैवी नैत्र. ही ख्रिश्चन संज्ञा, संकल्पना आहे. ख्रिश्चन प्रतिमाशास्त्रानुसार, त्रिकोणात असलेला डोळा हे त्यांच्या ‘होली ट्रिनिटी’चे ‘पवित्र त्रयी’चे – प्रतीक आहे. ख्रिस्ती परंपरेनुसार हा डोळा सर्वसाक्षी आहे. सारे काही पाहणारा आहे. प्रत्येक व्यक्तीचे विचार आणि कृती यांवर त्याची सातत्याने ‘नजर’ आहे. व्यवहारात हे नजर ठेवण्याचे कार्य करत होते, स्वतःस परमेश्वराचे प्रतिनिधी समजणारे राजे आणि धर्मगुरू. मध्ययुगातील सर्वशक्तिशाली धर्मसत्तेने या पाळतखोरीला अनोखे आयाम दिले. याचे एक लक्षणीय उदाहरण आहे, तेराव्या शतकातले. (Our Home, Our Castle!)

पाळतीचा धर्मादेश

संदर्भासाठी सांगायचे, तर आपल्याकडे अद्याप संत ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला नव्हता. देवगिरीच्या सिंहासनावर नुकताच जैत्रपालपुत्र सिंघण यादव आला होता. त्या काळात, इ.स. १२१५च्या नोव्हेंबरमध्ये पोप इनोसन्ट तिसरे यांनी धर्मगुरूंची महासभा बोलावली होती. लॅटरन हे रोममधल्या एका भागाचे नाव. तेथील एका भव्य प्रासादात ही महासभा झाली म्हणून तिला नाव पडले ‘फोर्थ कौन्सिल ऑफ द लॅटरन’ या सभेस ठिकठिकाणचे बिशप, राजे आणि सम्राटांचे प्रतिनिधी वगैरे बरीच मंडळी उपस्थित होती. सभेपुढे अनेक विषय होते. त्यातील महत्त्वाचे विषय तीन. क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध, चर्चमधील संस्थात्मक सुधारणा आणि ‘हेरेसी’ म्हणजे अधर्मी, निधर्मी, धर्मविरोधी विचार यांचे काय करायचे ?

११ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत यावर खल झाला. त्यातून ७१ धर्मनियम तयार करण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा नियम होता धर्मविरोधी, तथाकथित ‘पाखंडी’, यहुदी आणि कुष्ठरोगी यांच्याविषयीचा. या धर्मसभेतून असे घोषित करण्यात आले, की लोकांस ‘मोक्ष’ केवळ रोमन कॅथॉलिक चर्चच्या माध्यमातून मिळू शकतो. ज्यास हे अमान्य असेल त्याला राज्यसत्तेने शिक्षा करावी. त्याची मालमत्ता जप्त करावी. त्याला समाज-बहिष्कृत करावे. त्याने ख्रिश्चन धर्मविचार मान्य केले, तर पुन्हा समाजात घ्यावे. नाही केले, तर मारून टाकावे. सरदार-दरकदार वर्गाने यात हयगय केली, तर त्यांनाही शिक्षा करावी. पदच्युत करावे आणि त्यांच्या जागी सच्च्या कॅथॉलिक व्यक्तीस बसवावे.

धर्ममार्तंडांची पाळत

आता यातील कुष्ठरोगी पटकन ओळखता येतील. पण यहुद्यांचे काय? त्यासाठी या धर्ममार्तंडांनी असा नियम केला, की यहुदींनी वेगळी वस्त्रे घालावीत. विसाव्या शतकात हिटलरने याचाच कित्ता गिरवला होता. यहुद्यांनी त्यांच्या घरा-दारावर, दंडावर डेव्हिडचा तारा लावावा, अशी सक्ती त्याने केली होती. मात्र एखाद्या व्यक्तीचे विचार धर्मविरोधी आहेत, हे कसे ओळखणार? जॉर्ज ऑर्वेल यांच्या भाषेत सांगायचे, तर हा ‘थॉट क्राइम’ कसा पकडणार? या धर्मसभेने त्यावर मार्ग काढला, की बिशपांच्या प्रतिनिधींनी वर्षातून एकदा त्यांच्या विभागातील सर्व चर्चमध्ये जायचे. लोकांना विचारायचे, की येथे कोणी सर्वसामान्य धार्मिकाहून वेगळे वर्तन करीत आहे का? धार्मिक गोष्टींच्या संदर्भात कोणी गुप्तबैठका घेत आहे का? यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवा. असे लोक असतील त्यांची नावे चर्चला, अधिकाऱ्यांना सांगा. ते प्रत्येक धार्मिकाचे परमकर्तव्य आहे.

थोडक्यात, हे धर्ममार्तंड सामान्य माणसांना एकमेकांवर पाळत ठेवण्यास सांगत होते. मराठीत ज्यास चुगली, चहाडी असे म्हणतात, ते करावयास सांगत होते. मध्ययुगीन युरोपातील धर्म आणि सत्तेच्या अभ्यासक, इतिहासकार अॅमन्डा पॉवर यांनी त्यांच्या ‘अंडर वॉचफूल आइज’ या निबंधामध्ये याबाबत सखोल मांडणी केली आहे. ते बहुधा आधुनिक धर्ममार्तंडांना पचलेले नाही. परिणामी, हा निबंध निदान भारतात तरी निर्बंधित असल्याचे दिसते. त्या मध्ययुगातील धर्मसत्तेशी आजच्या ‘मास सव्र्व्हेलन्स’चा धागा जोडलेला असल्याचे त्यांना या निबंधातून दाखवून दिले आहे. (Our Home, Our Castle!)

पाळतीचे पर्व

अमेरिकेतील ‘मॅकार्थीझम’मध्ये हाच धागा दिसतो. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही महायुद्धांच्या मागेपुढे अमेरिकेत ‘रेड स्केअर’ म्हणजे कम्युनिस्टांविरोधातील द्वेषाची आणि भयाची लाट निर्माण करण्यात आली होती. मॅकार्थीझम हे त्याचेच दुसरे नाव. त्या काळात तेथील सरकारी समित्या कम्युनिस्टांना वा कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार असल्याच्या निव्वळ संशयावरून कोणालाही ‘सपीना’ धाडत असत. एकदा त्या व्यक्तीला असे बोलावणे आले, की संपले. त्याचे जीवन उद्ध्वस्त झालेच म्हणून समजा. ओपनहायमर, बर्टोल्ट ब्रेख्त, चार्ली चॅप्लीन यांच्यासारखे मातब्बरही सुटले नव्हते यातून. तो काळ असा होता, की शेजारी शेजाऱ्यांवर पाळत ठेवू लागले होते. कोण काय बोलते, कोण कसे वागते याच्या सरकारी अधिकाऱ्यांकडे चुगल्या करू लागले होते. कर्मचाऱ्यांच्या ‘सरकारनिष्ठेच्या चाचण्या’ घेतल्या जात होत्या.

सामाजिक पाळतीचा असाच एक प्रकार मध्ययुगीन इंग्लंडमध्ये आढळतो. ‘फ्रैंकप्लेज’ म्हणत त्यास. यात गावातील दहा-दहा पुरुषांचे गट केले जात. त्यांना ‘टायथिंग’ म्हणत. त्या गटातील प्रत्येकाने इतरांवर नजर ठेवायची. त्यातील कोणी काही ‘वाईट साईट’ केले की त्याची खबर अधिकाऱ्यांना द्यायची. कोणी ‘गुन्हा’ वगैरे केला, तर त्या संशयिताला पकडून द्यायचे. समजा नाही दिले, तर त्या गटातील बाकीच्या सगळ्यांना दंड. (Our Home, Our Castle!)

