महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड करणार नाही

 -विजय चोरमारे

सातारा : निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झालो तरी काम थांबवणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शक्य तोवर काम करीत राहणार. त्याबाबत तडजोड नाही, मागे हटणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक निवडणुका तुम्ही संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन लढवल्या. आता बस्स झालं, असं वाटतं का? या प्रश्नावर पवार म्हणाले, मी स्वतः लोकसभा किंवा तत्सम निवडणूक अलीकडे लढवत नाही, परंतु माझा पक्ष, सहकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी प्रचार करणे सोडले नाही. ते करत राहणार. त्याबाबत गैरसमज नको. माझी भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे करायची आवश्यकता आहे, ते जोपर्यंत आपण करू शकतो, तोपर्यंत करीत राहायचं. त्याच्यामध्ये तडजोड नाही. मागे हटणार नाही.

प्रश्न : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाराष्ट्रातील वातावरण काय दिसते?

शरद पवार : दोन निवडणुका अलीकडं झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींचा झंझावात असल्याचं चित्र तयार केलं होतं. त्या निवडणुकीत असं चित्र दिसत होतं की जे विरोधी पक्ष आहेत त्यांना एका मर्यादेपर्यंत लोकांचं समर्थन नाही. प्रत्यक्ष घडलं वेगळं. त्यावेळी लोक शांत होते. शांतपणे सगळ्यांची भाषणे ऐकत होते. प्रत्यक्ष मतदानाला गेल्यावर काय घडलं हे आपण पाहिलं. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसला एक जागा मिळाली होती आणि आम्हाला चार. हे चित्र या निवडणुकीत लोक शांत असतानाही लोकांनी बदललं. ४८ पैकी ३० जागा आम्हाला दिल्या. लोकांनी जे ठऱवलं होतं ते दाखवत नव्हते. प्रत्यक्ष कृती हवी तशी केली.

आज वेगळी स्थिती आहे. सत्ताधारी पक्षाला लोकसभेला धक्का बसला. त्याची नोंद त्यांनी घेतली. त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी जे मार्ग अवलंबले ते वेगळे होते. आर्थिक शक्तीचा मारा करणारे होते. जास्तीत जास्त लोकांना आवडतील अशा योजना मर्यादित काळात करणे. त्यापैकी एक लाडकी बहीण योजना. साडेचार वर्षांत त्यांना बहिणीची आठवण झाली नाही, आता झाली. हजारो भगिनींना महिना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय़ घेतला. माझ्या माहितीनुसार दोन कोटी तीस लाख भगिनींना ही रक्कम पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. याचा परिणाम काही तरी होणार. अजिबात होणार नाही असं मी म्हणणार नाही. मी एकदा प्रवासात असताना दहा-बारा महिला काम करत होत्या. तिथं गाडी थांबवली. त्यांना पैसे मिळालेत का विचारलं. बहुतेक मिळाले होते. म्हटलं मग खूश असाल. तर एक बाई म्हणाली, इकडून दिले आणि तिकडून काढून घेतले. तेलाचे दर वाढवले. अमक्याचे दर वाढवले. महागाईनं त्रासलोय. लाडकी बहीण याचं अर्थसहाय्य त्यांना मिळालं, पण त्याचं समाधान नव्हतं, हे चित्र बघायला मिळालं. अशा अनेक गोष्टी आहेत. सत्ता, शासकीय योजना आणि प्रचंड पैसा या तीन गोष्टींचा मारा करून लोकसभेचं जे मतांचं अंतर होतं ते विधानसभा निवडणुकीत कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन दिसतोय. आम्हाला अधिक कष्ट करावे लागतील, लोकांना वास्तव समजावून सांगावे लागेल. ही स्थिती सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यायावरून दिसतं की हे गांभीर्यानं जाणून घेण्याची त्यांची तयारी आहे.

प्रश्न : महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत मिळेल काय?

