नवी दिल्ली : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळले; विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (AIR INDIA Plane Crash)
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) विमान अपघाताची चौकशी करेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
लंडनला जाणारे हे विमान उड्डाणानंतर जवळच्याच मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले.
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील होते, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.
“विजय रूपाणी एअर इंडियाच्या विमानाने लंडनला जात होते,” असे वरिष्ठ भाजप नेते भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी सांगितले.
“मी त्यांची विचारपूस करण्यासाठी शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जात आहे,” असे श्री. चुडासामा यांनी पत्रकारांना सांगितले.
हे विमान लंडनला जात होते. ते शहरातील मेघानी भागात कोसळले. विमान कोसळताना प्रचंड मोठा आवाज झाला आणि काळ्या धुराचे लोट आसमंतात पसरले. घटनास्थळी तातडीने आपत्कालीन मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
‘‘या अपघातात कोणीही वाचलेले दिसत नाही,’’ असे शहराचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी एएफपीला सांगितले. ‘‘विमान निवासी भागात आणि काही कार्यालयांवर पडल्याने मृतांची संख्याही जास्त आहे.’’
प्राथमिक माहितीनुसार, वाइड-बॉडी बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान सुमारे ३०० प्रवासी क्षमतेचे आहे. अपघात झाला तेव्हा त्यात २४२ लोक होते. (AIR INDIA Plane Crash)
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते. त्यामुळे अपघातानंतर झालेल्या स्फोट आणि आगीची तीव्रता वाढली.
बचाव कार्य करण्यासाठी अनेक अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
सध्या जीवितहानीबद्दलचे कसलेही अधिकृत वृत्त नाही.(AIR INDIA Plane Crash)
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) अपघातग्रस्त बोईंगच्या संभाव्य तांत्रिक पथकासह औपचारिक चौकशी सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.
अपघाताच्या संशयास्पद कारणाबद्दल अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. आंतरराष्ट्रीय मार्गावर इंधनाचा जास्त भार असल्याने अपघातानंतर आगीची तीव्रता प्रचंड वाढली असावी. त्यामुळे बचाव कार्य गुंतागुंतीचे झाले असावे, असे तज्ञांचे मत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि अहमदाबाद पोलिस आयुक्तांशी या घटनेबाबत संपर्क साधला आणि चर्चा केली आहे.
अपघातानंतरच्या परिस्थितीचे व्यवस्थापन आणि चौकशीसाठी केंद्र सरकार राज्याला आवश्यक ती सर्व मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
विमान इमारतीवर आदळले
अपघातग्रस्त विमान वसतिगृहाच्या इमारतीवर आदळल्याने ही मोठी दुर्घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या दृश्यांमध्ये विमानाचे अवशेष एका निवासी इमारतीच्या छतावर पडलेले दिसून आले.