दिशा प्रबोधनाची

एकंदर, संस्कृती पाश्चात्य असो वा पौर्वात्य, त्यात खासगीपणाच्या आज आपण जे मानतो त्या मूल्यास किंमत नव्हती. मुळात तेथे व्यक्तीलाच व्यक्ती म्हणून किंमत नव्हती. त्यामुळे आजच्या व्याख्येने व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे गोष्टी फारच दूर होत्या. एरिक फ्रॉम यांच्यासारखे विचारवंत तर अशी मांडणी करतात, की त्या मध्ययुगीन समाजात ‘अद्याप ‘व्यक्ती’ अस्तित्वातच आलेली नव्हती. मनुष्य अजूनही प्राथमिक बंधनांनीच जगाशी जखडलेला होता. काहीही असो, त्या समाज-समूहातील माणसाला खासगीपणा, गोपनीयता यांचा स्पर्शही झालेला नव्हता. तो जो काही विचार होता, तो केवळ सत्ताधीशांपुरता राजे आणि धर्मगुरू यांपुरता मर्यादित होता. यात बदल होत गेला, तो मध्ययुगाच्या उत्तरकालात.

त्याची कारणे अर्थातच त्या समाजाच्या बदललेल्या अर्थकारणात होती. त्यातून निर्माण झालेल्या सांस्कृतिक घडामोडींमध्ये दडलेली होती. प्रॉटेस्टंट बंडात, मार्टिन ल्यूथरने व्यक्तीच्या सद्सद्विवेकबुद्धीला धर्मशास्त्राच्या आज्ञांच्या वरचे स्थान दिले, त्या विचारांत त्याची मुळे होती. त्या खोलात जाण्याचे येथे कारण नाही. येथे आपण एवढे लक्षात घेतले, तरी पुरे, की युरोपात अवतरलेल्या प्रबोधन रेनेसाँ युगाने व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधांत मोठी उलथापालथ केली. युरोपात आधुनिक व्यक्तित्ववादास प्रारंभ झाला. व्यक्तीचे स्वातंत्र्य, त्याचे हक्क, अधिकार यांविषयीची तत्त्वचर्चा सुरू झाली. खासगीपणा हा त्यातीलच एक हक्क.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर दोनच वर्षांनी जन्मलेला इंग्लिश तत्त्वज्ञ जॉन लॉक याच्या तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव आधुनिक व्यक्तिवादावर पडलेला आहे. याच्या मुळाशी होता व्यक्तीच्या नैसर्गिक अधिकाराचा सिद्धांत. जॉन लॉक हा या सिद्धांताचा मोठा पुरस्कर्ता. हा सिद्धांत सांगतो, की माणूस हा जन्मतःच स्वतंत्र असतो आणि एक व्यक्ती म्हणून त्याला निसर्गतः काही अधिकार मिळालेले असतात. ते काढून घेण्याचा हक्क कोणालाही नाही. लॉकने या नैसर्गिक अधिकारात व्यक्तीच्या खासगी मालमत्तेचाही समावेश केला. ‘माणसाचे घर हा त्याचा किल्ला आहे’ हा सिद्धांत ‘कॅसल डॉक्ट्रिन’ हा याचाच भाग.

असशील तू तुझ्या घरचा राजा

हॉलिवूडमधील गुन्हेगारीपटांच्या चाहत्यांना हा प्रसंग चांगलाच परिचयाचा असेल. एफबीआयचे एजंट एखाद्या गुन्हेगाराच्या मागावर असतात. तो कुठेतरी उभा असल्याचे दिसते. ते लांबूनच ओरडतात, ‘एफबीआय. स्टॉप.’ तो गुन्हेगार पळतो. किंवा कुणा गुन्हेगाराच्या घरात पोलीस ‘एनवायपीडी एनवायपीडी’ असे ओरडत शिरतात. कारण तसा नियमच आहे. त्यास ‘नॉक अँड अनाऊन्स’ नियम म्हणतात. त्याची उत्पत्ती झाली त्या इंग्लिश न्यायव्यवस्थेतील ‘कॅसल डॉक्ट्रिन’ मधून. हा १६०४मध्ये एका न्यायालयीन खटल्यातून -‘सिमेन्स केस’मधून पुढे आलेला सिद्धांत. आपल्याकडील पेशवाईच्या काळात, १७६३मध्ये तिकडे ब्रिटनमध्ये एक खासदार होऊन गेले विल्यम पिट नावाचे.

