Bhujbal : छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात कमबॅक

Bhugbal

मुंबई : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवत सत्तेत आलेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना वगळण्यात आले होते. ‘जहाँ नही चैना, वहा नही रेहना’ अशी खंत व्यक्त करत नाराजी व्यक्त करणाऱ्या ७७ वर्षीय छगन भुजबळांचे मंगळवारी (२० मे) पुनर्वसन करण्यात आले. राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने त्या रिक्त जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले आहे. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार असून तिथे भुजबळ सहभागी होणार आहेत.

विधानसभेत महायुतीला प्रचंड यश मिळून पहिल्या मंत्रिमंडळात भुजबळांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पक्षापासून लांब रहात होते.

मंत्रीमंडळातील समावेशाच्या वृत्तानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी एक आठवड्यापूर्वीच मंत्रीमंडळात समावेश होणार होता अशी माहिती होती. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हा निर्णय घेतला होता, असेही भुजबळ म्हणाले.

भुजबळांची कारकीर्द अशी

नाव : छगन चंद्रकांत भुजबळ

जन्म : १५ ऑक्टोबर १९४७

पदवी : मेकॅनिकल इंजिनिअर डिप्लोमा

१९७३ : मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक

१९७३ ते १९८४ : महानगरपालिका विरोधी पक्षनेते

१९८५ : मुंबई महानगरपालिकेचे शिवसेनेचे महापौर

१९९१ :  मुंबई महानगरपालिकेचे दुसऱ्यांदा महापौर

१९८५ : माझगावचे आमदार

१९९० : माझगावचे दुसऱ्यांदा आमदार

१९९१ : मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश

१९९१ : महसूल मंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे मंत्री

१९९६ : विधान परिषदेत विरोधी पक्षनेते

१९९९ : काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश

१९९९ : राज्याचे उप मुख्यमंत्री, गृह आणि पर्यटन मंत्री

२००२ : विधान परिषदेवर बिनविरोध निवड

२००४ : येवला विधानसभा मतदारसंघातून विजय

२००४ : सार्वजनिक बांधकाम मंत्री

२००८ : राज्याचे उप मुख्यमंत्री

२०१९ : महाविकास आघाडीत कॅबिनेट मंत्री

२०२५ : महायुतीमध्ये मंत्रिपदाची शपथ

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर