अजितदादा – अचानक कापला गेलेला ‘रोल’

Ajit Pawar, Condolences, Baramati

वृत्तवाहिन्यांवर चोवीस तास राजकारण वाहत असतं. लोकही आता बातम्या मनोरंजन म्हणूनच पाहतात. त्यामुळे राजकारण म्हणजे त्यांच्या लेखी कधीही न संपणारी मालिका उर्फ सीरीयल झाली आहे.

या ‘मालिके’तले अजित पवार हे ‘पात्र’ किती लोकप्रिय होते हे आज सोशल मिडियातील प्रतिक्रियांवरून कळावे. सकाळी उठून झपाझप कामे करणारे, कोरोनाच्या काळातही मंत्रालयात येणारे, समोरच्यांना स्पष्टपणे वाजवणारे, अलिकडे गुलाबी कोट घालून स्वतःवर विनोद करणारे, काकांसमोर बराच काळ माघार घेणारे, नंतर काकांना ‘आता घरी बसा’ सांगणारे इत्यादी.

मराठी राजकारणाचा इतका डेली सोप झाला नव्हता त्या काळातली एक गोष्ट आहे. बहुदा २००४ च्या दरम्यानची असावी. एका कुठल्याशा प्रचारसभेत बोलताना दादा म्हणाले, “कामं आम्ही करायची आणि मतं मात्र तुम्ही दुसऱ्यांना देणार. हे यापुढे चालणार नाही. आम्हाला मतं मिळाली नाहीत तर कामंही होणार नाहीत.”

‘ही मतदारांना थेट धमकी आहे व सबब गुन्हा आहे’, असे म्हणून आम्ही इटीव्ही मराठीवर याची मोठी बातमी करून चालवली. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तेव्हा वाहिन्या कमी होत्या. शिवाय निर्ढावलेपणा आजच्याइतका नव्हता. त्यामुळे त्याची थोडीफार (का होईना) चर्चा झाली.

त्यानंतर एकदा मुलाखतीसाठी अजितदादांच्या बंगल्यावर गेलो होतो. तेव्हा खासगी गप्पात त्यांनी स्वतःहूनच या बातमीचा संदर्भ दिला व ते म्हणाले, ‘लोकांना ज्या भाषेत कळते त्याच भाषेत आम्हाला बोलावे लागते.’ थोडक्यात, आपण काहीही चुकीचे केलेले नाही हे ते अगदी निर्मळपणे पटवून देत होते.

त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी बहुदा सांगलीमध्ये, ‘होय मी टग्या आहे’, असे एका सभेत सांगितले. ही कबुलीही त्यांच्या त्याच ‘निर्मळ’पणाचा भाग होती.

अलिकडच्या काळात दादांची हीच ‘लोकांची भाषा’, स्वयंघोषित ‘टगे’गिरी राजकीय मालिकेच्या ‘प्रेक्षकां’मध्ये सुपरहिट झाली होती. “बाकी काही असो दादा ‘कामाचा माणूस’ आहे”, असे हे प्रेक्षक म्हणू लागले होते.

दादांची दोन वाक्ये तर सुपरडुपर हिट आहेत. इतकी की सध्याच्या राजकीय मालिकेतील सर्व पात्रे सोईस्कर असेल तेव्हा ती उच्चारून समोरच्यांना गप्प करतात. ती वाक्ये अशी- १) कोणी काय बोलावे, करावे…हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. २) ‘विकास करण्यासाठी आम्ही सत्तेत आलो’ किंवा ‘अरे, सत्तेत आलो म्हणूनच आम्ही हा विकास करू शकतो. (Ajit Dada – A role that was suddenly cut short)

सहकार क्षेत्र, मराठे, धर्मनिरपेक्ष राजकारण इत्यादींचे पुढारपण करण्याची शिकवण काकांकडून त्यांनी घेतली व आपल्या रीतीने त्यांनी ती इम्प्रोवाईज केली. म्हणजे बदलत्या काळानुसार सहकारी कारखान्यांच्या जागी खासगी कारखाने केले इत्यादी. सरकार असो की सहकार.. यातून पैशांची आवर्तने निर्माण करायला हवीत, जेणेकरून बरेच लोक त्यात ओढले जातात व आपले मतदार होतात हे काकांचे सूत्र त्यांनी चांगले पकडून ठेवले. किंबहुना, काकांच्या पुढच्या पिढीत मराठा राजकारणाचे मुखंड व्हायला तेच चांगले उमेदवार होते.

नागपूर अधिवेशनाला जाऊनही रा.स्व. संघाच्या मुख्यालयाच्या वाड्यावर हजेरीला न जाणे, भाजपचा प्रचंड विरोध असूनही नबाब मलिक यांची साथ न सोडणे, कटाक्षाने मुस्लिम व तरुणांना उमेदवाऱ्या देणे हे त्यांचे गुण होते व ते मात्र शेवटपर्यंत त्यांनी टिकवले.(Ajit Dada – A role that was suddenly cut short)

पालिका निवडणुकीत त्यांनी भाजपला ज्या रीतीने शिंगावर घेतले होते त्यावरून काकांच्या तरुणपणातल्यासारखी बंडखोर वृत्ती दादांच्यात पुन्हा येऊ लागल्याचे चिन्ह होते. भाजपच्या पक्षनिधीसाठी पुरंदरच्या एका प्रकल्पाची किंमत अमुक कोटी रुपयांनी वाढवली असा आरोप त्यांनी केला होता. सध्याच्या काळात ते धाडसाचे होते. तो तर त्यांनी केलाच शिवाय त्याची फाईलही आहे असे सांगून टाकले.

त्यामुळे अजितदादांचे हे ‘पात्र’ या ‘मालिके’त पुढे कोणते वळण घेणार याची उत्सुकता लागली होती. पण कोण्या ‘अज्ञात दिग्दर्शकां’नी या पात्राचा पुढचा ‘रोल’च आज कायमचा संपवून टाकला. (Ajit Dada – A role that was suddenly cut short)

अजितदादांना श्रध्दांजली!!

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

आपले घर, आपला किल्ला !

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या