जमीर काझी : मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराडने आज पुण्यात राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) शरणागती पत्करली. मात्रतरी त्याबाबत विरोधक व नागरिकांचा संताप कमी झालेला नाही. गेली २२ दिवस पोलिसांना सापडत नसलेला आरोपी स्वतःच्या गाडीतून पोलिसांसमोर हजर होतो, हे महाराष्ट्र पोलिसांसाठी लाच्छंनास्पद आहे, असा अशी टीका विरोधकाकडून करण्यात येत असून कराडचा राजकीय गॉडफादर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावर ते ठाम राहिले आहेत.
मंत्री धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी कराड शरणागती पत्करतो हे संशयास्पद असल्याचा आरोप करीत कॉग्रेसने बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा तपास विद्यमान न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे. तर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड व युवराज संभाजीराजे यांनी कराड याला संतोष गायकवाड यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करून मोका अन्वये त्याच्यावर कारवाई करावी अशी जाहीरपणे मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंचांग पाहून कराडला शरणागती पत्करण्यास लावल्याचा टोला राज्य सरकारला लगावला आहे. दरम्यान ,बीडचे जिल्ह्यातील आमदार क्षीरसागर व सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी केली.
गेल्या २२ दिवसापासून फरारी असलेला वाल्मीक कराड हा स्वतः सीआयडीच्या मुख्यालयात शरणागती पत्करतो. त्यापूर्वी स्वतःचा व्हिडिओ सोशल व्हायरल करत त्याची माहिती देतो, हे महाराष्ट्र पोलिसांसाठी दुर्दैवी बाब असल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ते म्हणाले, ‘देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २२ दिवस पोलिस व सीआयडीला सापडला नाही. तो शरण आला हे पोलिस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पाहता या प्रकरणाचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, पोलीस व सीआयडी आजही सक्षम आहेत पण ते राजकीय दबावाखाली असल्याने त्यांचे मनोबल कमजोर होते. आरोपी शरण येतो पण त्याला पकडू शकत नाही ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत’. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? नागपूरमध्ये सात दिवसात सात खून झाले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व मीडियातून स्वतःचे कौतक थांबवावे असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशमुख हत्याकांडाबाबत सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून रोष व्यक्त होत असताना राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाही पोलिस कराड याला अटक करू शकले नाहीत. ही दुर्दैवी आहे. त्यामागे काय कारण असू शकते हे जनतेला समजले. देशमुख यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या सर्वांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे. वाल्मिक कराड ताब्यात आला. पण आका अजून बाहेरच आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा आरोप होतो आणि तपास पुढे जातो तेव्हा संबंधित मंत्री खुर्चीवरुन बाजूला होतो.
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया म्हणाल्या,’ ‘दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरतर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. कराडचा १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
हेही वाचा :