रात्रीच्या अंधारात ३० फूट खोल विहिरीत पडला एक प्रचंड हत्ती! मृत्यू समोर उभा होता, पण वन अधिकाऱ्यांनी बुद्धीचातुर्य वापरून विज्ञानाचा वापर केला. – आर्किमिडीजचे तत्त्व! विहिरीत पाणी भरून हत्तीला तरंगवत बाहेर काढलं.
ओडिशातील केन्दुझर जिल्ह्यातील एका थरारक बचाव मोहिमेची ही कहाणी आहे. बनाजोडी गावात एक हत्ती विहिरीत पडला. खोल विहिरीतला हत्ती बाहेर काढणे कठीण होते. परंतु वन विभागाने आर्किमिडीजच्या तत्त्वाचा वापर करून त्याला वाचवलं. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक वन अधिकाऱ्यांचे कौतुक करत आहेत. (Archimedes Saves an Elephant)
हत्ती विहिरीत कसा पडला?…रात्रीच्या वेळी, अन्नाच्या शोधात हा हत्ती बनाजोडी गावात आला. गाव दाट लोकवस्तीचं आहे. गावात एक वापरातली खुली विहीर आहे. सुमारे ३० फूट खोल. अंधारात भटकताना हत्ती चुकून घसरला आणि थेट विहिरीत पडला. सकाळी लोकांना ही घटना कळली. तातडीनं संबंधित यंत्रणांना कळवण्यात आलं. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दल, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीला रॅम्पचा विचार, पण धोका… अधिकाऱ्यांनी सुरुवातीला रॅम्प म्हणजे तिरपा उतार बनवून हत्तीला बाहेर काढण्याचा प्लॅन केला. पण विहिरीच्या भिंती कोसळण्याचा मोठा धोका होता. त्यामुळं हत्ती घसरून पुन्हा पडण्याची शक्यता होती. म्हणून हा पर्याय बाजूला ठेवण्यात आला. (Archimedes Saves an Elephant)
आर्किमिडीजच्या तत्त्वाचा वापर… वन अधिकाऱ्यांनी आर्किमिडीजच्या तत्त्वाचा वापर केला: तर आर्किमीडिज या ग्रीक गणितज्ञाचा हा सिद्धांत आहे. एखादा पदार्थ द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात बुडविला तर त्यावर खालून वर असे एक बल लागू होते. त्याचे मूल्य पदार्थाने बाजूस सारलेल्या द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थाच्या वजनाएवढे असते. बाजूस सारलेल्या द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थाचे घनफळ पदार्थाच्या बुडालेल्या भागाच्या घनफळाएवढे असते.म्हणजे विहिरीत पाणी सोडले तर हत्ती पाण्याच्या वर येऊ शकतो. त्यानुसार दोन मोठ्या नळांवाटे विहिरीत पाणी सोडले गेले. पाण्याची पातळी वाढत गेली. तसतसा हत्ती तरंगत वर येऊ लागला. (Archimedes Saves an Elephant)
सहा तासांचे थरारक ऑपरेशन…. ही संपूर्ण मोहीम जवळपास सहा तास चालली. हत्ती थकलेला होता, पण पाणी वाढत गेले. रात्रीपासून सकाळपर्यंत टीम सतर्क राहिली. पाणी काठापर्यंत पोहोचल्यानंतर जेसीबी मशीनने विहिरीच्या काठाचा थोडी भाग हलवून हत्तीला बाहेर निघण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. आणि जेसीबीच्या सहाय्याने हलकेच ढकलून हत्तीला बाहेर काढले.
हत्ती सुरक्षित बाहेर… हत्ती सुरक्षित बाहेर आला. परंतु त्याला जेसीबीने वर ढकलल्यामुळे तो जेसीबीवर संतापला होता. त्या संतापाच्या भरात त्याने जेसीबी मशिनला दोनतीन वेळा धडका देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्रासदायक असल्याचे लक्षात आल्यावर माघार घेऊन जंगलात परत गेला – कोणतीही इजा किंवा अपघात न होता हत्ती सुरक्षित बाहेर आला आणि जंगलात निघून गेला.हे सामान्य बचावकार्य नाही, तर विज्ञान, धैर्य आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाची प्रेरणादायी कथा आहे. (Archimedes Saves an Elephant)