अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी भूमिका घेऊन थांबलेले नाहीत, तर वाचाळ हिंदुत्ववादी नेत्यांना त्यांनी अजितदादांच्यावर सोडले आहे. गेले काही महिने संग्राम जगताप विद्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या टोळीत सामील होऊन दोन समाजात तेढ निर्माण करीत असताना अजितदादा नोटिस नोटिस इशारा इशारा खेळ खेळत आहेत. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर अशीच अजितदादांची यातली भूमिका दिसते. त्यामुळे पुरोगामित्व मिरवणारे अजितदादा हळुहळू हिंदुत्वाकडे वळतात की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे.
विजय चोरमारे
दिवाळीच्या तोंडावर सोलापूर येथे झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी, ‘दिवाळीची खरेदी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच करा’ असे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. संग्राम जगताप यांच्यामुळे पक्षाध्यक्ष अजित पवारांची डोकेदुखी वाढली असून धरले तर चावते, सोडले तर पळते अशी त्यांची अवस्था झाली आहे. सोलापूरचे वक्तव्य ही पहिली वेळ नाही. संग्राम जगताप यांनी यापूर्वीही पडळकर, एकबोटे वगैरेंच्या साथीने विद्वेषपूर्ण वक्तव्ये केली आहेत. जाहीर सभांमधून धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केले आहे. अजित पवार यांनी यापूर्वी इशारा देऊनही संग्राम यांनी त्यांना जुमानलेले नाही. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ आहेत.
संग्राम जगताप वाचाळांच्या दिंडीत सहभागी
आपण जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा विचार केला तर, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष नेहमीच शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा, पुरोगामी आणि सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करत आला आहे. अजित पवार गटाने भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केली असली तरी, त्यांनी अनेकदा आपण पुरोगामी विचारधारेवरच ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, आता त्यांच्याच पक्षाचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन वाचाळांच्या दिंडीत सहभागी झाल्यानें पक्षांतर्गत आणि राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Ajit Pawar’s dilemma)
अर्थात संग्राम जगताप यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पक्षाची ध्येयधोरणे निश्चित झाल्यानंतरही अशी वक्तव्ये मान्य नाहीत. जगताप यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे आणि आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत.” असे अजित पवारांनी म्हटले आहे. यापूर्वीही संग्राम जगताप यांना अशा वक्तव्यांबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, पण त्यांच्यात सुधारणा दिसून येत नाही.
या घटनेमुळं अजित पवारांची नेमकी कोंडी का होत आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
पहिली गोष्ट म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेला जगताप यांच्या वक्तव्याने आव्हान दिले आहे. पुरोगामी विचारसरणीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादीसाठी, एका आमदाराने थेट धार्मिक ध्रुवीकरण करणारे विधान करणे हे पक्षाच्या आणि अजित पवार यांच्या प्रतिमेला मारक ठरू शकते.
दुसरी गोष्ट, अजित पवार सध्या भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत आहेत. भाजपची विचारसरणी हिंदुत्ववादी असली तरी, अजित पवारांनी आपल्या पक्षाची स्वतंत्र ओळख जपण्याचा प्रयत्न केला आहे. जगताप यांच्या विधानामुळे अजित पवारांना आपल्या मित्रपक्षांसमोर आणि विरोधकांसमोरही पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची कसरत करावी लागत आहे. (Ajit Pawar’s dilemma)
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनी तर, जगताप यांना नुसती नोटीस बजावून काहीच होणार नाही, तर त्यांची पक्षातून हकालपट्टीच करा, अशी मागणी केली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील संघर्षात अजित पवार यांच्यावर नामुष्कीची पाळी आली आहे.
स्थानिक पातळीवरील राजकीय विश्लेषकांच्या मते, संग्राम जगताप यांचा वारकरी संप्रदायापासून प्रखर हिंदुत्ववादाकडे झालेला प्रवास आश्चर्यकारक आहे. अहिल्यानगर शहरातील स्थानिक राजकारणामुळे त्यांनी जाणीवपूर्वक ही भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात त्यांना कमी मतदान झाले. आपल्याला मतदान न करणा-या स्थानिक मुस्लिमांवर सूड उगवण्यासाठी त्यांचा मुस्लिमद्वेष उफाळून आला असून ते राज्यभर मुस्लिम समाजाविरोधात द्वेषाची पेरणी करीत फिरत आहेत. परंतु त्यांच्यामुळे अजित पवार यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. अजितदादांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक संघर्षाचे प्रसंग, चढउतार आले. परंतु आपला एखादा आमदार ऐकत नाही, अशी हतबलता पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. संग्राम जगताप यांची ही भूमिका अजितदादा यांच्याविरोधातील थेट बंड असल्याचे मानले जाते. पक्षाने आपल्याला काढून टाकावे, त्यानंतर आपण भाजपमध्ये जाऊन किंवा मोकळे राहून कोणतेही उपद्व्याप करायला मोकळे, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र नगरपालिकेच्या एकेका वॉर्डासाठी, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या एकेका जागेसाठी सगळे राजकीय पक्ष बेरजेचे राजकारण करीत असताना एका आमदाराला पक्षातून काढणे अजित पवार यांच्यासाठी कठीण बनले आहे. वीस वर्षांपूर्वी शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे असाच पेच निर्माण केला होता. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीने शालिनीताईंना निलंबित केल्यानंतर वादळ थांबले होते. तेवढा कणखरपणा अजितदादा पवार दाखवतात का, हे पाहावे लागणार आहे.
अजितदादांच्यासाठी याहून वाईट गोष्ट म्हणजे अजितदादांना सतत शिविगाळ करणारे गोपीचंद पडळकर, मिलिंद एकबोटे वगैरेंसोबत संग्राम जगताप फिरत आहेत. आणि त्यांना पक्षाने नोटिस दिल्यानंतर ही मंडळी अजितदादांना जाहीर सल्ले देत आहेत. एकूणच भाजपच्या गोटातून संग्राम जगताप यांना बळ मिळताना दिसत आहे. जर अजित पवारांनी जगताप यांच्यावर कठोर कारवाई केली नाही, तर त्यांच्या पुरोगामी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. आणि कारवाई केल्यास महायुतीअंतर्गत नाराजी आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
राजकारणात सध्या सुरू असलेल्या या हिंदुत्ववादी भूमिका आणि पुरोगामी विचारधारेच्या संघर्षाला नेमकी कोणती दिशा मिळते, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी स्वतःच्याच पक्षाच्या एका आमदाराने अजित पवारांची कोंडी केली आहे. मुस्लिमांनी मतदान केले नाही, हे संग्राम जगतापांच्या भूमिकेचे एक कारण आहेच. परंतु त्याचबरोबर तीन वेळा निवडून येऊनही मंत्री केले नाही म्हणूनही त्याचे अजितदादांच्या विरोधात हे बंड असल्याचे मानले जाते. अजितदादांच्यादृष्टिने कठीण गोष्ट म्हणजे त्यांनी याप्रकरणी मवाळ भूमिका राखली तर पक्षातले इतरही लोक अजितदादांना हलक्यात घेऊ लागतील. त्याचा अजितदादांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नोटिस देणे, इशारा देणे वगैरे उपचार सुरूच राहतात. वृत्तवाहिन्यासुद्धा कान टोचले, कानउघाडणी केली वगैरे विशेषणे वापरतात. परंतु याला काहीही अर्थ नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे. अजितदादा नेमकी कारवाई काय करतात, याचीच महाराष्ट्राला उत्कंठा आहे. (Ajit Pawar’s dilemma)