शरद पवार : मिळायला हरकत नाही. विदर्भात फार चांगली स्थिती आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी संघर्ष आहे. तिथं दुसरे प्रश्न निघाले, उदा. मराठा आरक्षण. ओबीसी आणि मराठा अंतर वाढवण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे त्यांनी त्यांचा अप्रोच बदलला. सुरुवातीला त्यांचा सगळा भर मराठा आरक्षणावर होता. मध्यंतरी त्यांचे विधान ऐकले की, मराठ्यांना आरक्षण द्याच. पण मुस्लिम, धनगर, लिंगायतांनाही द्या. इतर घटकांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्याचा परिणाम मला आमच्यासाठी अनुकूल दिसतोय. जाहीर सभांमधून प्रचंड उपस्थिती आणि प्रतिसाद हे चित्र मराठवाड्यात दिसतं. जळगावपासून सगळीकडं अभूतपूर्व सभा झाल्या. सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये थोडा संघर्ष आहे. मुंबई, ठाणे हा पट्टाही मोठा आहे. मला आणि उद्धव ठाकरेंना, तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी या सगळ्यांच्यासंदर्भात जनमानसात अनुकूल दृष्टिकोन दिसतो. तो मतांमध्ये परिवर्तित झाला तर राज्य हातात येईल, याची शंका वाटत नाही.

प्रश्न : अलीकडे शरद पवार आक्रमक झालेत. एकदम अँग्री ओल्ड मॅन म्हणून किंवा यंग मॅन. आंबेगाव, गडहिंग्लजमध्ये ते दिसले. यापूर्वी तुमचा असा आक्रमकपणा कधी पाहायला मिळाला नाही…

शरद पवार : आंबेगावला अनेक वर्षे जातोय. यावेळी आंबेगाव, खेड शिवापूर, जुन्नर किंवा गडहिंग्लजची सभा… या सगळ्या ठिकाणी लोकांची उपस्थिती प्रचंड. हजारोंच्या संख्येने लोक येताहेत, लोक रिॲक्ट होताहेत. एखादे शब्द. वाक्य काढले तर उठाव केल्याचं चित्र दिसतं. याआधी गप्प बसायचे. यावेळी लोक आक्रमक आहेत, त्यांना परिवर्तन हवंय. जी प्रस्थापित नेतेमंडळी, ज्यांना आम्ही अनेक वर्षे शक्ती दिली, ती मंडळी आता लोकांना मान्य नसावी. आताची त्यांच्यासंदर्भातील भूमिका घेतोय ते लोकांना पसंत पडतंय असं दिसतं. साहजिकच त्यांच्यासंदर्भात ॲग्रेसिव्ह लाईन घेतली तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

प्रश्न : म्हणजे पक्ष फोडल्याचा राग लोकांच्या मनात आहे तर..

शरद पवार : नक्कीच. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जाहीरपणे सांगताहेत, मी दोन पक्ष फोडून आलो. हे लोकांना आवडलं नाही. तुम्ही तुमची मतं मांडा. भूमिका मांडा. पण फोडोफोडीचं राजकारण लोकांना मान्य नाही. विधानसभेत त्यासंदर्भात घोषणा झाल्या. खोके वगैरे. त्या भूमिका लोकांपर्यंत गेल्या आणि त्यात, त्यांच्या पक्षबदलात अर्थकारण आहे ही भावना लोकांमध्ये गेली असावी. त्याची प्रतिक्रिया लोकांकडून ठिकठिकाणी येतेय. त्याची नोंद वक्त्यांनी घेतली तर प्रतिसाद मिळतो.

प्रश्न : लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा तुमचं नाव घेतल्याशिवाय होत नव्हती. भटकता आत्मा वगैरे विशेषणं लावली होती. आता मात्र ते तुमचं नावच घेत नाहीत. तुमचं काही ठरलंय की घाबरलेत?

शरद पवार : घाबरले वगैरे नाही. माझी माहिती अशी आहे, ती फार ऑथेंटिक आहे असं नाही. पण भाजपमधील दिल्लीतील लोकांशी बोलणं होत असतं. त्यांचं मत असं, की मागच्या निवडणुकीत त्यांनी मला टार्गेट केलं ते फायद्याचं झालं नाही. त्यामुळं यावेळी त्यांना असा सल्ला दिला की हे टाळा. आणि मीही मधे म्हटलं की त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, त्याचा आम्हाला फायदा होईल. त्याचीही नोंद त्यांनी घेतली असावी.

प्रश्न : महायुतीने प्रचाराची लाइन बदललेली दिसते. लाडकी बहीण, सरकारच्या योजना याऐवजी बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है अशा मुद्दयांवर आलेत. काय कारण असावं ?

