Yuva Shibir : ‘शिवाजी महाराज व माझा महाराष्ट्र’ विषयावर होणार मंथन

govind pansare

कोल्हापूर : प्रतिनिधी : श्रमिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा येथे ६ ते ८ जून दरम्यान कॉ. गोविंद पानसरे राज्यस्तरीय युवा जागर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या शिबिरात ‘शिवाजी महाराज व माझा महाराष्ट्र’ या विषयावर मंथन केले जाणार आहे. (Yuva Shibir)

महाराष्ट्रातील विवेकवादाचा समृद्ध वैचारिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतीनिमित्त, श्रमिक प्रतिष्ठान व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्यावतीने सन २०१६ पासून दरवर्षी पन्हाळा येथे विद्यार्थी, युवक, युवतींसाठी तीनदिवसीय राज्यस्तरीय युवा जागर निवासी प्रबोधन शिबीर आयोजित केले जाते. या शिबिरांना दरवर्षी मोठा प्रतिसाद लाभतो. (Yuva Shibir)

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक असामान्य व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. पराक्रमी योद्धा, कुशल रणनीतिकार आणि न्याय्य कार्यक्षम शासक, रयतेची कणव, अखंड व स्वतंत्र भारताची दृष्टी व धार्मिक सहिष्णुता असलेला धैर्यवान राजा अशी शिवरायांची ओळख कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारी आहे. ती येत्या अनेक पिढ्यांना पुनःपुन्हा सांगितली पाहिजे. परंतु आज राजकीय स्वार्थासाठी जेव्हा इतिहासाची मांडणी केली जाते तेव्हा लोकांची दृष्टी भ्रमित केली जाते. खरा इतिहास झाकला जातो. त्यामुळेच छत्रपती शिवरायांचा काळ, राज्यसंस्था – समाज – संस्कृती, धर्म व अर्थकारण, प्रशासन, युद्धनीती व गडकिल्ले, पर्यावरण व भाषा, याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील योगदान आणि परस्परविरोधी प्रवाह अशा विविधांगी पैलूंवर सर्वांगीण चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने यंदाच्या शिबीरासाठी ‘शिवाजी महाराज आणि माझा महाराष्ट्र’ हा बीज विषय निश्चित करण्यात आला आहे. (Yuva Shibir)

पन्हाळा येथील संजीवन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये होणाऱ्या या तीन दिवसीय शिबीराचे उद्‌घाटन शुक्रवार ६ जून रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक  डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी ते ‘शिवछत्रपतींची स्वराज्याची संकल्पना’ या विषयावर मांडणी करतील. तसेच शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभाप्रमुख डॉ. अवनिश पाटील, मुंबईतील मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, सुप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, सुप्रसिद्ध लेखक दत्ता देसाई, इतिहास अभ्यासिक डॉ. मंजुश्री पवार आदी विविध मान्यवरांचे विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे.

शिबिरात पुणे येथील जिंकींग ज्री प्रस्तुत ‘चार बाय तीन’ नाट्यप्रयोगाचे सादरीकरणही केले जाणार आहे. तसेच तीन दरवाजा येथे मशाल फेरीने पन्हाळगडाचा रोमांचकारी इतिहास शिबीरार्थींना अनुभवायास मिळणार आहे. (Yuva Shibir)

महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर शिक्षण घेणारे १८ ते ४० वयोगटातील विद्यार्थी, युवक, युवती यांना शिबिरात सहभागी होता येणार आहे. यासाठी प्रत्येकी फक्त ३०० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणीसाठी सुशील लाड (८५५०९३१००३) अथवा प्रथम नाईक (९८८१८७९०१६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिबिर आयोजक प्रा. डॉ. मेघा पानसरे  व डॉ. मंजुश्री पवार यांनी केले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर