मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक प्रचारादरम्यान आणि मतदानादिवशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर आता ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या गोदामाच्या (स्ट्रॉंगरूम) बाहेर त्यांच्यात राडेबाजी सुरु असल्याचे चित्र बुधवारी अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. मतदानाच्या टक्केवारीत बदल आणि ईव्हीएम मशीनमध्ये झेडछाड झाल्याच्या कारणावरून सांगलीत आष्टा व चंद्रपूरमध्ये विरोधकांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २१ डिसेंबर पर्यंत या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती राहण्याची भीती व्यक्त होत आहे. (Ashta, Chandrapur Rada)
मतदानाच्या आकडेवारीत वाढ झाल्याची अफवा
सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपालिकेसाठी मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यातच मतदानाच्या आकडेवारीमध्ये दोन हजारांची वाढ झाली आहे अशी अफवा पसरली. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटांसह सहकारी पक्षांनी स्ट्रॉग रुमकडे धाव घेतली. तिथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी करत दोन हजार मतदानाची वाढ कशी झाली असा सवाल केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. स्ट्राँग रुम परिसरात मोठा पोलिस फौजफाटा बोलवण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानात वाढ झालेली नाही, असा खुलासा केला. विरोधकांनी सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप केला. आमदार जयंत पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. परिसरात कार्यकर्त्यांनी मुक्काम ठोकला आहे. (Ashta, Chandrapur Rada)
कार्यकर्त्यांना बंदोबस्तास राहण्याची परवानगी
मशीन हॅक केल्या जाण्याच्या आरोपामुळे मतदान यंत्र ठेवलेल्या गोदमाबाहेर (स्ट्रॉंगरूम) पोलिसांबरोबरच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही बंदोबस्तासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रातील सत्तेत एकत्र असलेल्या मित्र पक्षांनाच आपल्या सहकारी पक्षावर विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सीसीटीव्हीची सोय करण्याची मागणी
राज्यातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवारी सरासरी मतदान झाले. अनेक ठिकाणी राडेबाजी, बोगस मतदार व आचारसहिंतेच्या भंगामुळे वादग्रस्त ठरली. त्यातच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन डिसेंबरला होणारी मतमोजणी सर्व नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर २१ डिसेंबरला मतमोजणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ईव्हीएम मशीन तोपर्यंत स्ट्राँगरूममध्ये ठेवावे लागणार आहे. या कालावधीत मतदान यंत्रामध्ये छेडछाड केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व स्ट्राँगरूम बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आणि खाजगी पहारा देण्याची मागणी केली जात आहे. (Ashta, Chandrapur Rada)
प्रत्येक आठ तासाला दोन उमेदवार देणार पहारा
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. न्यायालयाच्या आदेशानं वीस डिसेंबर रोजी दुसरा टप्पा पार पडेल, त्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी एकत्रित मतमोजणी होईल. त्यामुळे पुढील सतरा दिवस ईव्हीएम मशीन सांभाळण्याची जबाबदारी पोलीस आणि सरकारी यंत्रणेवर येऊन पडली आहे. तरीही निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पाहारा देखील लावला आहे. प्रत्येक आठ तासाला दोन उमेदवार स्ट्राँग रूमभोवती पाहारा देणार आहेत. विशेषतः बहुतांश ठिकाणी महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत असून त्यांना एकमेकांवर विश्वास नाही, निवडून येण्यासाठी लढलो, अशी भावना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी व्यक्त केली.
स्ट्राँग रूमवर करडी नजर : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला मतमोजणी होईपर्यंत सर्व ठिकाणच्या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी जिल्हाप्रशासनासोबत पोलीस यंत्रणा देखील सुरक्षेसाठी सज्ज झाली आहे. तीन पाळीमध्ये तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.