मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतिक्षा संपली आहे. आज गुरुवारी ११ सप्टेंबरपासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही खुशखबर दिली आहे. (Aditi Tatkare)
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दर महिन्याला १५०० रुपये लाभार्थी माहिलांच्या बँक खात्यावर जमा होतात. ऑगस्ट महिन्याचा हप्ता १० सप्टेंबर ओलांडूनही जमा झालेला नसल्याने बँक खात्यावर पैसे कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते. आज गुरुवारी मंत्री तटकरे यांनी एक्स पोस्टवर हप्ता जमा होण्याची गोड बातमी दिली. पोस्टमध्ये लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून ११ सप्टेंबर वितरण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती दिली. (Aditi Tatkare)
मंत्री तटकरे यांच्या पोस्टमध्ये “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे ”. (Aditi Tatkare)