नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, पुढील महिन्यात इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा असल्याने विराटने निवृत्तीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती बीसीसीआयने विराटला केली आहे. (Virat Retirement)
काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यापाठोपाठ विराटनेही निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्याने बीसीसीआयने त्याला फेरविचार करण्याची विनंती केली. रोहितच्या निवृत्तीमुळे इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. अशावेळी विराटसारख्या अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधाराचे संघात असणे हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. विराटने अद्याप बीसीसीआयच्या विनंतीला उत्तर दिलेले नाही. (Virat Retirement)
पुढील काही दिवसांमध्ये इंग्लंड दौऱ्याकरिता भारतीय संघ निवडण्यासाठी निवड समितीची बैठक होणार आहे. तत्पूर्वी, विराटला याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीस ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतल्यानंतरच विराटचा कसोटी निवृत्तीबाबतचा विचार सुरू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत विराटला एका शतकाचा अपवाद वगळता विशेष कामगिरी करता आली नव्हती. २०२४ साली खेळलेल्या १० कसोटी सामन्यांत त्याला २४.५२ च्या सरासरीने केवळ ४१७ धावा करता आल्या आहेत. २०२५ मधील एकमेव कसोटीतही विराट केवळ २३ धावा करू शकल्या. या पार्श्वभूमीवर विराटचा निवृत्तीचा निर्णय झाला असावा, असे मानले जाते. (Virat Retirement)
इंग्लंड दौऱ्यासाठी विराटने अगोदर कर्णधारपद सांभाळण्याची इच्छाही व्यक्त केल्याची चर्चा होती. तथापि, बीसीसीआय निवड समितीने त्याला नकार दिला. विराटच्या निवृत्तीच्या इच्छेमागे हा घटकही कारणीभूत आहे का, याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. विराटने कसोटी कारकिर्दीमध्ये १२३ सामन्यांत ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या असून त्यामध्ये ३० शतके व ३१ अर्धशतके आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यास २० जूनपासून सुरुवात होणार असून या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान पाच कसोटी रंगणार आहेत.