ज्ञान संकुलाच्या उत्तम प्रशासक  : प्राचार्या शुभांगी गावडे

An excellent administrator of the Knowledge Complex

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या मातोश्री, संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांचे ३०एप्रिलरोजी दुःखद निधन झाले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य पुढील पिढीस निश्चितच दिशादर्शक आहे. यासाठी त्यांना ही भावपूर्ण शब्दांजली…

हितेंद्र साळुंखे

          शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी लावलेल्या रोपट्याचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी वटवृक्ष बनविले. या वटवृक्षाला प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांनी आपल्या नवनवीन कल्पना आणि उपक्रमांचे खतपाणी घालून संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे. सन १९९१ ते २००९ या काळात प्राचार्या गावडे मॅडम यांनी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, कोल्हापूर येथे शिक्षिका, मुख्याध्यापक, प्राचार्या म्हणून कार्य करीत असताना हजारो विद्यार्थी घडविले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींचे ज्ञान बिंबवण्यामध्ये त्या नेहमीच आग्रही असत. २००९ पासून प्राचार्या शुभांगी गावडे यांनी संस्थेचे सचिव म्हणून कामास सुरुवात केली. त्यांच्या एकूण ३४ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी सतत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला. (An excellent administrator of the Knowledge Complex)

विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास आणि मूल्य शिक्षणावर आधारित नवी शिक्षण पद्धती अवलंबविण्यासाठी त्या आग्रही असत. संस्थेच्या सुमारे ४१०संस्कार केंद्रांमधून त्यांच्या सचिव पदाच्या प्रशासकीय कालावधीत त्यांच्या कार्यकर्तृत्वातून शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल करण्यासाठी त्यांनी नवनवीन उपक्रम संस्थेच्या विविध शाखांमध्ये राबविले. इंजिनियरिंग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, आरटीफिशियल इंटेलिजन्स, लॉ कॉलेज यासारख्या शाखांचा शुभारंभ त्यांच्याच कार्यकाळात झाला. त्यांनी संस्थेच्या विविध शाखांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून संस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसारख्या एका मोठ्या संस्थेचे नेतृत्व करीत असताना त्यांनी दाखवलेली प्रशासकीय कुशलता आणि नम्रता वाखाणण्याजोगी आहे. गुरुदेव कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या मधुर वाणीत होते. ‘लीनता’ हा त्यांचा स्वभावधर्म होता. संस्थेतील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याला जीव आणि लळा लावण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच त्यांना मातृहृदयी प्रशासक असे म्हणता येईल. त्या फक्त प्रशासक नव्हत्या तर सहकाऱ्यांवर, विद्यार्थ्यांवर निखळ प्रेम करणाऱ्या माऊली होत्या. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांना त्यांचे प्रेम, समर्पण आणि माणुसकीची अनुभूती मिळालेली आहे. (An excellent administrator of the Knowledge Complex)

प्राचार्या गावडे यांच्या व्यक्तिमत्वात संस्थेतील पारदर्शी कारभारामुळे एका प्रकारची सहजता जपली गेली होती. शिक्षण क्षेत्रात विविध पदांवर काम केल्यामुळे त्यांना शिक्षकांना, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची चांगली जाणीव होती. त्यामुळेच सर्वांशी चर्चा करून त्या समस्यांचे निराकरण करण्याचे कसब त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. ज्ञानाबरोबरच उत्तम व्यवस्थापन महत्त्वाचे असते, याचे द्योतक प्राचार्या गावडे यांच्या कार्यामधून आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून दिसून येते. संस्थेचे जाळे महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातही पसरलेले आहे. इतका मोठा व्याप सांभाळत असताना त्यांनी संस्थेच्या विकासास प्राधान्य देऊन जास्तीत जास्त वेळ संस्थेस देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

          प्राचार्या गावडे यांनी सचिव, प्राचार्या, शिक्षक याबरोबरच शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य, राज्य शासनाच्या तेजस्विनी महिला आश्रमामध्ये शिक्षणतज्ञ तसेच महिला कल्याण समितीचे सदस्य म्हणून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या उत्तुंग कार्याचा गौरव म्हणून त्यांना आदर्श महिला पुरस्कार, राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार, आधुनिक सावित्री पुरस्कार, श्री प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊसने दिलेला स्टार संस्थाचालक पुरस्कार आणि स्टार अकॅडमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा हा वारसा आपण सर्वजण असाच पुढे नेऊया. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. (An excellent administrator of the Knowledge Complex)

हितेंद्र साळुंखे, सहाय्यक ग्रंथपाल, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Related posts

नवभारत निर्मितीचा ध्यास; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

आपले घर, आपला किल्ला !