Arjun Babuta : अर्जुन बाबुताचा रौप्यवेध

Arjun Babuta

लिमा : भारताच्या अर्जुन बाबुताने आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये १० मीटर एअर रायफलच्या पुरुष गटात रौप्यपदकाचा वेध घेतला. त्याचे सुवर्णपदक अवघ्या ०.१ गुणाने हुकले. याच प्रकारामध्ये भारताचा आघाडीचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने अंतिम फेरीमध्ये अकराव्या शॉट्सचे गुण नोंदवण्यात न आल्यामुळे अर्ध्यातून माघार घेतली. (Arjun Babuta)

पेरूची राजधानी लिमा येथे ही स्पर्धा सुरू आहे. १० मी. एअर रायफलच्या प्राथमिक फेरीत रुद्रांक्षने ६३२.० गुणांसह तिसऱ्या, तर अर्जुनने ६३१.९ गुणांसह चौथ्या स्थानी राहून अंतिम फेरी गाठली. चीनचा लिहाओ शेंग प्राथमिक फेरीत ६३५.० गुणांसह अव्वलस्थानी राहिला. अंतिम फेरीमध्ये पहिल्या टप्प्याअखेर अर्जुनने १०५.४ गुण मिळवले. या टप्प्याअखेर रुद्रांक्ष आणि लिहाओ हे दोघेही प्रत्येकी १०४.८ गुणांवर होते. अकराव्या शॉटवेळी रुद्रांक्षने सूचनेपूर्वी फायर केले. त्याने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा निकाल देत पंचांनी त्याच्या या शॉटचे गुण नोंदवले नाहीत. त्यामुळे, निराश झालेल्या रुद्रांक्षने अंतिम फेरीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. (Arjun Babuta)

अंतिम फेरीतील निर्णायक एलिमिनेशन टप्प्यामध्ये लिहाओ आणि अर्जुन यांच्यामध्ये प्रत्येक शॉटमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेरच्या दोन शॉटपूर्वी अर्जुनचे २३१.५, तर लिहाओचे २३१.२ गुण झाले होते. अर्जुनकडे ०.३ गुणांची आघाडी असल्यामुळे तो सुवर्णपदकाचा दावेदार होता. तथापि, अखेरच्या दोन शॉटमध्ये लिहाओने १०.९ व १०.३ गुणांचा वेध घेतला. त्याचवेळी, अर्जुनला १०.३ व १०.५ असे गुण मिळवता आले. परिणामी, लिहाओचे २५२.४, तर अर्जुनचे २५२.३ गुण झाले व लिहाओने अवघ्या ०.१ गुणांच्या आघाडीसह सुवर्णपदक निश्चित केले. हंगेरीचा इस्तवान मार्टन पेनी हा २२९.८ गुणांसह ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. भारताचे हे या स्पर्धेतील दुसरे रौप्यपदक ठरले. याबरोबरच, भारताची या स्पर्धेतील पदकांची संख्या पाचवर पोहोचली असून त्यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझपदकाचा समावेश आहे. (Arjun Babuta)

याच प्रकारामध्ये महिला गटात भारताच्या आर्या बोरसेने प्राथमिक फेरीमध्ये ६३३.९ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत मात्र तिला १८८.१ गुणच मिळवता आल्यामुळे ती पाचव्या स्थानावर राहिली. या गटात चीनच्या झिफेई वँगने २५४.८ गुणांसह सुवर्णपदक पटकावतानाच नवा विश्वविक्रमही नोंदवला.   

हेही वाचा :

‘कान’ मध्ये चार मराठी चित्रपट

उद्धव ठाकरेंनी अटी, शर्ती टाकलेल्या नाहीत

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर