Bisrakh : दिल्लीजवळ रावणाचं जन्मगाव, तिथं कसा साजरा होतो दसरा?

Bisrakh

नवी दिल्ली :  जेव्हा संपूर्ण देश दसऱ्याच्या दिवशी वाईटाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो, तेव्हा दिल्लीजवळील एका गावात रावणाची पूजा केली जाते. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील या गावाचं नाव आहे बिसरख. पौराणिक कथांनुसार या गावाला रावणाची जन्मभूमी मानली जाते. इथं रावणाचा पुतळा जाळला जात नाही, तर त्याच्या विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा सन्मान करून त्याची पूजा केली जाते. (Bisrakh)

स्थानिक लोकांची माहिती आणि पौराणिक कथांनुसार, रावणाचे वडील ऋषी विश्रवा यांच्या नावावरून बिसरख हे गावाचं नाव पडलं आहे. याचं मूळ नाव ‘विश्वेशरा’ होतं, जे कालांतराने बदलून बिसरख झालं. नोएडाच्या शासकीय गॅझेटमध्येही या गावाचं ऐतिहासिक महत्त्व सांगितलं आहे. शिवपुराणातही या स्थानाचा उल्लेख आहे. त्रेतायुगात याच गावात ऋषी विश्रवा यांचा जन्म झाला आणि त्यांनी येथे एक शिवलिंग स्थापित केलं, असं सांगितलं जातं. (Bisrakh)

मंदिराच्या पुजा-याने दिलेल्या माहितीनुसार, ” बिसरख ही रावणाची जन्मभूमी आहे. हे ठिकाण ऋषी पुलस्त्य मुनिंचा आश्रम होते. येथील शिवलिंग स्वयंभू आहे, ज्याची सेवा ऋषी विश्रवा यांनी केली. याच ठिकाणी विश्रवा यांचा पुत्र रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि कन्या शूर्पणखा यांचा जन्म झाला.

बिसरखमधील सर्वात अनोखी परंपरा म्हणजे दसऱ्याचा सण साजरा करण्याची पद्धत देशभर रावण दहन केलं जात असताना बिसरखमध्ये लोक रावणाच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतात. येथे दस-याला रावणाचा पुतळा जाळला जात नाही. यज्ञशाळेसमोर रावणाची मूर्ती ठेवून हवन आणि पूजा केली जाते. गावातील रहिवासी रावणाला आपला पूर्वज मानतात. (Bisrakh)

पूर्वी ही श्रद्धा फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित होती. पण सोशल मीडियामुळे आणि इंटरनेटमुळं या गावाची कहाणी दूरदूरपर्यंत पोहोचली आहे. आता हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नाही, तर पर्यटक आणि जिज्ञासूंच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे.

बिसरख गावाची ही अनोखी परंपरा आपल्याला भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची आठवण करून देते. जिथं पुराणातल्या एकाच व्यक्तिरेखेकडं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते – कुठं तो वाईटाचं प्रतीक म्हणून, तर कुठं तोच व्यक्ती प्रकांड विद्वान म्हणून. (Bisrakh)

Related posts

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर

१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी

जगभरात विकल्या जाणा-या चारपैकी एक कार इलेक्ट्रिक