पालघर : वाढवण बंदराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली ४० हजार शेतकऱ्यांनी भव्य लाँग मार्च काढला आहे. चारोंटी नाक्यापासून सुरू झालेला मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडणार आहे. डॉ. अशोक ढवळे, मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, आ. विनोद निकोले, किरण गहला यांचे नेतृत्व
वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, वाढवण व मुरबी बंदराला विरोध, रोजगार हमी कायद्यातील बदलांना विरोध व स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होत असलेल्या लुटीला विरोध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तसेच आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या संघटनांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. मंगळवारी माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.
वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी, देवस्थान, इनाम, वरकस व सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे, मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, चार श्रम संहिता रद्द करणे, वाढवण व मुरबे बंदरांसारखे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे, पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, तसेच शिक्षण, रोजगार, रेशन आणि आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे या प्रमुख मागण्या आंदोलनातून मांडण्यात येत आहेत. या भव्य मोर्चात सहभागी झालेल्या जनतेच्या हातात मागण्यांचे फलक, बॅनर्स झळकत असून, शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत हा मोर्चा पुढे जात आहे. मागण्या मान्य होईपर्यंत कोणतीही माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार माकप नेतृत्वाने व्यक्त केला आहे.