कोल्हापूर; प्रतिनिधी : टोलची पावती फाडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळला. गृहराज्यमंत्री म्हणून तुमची कामगिरी शून्य होती. राज्यात तुमची सत्ता होती. कोल्हापूर महानगर पालिका तुमच्या ताब्यात होती, तरीही शहराचा विकास का झाला नाही. घोडेबाजारीत तुमचे हात बरबटले गेले. गळकी थेट पाईपलाईन जनतेच्या माथी मारली, शहराची हद्दवाढ झाली नाही, तुम्ही पालकमंत्री असताना शहरासाठी काय केले सांगा याचे उत्तर द्या मगच आमच्यावर बोला असा हल्लाबोल कसबा बावडा येथे झालेल्या प्रचार सभेत आमदार सतेज पाटील यांच्यावर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केला. (Rajesh Kshirsagar)
उतरेश्वर पेठ येथील प्रचारसभेत सतेज पाटील यांनी बॉडीगार्ड घेऊन फिरणार्या उमेदवारास मत देऊ नका, असे उद्गार काढले होते. त्याला क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी राज्य नियोजन मंडळाचा कार्यकारी उपाध्यक्ष आहे. शिष्टाचारानुसार मला शासकीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तुम्हीही मंत्री होता, तेव्हा तुम्हीही सुरक्षा व्यवस्थेत फिरत होतात. पदावरून पाय उतार झाल्यानंतरही तुम्ही बेकायदा पोलिसांचा ताफा घेवून फिरत होतात, हे लक्षात ठेवा. मगच माझ्यावर टीका करा. पद आणि चिन्ह गेल्याने तुम्ही सैरभैर झाला आहात.
“तुमच्यात दम नव्हता तर उभे कशाला राहिलात, मला सांगायचे होते. मी बघून घेतले असते,” असे बोलून सर्वांसमक्ष शाहू महाराज यांचा अपमान करणार्या व्यक्तीने आम्हाला धडे शिकवण्याची गरज नाही. कॉंग्रेसने दुसर्यांदा दिलेल्या उमेदवाराने माघार घेताच सतेज पाटील यांनी केलेला थयथयाट मतदारांनी पहिला आहे. सर्वसामान्य म्हणून दिलेला उमदेवार बदलण्याची वेळ कॉंग्रेसवर का आली, याचे उत्तर पाटील यांनी जनतेला द्यावे, असे आव्हान क्षीरसागर यांनी दिले.
या प्रचारफेरीस भाजपचे सचिव महेश जाधव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आदिल फरास, सत्यजित उर्फ नाना कदम, राहुल चिकोडे, राजदीप राजवर्धन, प्रदीप उलपे, शिवसेनेचे सुनील जाधव, विजय चव्हाण, रोहन उलपे, सचिन पाटील, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, कपिल पोवार, राकेश चव्हाण, धीरज जाधव, जय लाड आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.