कोची : ‘इंडिया’ म्हणजे भारत हे भाषांतर योग्यच आहे. तथापि, भाषांतर न करता भारत असाच सार्वत्रिक उल्लेख केला पाहिजे. वैयक्तिक असो वा सार्वजनिक ठिकाणी लिहिताना बोलताना आपण भारत असाच उल्लेख केला पाहिजे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. (Bhagwat on INDIA)
राष्ट्रीय अस्मितेच्या विषयावर भाष्य करताना भागवत यांनी भाषांतराशिवाय ‘भारत’ हे नाव जपण्याचा जोरदार आग्रह धरला.
आरएसएसशी संलग्न संस्था शिक्षण संस्कृती उत्थान न्यासद्वारे आयोजित ‘ज्ञान सभा’ या राष्ट्रीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की भारताने ‘सोन्याचा पक्षी’ या प्रतीकात्मकतेच्या पलीकडे जाऊन ‘सिंह’ बनले पाहिजे.
भारताची मूळ ओळख आपण जपलीच पहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. ‘‘जर तुम्ही तुमची ओळख गमावली तर तुमच्याकडे जे महत्त्वाचे गुण आहेत त्या गुणांची पर्वा न करता, जग तुमचा आदर किंवा संरक्षण करणार नाही. जगाचा हाच मूलभूत नियम आहे,’’ असे भागवत यांनी नमूद केले. (Bhagwat on INDIA)
भागवत यांनी शिक्षणाचा उद्देश आणि मूल्यांबद्दलचा उल्लेखही सविस्तर केला. खरे शिक्षण हे व्यक्तीमध्ये त्याग आणि निस्वार्थीपणाची भावना निर्माण करताना स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम करते. ‘‘स्वार्थ शिकवणारे शिक्षण हे खरे शिक्षण नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. (Bhagwat on INDIA)
ते पुढे म्हणाले की शिक्षण केवळ शाळांपुरते मर्यादित नाही तर ते घर आणि समाजापर्यंत विस्तारते. ‘‘मुले ज्या वातावरणात वाढतात ते महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासू आणि जबाबदार पिढी घडवण्यासाठी कोणत्या प्रकारचे वातावरण आवश्यक आहे याचा विचार समाजाने केला पाहिजे,’’ असे भागवत म्हणाले.
भारताने सिंह बनले पाहिजे
भारताने ‘सोन्याचा पक्षी’ हे प्रतीक सोडून देऊन बलवान ‘सिंह’ बनले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताने एक मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राष्ट्र बनले पाहिजे. जग ताकद ओळखते आणि त्याचा आदर करते, असे ते म्हणाले. (Bhagwat on INDIA)
“जगाला शक्तिशाली कोण आहे ते समजते. म्हणून, भारताने बलवान बनले पाहिजे. आर्थिकदृष्ट्याही त्याने समृद्ध बनले पाहिजे,” असे भागवत म्हणाले. जागतिक व्यवस्थेत भारताला त्याचे योग्य स्थान मिळवण्यासाठी शक्ती आणि समृद्धी आवश्यक आहे यावर भर दिला.
या परिषदेला केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्यासह भारतातील अनेक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि कुलगुरू उपस्थित होते. शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे अध्यक्ष डॉ. पंकज मित्तल, सचिव डॉ. अतुल कोठारी, समन्वयक ए. विनोद, कोचीन शिपयार्डचे अध्यक्ष मधु नायर हे देखील उपस्थित होते.