शरद पवार :  तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भाषणं बारकाईनं बघा. त्यांनी या मोहिमेला कम्युनल लाईन देण्याचा प्रयत्न केला. व्होट जिहाद हा शब्द पहिल्यांदा वापरला. म्हणजे एक समाज, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर मतदान करतोय हा जिहाद. काही ठिकाणं असतात मोठ्या प्रमाणावर हिंदूंची लोकसंख्या आहे, प्रो बीजेपी मतदारही अधिक आहेत. ही वैचारिक भूमिका असेल, या विचारांचा स्वीकार केला असेल तर त्यांना धार्मिक रंग योग्य नाही. त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा. पण देवेंद्र फडणवीस धार्मिक अँगल आणून समाजात, जातीधर्मात अंतर वाढवून लाभ घेण्याचा प्रयत्न करताहेत. हे राज्याच्या दृष्टीने, सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे.

प्रश्न : तुम्ही साठ वर्षांत अनेक निवडणुका पाहिल्यात. यावेळी प्रचाराची पातळी प्रचंड खालावलीय. त्याकडं कसं बघता?

शरद पवार : याची सुरुवात कुठून झाली बघा. मी नेहरूंची, इंदिरा गांधींची, चव्हाण साहेबांची भाषणं ऐकली आहेत. मी काय करू इच्छितो, समाज कसा सुधारू शकतो याबद्दल ते बोलत. एखाद्या धोरणासंदर्भात मतभिन्नता व्यक्त होत होती, नाही असं नाही. पण आज वैयक्तिक हल्ले केले जातात. जात, धर्म, भाषा याचा वेगळ्या दृष्टीने उपयोग करून हल्ले करणे आणि जनमत कलूषित करणे याने उच्चांकी पातळी गाठलीय. याची सुरुवात पंतप्रधानांनी केली. स्वतः पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या प्रचाराच्या मोहिमेची दिशा बटेंगे तो कटेंगे आणि त्यावरून व्यक्तिगत हल्ले करत असतील तर काय होणार. पंतप्रधान ही एक संस्था आहे. तशीच विरोधी पक्षनेते हीसुद्धा संस्था आहे संसदीय लोकशाहीत. त्यांची प्रतिष्ठा राखली पाहिजे. पंतप्रधानांची त्यांच्याबाबतीतली भाषा योग्य नाही. वरून सुरुवात झाली तर ते खालपर्यंत येतं.

प्रश्न : बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचा निर्णय कौटुंबिक पातळीवर झाला की राजकीय पातळीवर?

शरद पवार : तो काम करत होता. सुप्रियाच्या निवडणुकीतही काम करत होता. शेवटी कुणीतरी उभं राहायला हवं होतं आणि लोकांची इच्छा होती युगेंद्रनं राहावं. दुसरा कुणी कार्यकर्ता पुढाकार घेईल तर चांगलं होईल, असं आम्ही पाहात होतो. पण ज्यांच्याविरुद्ध उभं राहायचं त्यांचा दबदबा असा आहे, की बाकी कुणी उभं राहायला धजावत नव्हतं. अशावेळी युगेंद्रने भूमिका घेतली. बाकी कुणी नसेल तर मी आहे. त्यातून त्याची उमेदवारी आली.

प्रश्न : त्यातून कौटुंबिक संबंध ताणले गेल्याचं दिसलं. दिवाळीला सगळे एकत्र येत दरवर्षी तसं चित्र यंदा दिसलं नाही.

शरद पवार : तसं काही नाही. सगळे होते. अजित आणि त्याची पत्नी दोघंच नव्हते.

प्रश्न : अजित पवार महायुतीसोबत असूनही भाजपच्या बटेंगे तो कटेंगे वगैरेच्या विरोधात भूमिका घेताहेत. त्यामुळे त्यांचा परतीचा रस्ता सुकर होईल, असे वाटते का?

शरद पवार : परतीचा रस्ता कुणाच्या मनात असेल असं वाटत नाही. भाजपच्या विचारधारेसमवेत कोण जात असेल तर त्यांचे आमचे जमणार नाही. याआधी निवडणुका भाजपच्या विरोधात लढवल्या. त्यांना काही जबाबदारी दिली, ती राष्ट्रवादीने दिली. जिथे विचारधारा वेगळी मांडली गेली, तिथं एकवाक्यतेचा संबंध नाही.

प्रश्न : ती विचारधारा सोडून ते वेगळे झाले तर?

शरद पवार : काही झालं तरी सत्ताधारी पक्षाला ते सोडतील, असं दिसत नाही.

प्रश्न : निकालानंतर महाराष्ट्रात काही वेगळी समीकरणे आकाराला येऊ शकतात का?

शरद पवार : आताची जी आघाडी युतीची रचना आहे, त्याच्यापलीकडं जायला स्कोप नाही. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं, की भाजप आणि सहकारी- एकनाथ शिंदे आणि अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांचा गट. हे सगळे एकत्र आहेत. एक भाजपला सोडून दुसरीकडं जाईल आणि त्याचं स्वागत होईल, अशी शक्यता नाही. निवडणुकीनंतर वेगळं चित्र होईल, असं  वाटत नाही. सत्ता महाविकास आघाडीच्या हाती येईल.

प्रश्न : निकालानंतर राज्यपालांच्या भूमिकेबाबत काही शंका वाटते का? कारण यापूर्वीचा राजभवनाचा अनुभव चांगला नाही. पक्षफुटीनंतरची न्यायपालिकेची भूमिकाही फारशी आशावादी नाही…

शरद पवार : मला तसं वाटत नाही. पण समजा तशी वेळ आलीच तर मेजॉरिटी हाऊसमध्ये पंधरा दिवसांत सिद्ध करावी लागेल. तशी शक्यता राज्यपाल पातळीवर अधिक आहे. न्यायपालिकेचं आताच सांगू शकत नाही. ऑथेंटिक माहिती नाही. केंद्रात ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी पदाचा गैरवापर करून घेतल्याचं दिसतं.

प्रश्न : साठ वर्षांच्या राजकारणात तुम्ही महाराष्ट्र पाहिला, त्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. अशा महाराष्ट्राचं भविष्यातलं चित्र तुम्हाला काय दिसतं?

शरद पवार : आजचा महाराष्ट्र अनेक क्षेत्रांत पीछेहाट झालेला दिसतो. यशवंतराव असताना जी उंची होती आणि नंतरही आम्ही ती अनेक वर्षे टिकवून ठेवली. अलीकडच्या काळात सत्ताधारी निर्णयांच्या संदर्भात तडजोडी करताना दिसताहेत. त्यामुळे महाराष्ट्र खाली गेला. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाच्या रँकिंगमध्ये एकेकाळी महाराष्ट्र एक नंबरला होता, तो काही म्हणतात आज सहाव्या क्रमांकावर गेलाय, काही म्हणतात अकराव्या क्रमांकावर गेलाय. सहाव्या क्रमांकावर म्हटलं तरी महाराष्ट्राची घसरण झालीय. अर्थकारणाची स्थिती चांगली नाही. शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र टॉपला आहे. दर दिवसाला स्त्रियांवरील अत्याचाराच्या किमान पाच तक्रारी येताहेत. याव्यतिरिक्त बेपत्ता होणा-या महिलांची संख्याही वाढत चाललीय. अशा गोष्टींकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असताना त्यांचा दृष्टिकोन सगळा राजकारणग्रस्त आहे. त्याची किंमत महाराष्ट्राला द्यावी लागते आहे. यातून महाराष्ट्र बाहेर काढूया. महाराष्ट्राला पूर्वीचे दिवस कसे येतील हे पाहूया. यशवंतरावांच्या काळात प्रशासन आणि राज्याची उंची होती, तिथं जाण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे आणि ती घेण्याची आमची तयारी आहे.

प्रश्न : महाराष्ट्राचे निर्णय़ घेण्याचे सर्वाधिकार बाहेरच्या मंडळींकडे आहेत. त्याचा फटका बसतोय का?

शरद पवार : वरून हस्तक्षेप होतोच आणि इथेही ज्यांना अधिकार आहेत, ते त्याचा उपयोग भल्यासाठी न करता जे राजकीय प्रश्न आहेत त्यासाठी करताना दिसतात.

ही मुलाखत दिनमान मराठी या युट्युब चॅनेलवर पाहू शकता.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