त्यांनी संसदेतील एका भाषणात मोजक्या शब्दांत या सिद्धांताचे सार मांडले आहे. ते म्हणाले होते, ‘सर्वात गरीब माणूससुद्धा त्याच्या झोपडीमध्ये राजसत्तेच्या सर्व शक्तीला आव्हान देऊ शकतो. ती झोपडी कमकुवत असली, तिचे छप्पर हलत असले, आत वारा शिरत असला, वादळ घुसत असले, तरीही त्या उद्ध्वस्त झोपडीचा उंबरा ओलांडण्याचे धाडस राजाची शक्ती करू शकत नाही.’ ‘असशील तू तुझ्या घरचा राजा,’ हे उद्‌गार या सिद्धांताने खरे ठरतात! घर ही व्यक्तीची खासगी मालमत्ता. त्यात त्याला खासगीपणाचा हक्क. त्यावर आक्रमण करण्याचा कोणासही अधिकार नाही, असा या सिद्धांताचा सोपा अर्थ आहे. अमेरिकेत आजही हे तत्त्व अपवाद बरेच आहेत त्यास, पण – पाळले जाते. मात्र व्यक्तीचा खासगीपणा एक ‘हक्क’ म्हणून प्रस्थापित होण्यात तेथेही मध्ये बराच काळ जावा लागला. (Our Home, Our Castle!)

राइट टु प्रायव्हसी

डिसेंबर १८९०च्या ‘हार्वर्ड लॉ रिव्ह्यू’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेला एक लेख यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. अमेरिकेच्या विधी इतिहासातील सर्वांत प्रभावशाली निबंध म्हणून गौरवल्या गेलेल्या या लेखाचे नाव आहे ‘राइट टु प्रायव्हसी’. लेखक – सॅम्युएल डी. वॉरेन द्वितीय आणि लुईस ब्रैडाइस. ते म्हणतात, ‘पूर्वी व्यक्तीचे जीवन आणि मालमत्ता यांवरील शारीरिक ताकद आणि शस्त्रांच्या साह्याने (‘व्ही एट आर्मीस’) केल्या जाणाऱ्या बलात्काराच्या बाबत कायदा उपाय सांगत होता. त्या वेळी ‘जीवनाचा अधिकार’ केवळ विविध प्रकारच्या मारहाणीपासून व्यक्तीचे संरक्षण करण्यापुरताच मर्यादित होता. तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे प्रत्यक्ष बंधनांपासून मुक्तता आणि मालमत्तेचा अधिकार म्हणजे व्यक्तीच्या जमिनी आणि जनावरांचे संरक्षण, एवढ्यापुरताच मर्यादित होता हळूहळू या कायदेशीर अधिकारांची व्याप्ती वाढत गेली आणि आज ‘जीवनाचा अधिकार’ याचा अर्थ जीवनाचा आनंद घेण्याचा, एकले राहण्याचा अधिकार असा झाला आहे.’ यातील एकले राहण्याचा अधिकार ही संज्ञा लक्षणीय आहे. त्यात खासगीपणा, गोपनीयता, स्वातंत्र्य, संरक्षण असे सारेच अंतर्भूत आहे.

या लेखात पुढे या लेखकद्वयीने एक भीती व्यक्त केली होती. ते म्हणतात, ‘व्यक्तीच्या संरक्षणासाठी आणि एकले राहण्याचा अधिकार सुरक्षित राहावा यासाठी पुढची पावले उचलण्याची गरज आहे. अलीकडे लागलेले शोध आणि व्यवसाय पद्धती यांमुळे याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तत्काळ निघणारी छायाचित्रे आणि वृत्तपत्र उद्योग हे खासगी व कौटुंबिक जीवनाच्या पवित्र क्षेत्रात घुसखोरी करू लागले आहेत. ‘वस्त्रकपाटांमधली कुजबूजही घरांच्या छतावरून जाहीर केली जाईल’, अशी भविष्यवाणी केली जाते. आज अनेक यांत्रिकी साधनांमुळे ती भविष्यवाणी खरी ठरेल अशी भीती निर्माण झालेली आहे. १३५ वर्षांपूर्वी व्यक्त करण्यात आलेली ही भीती आजही तितकीच खरी आहे. या लेखातून त्यांनी ‘आपला कायदा गोपनीयतेचा अधिकार मान्य करील का? खासगीपणाचे संरक्षण करील का?’ असा सवाल केला होता. याबाबत न्यायालयांनी लवकरच विचार करावा असे आवाहन केले होते. आणखी काही वर्षांनी तो हक्क, अधिकार प्रत्यक्षात येणार होता.

खासगीपणाच्या हक्काची लागवड

तर या अशा विचारांतून, वैचारिक घुसळणीतून पाश्चात्य समाजात खासगीपणाच्या हक्काची पक्की लागवड झाली. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि तिचे घर हा तिचा किल्ला, हे एकदा पक्के झाले, की मग ‘नॉक अँड अनाऊन्स’ हा नियम केवळ राज्ययंत्रणेपुरताच राहात नाही. शेजाऱ्यांनीही त्या व्यक्तीच्या घरी जायचे, तर आधी कळवून जायला हवे, ही जाणीव यातून उतरत जाते. प्रत्येकाचा वैयक्तिक अवकाश जपणे ही स्वाभिवकता बनून जाते. त्यावर आक्रमण हा कायद्याने गुन्हा तर ठरतोच, पण ते असभ्य, असंस्कृत मानले जाते. पाश्चात्य समाजाची मानसिक जडणघडण या पद्धतीने होत गेली. या अशाच समाजात स्नोडेन जन्मू शकतो. व्यक्तीच्या स्वातंत्र्याची चाड असलेल्या व्यक्तींमधूनच डंकन कॅम्पबेल यांच्यासारखा पत्रकार वा चेल्सिया मॅनिंग यांच्यासारखा जागल्या पुढे येऊ शकतो. पण म्हणून हा समाज पाळतखोरीपासून मुक्त झाला असे म्हणता येईल ?

तसे होत नसते. खरेतर तेथे स्नोडेन वा मॅनिंग ‘आहेत’ यातच या प्रश्नाचे उत्तर आहे. पाळतखोरी ही राज्ययंत्रणेची, सत्ताधाऱ्यांची गरज आहे. आपल्या पूर्वसूरींनी या बाबत आखून दिलेल्या रस्त्यावरूनच ते चालत आहेत. कालानुरूप तंत्रे बदलली, गरजा विस्तारल्या. ‘गरजवंत’ ही वाढले. वेढिले विश्वमंडळा हे आजचे तिचे अक्राळविक्राळ स्वरूप आहे. ते किती भयंकर आहे याची जाणीव पहिल्यांदा जगाला झाली, ती १९७६मध्ये. मोठी थरारक कहाणी आहे, ती…

( समतावादी मुक्त संवाद पत्रिकेवरुन साभार. रवि आमले हे ज्येष्ठ पत्रकार संपादक, प्रथितयश लेखक आणि भाष्यकार आहेत. त्यांची प्रोपगंडा, रॉः भारतीय गुप्तचर संस्थेची गूढ गाथा, मॅनहंट (अनुवादित), परकीय हात, वरुण ते बहिर्जी आदी पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत.)

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या

बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट