अमेरिकी शस्त्रास्त्रांचा काश्मीरमध्ये वापर

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे. दररोज चकमकीत दहशतवादी मारले जात आहेत; मात्र दहशतवाद्यांकडे सापडलेली शस्त्रे सुरक्षा दलांसाठी चिंतेचे कारण आहेत. अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम ४ रायफल सापडल्या आहेत. अफगाणिस्तान सोडताना अमेरिकन सैन्याने तिथे अशी शस्त्रे सोडली होती. आता ही शस्त्रे पाकिस्तानमार्गे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत आहेत.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ दहशतवाद्यांना अशी शस्त्रे पुरवते. त्यानंतर दहशतवादी शस्त्रे घेऊन भारतात घुसखोरी करतात. या रायफलमध्ये स्टीलच्या गोळ्या वापरल्या जातात. त्यामुळे जास्त नुकसान होते. ही शस्त्रे चिलखती वाहने आणि इमारतींमध्ये घुसण्यातही यशस्वी ठरतात. पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांकडे एके ४७ आणि एम ४ कार्बाइन असल्याचे याबाबतच्या अहवालात म्हटले आहे. ते सुरक्षा दलांचे मोठे नुकसान करतात. २०१७ मध्ये पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये एम४ रायफल सापडली होती. सुरक्षा दलांनी दहशतवादी तलहा रशीद मेहमूदला ठार केले, तेव्हा त्याच्याकडून एक रायफल सापडली. तो ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरचा पुतण्या होता. तेव्हापासून अनेक दहशतवादी घटनांमध्ये एम ४ गनचा वापर करण्यात आला आहे. कठुआ, रियासी आणि पुंछमध्येही दहशतवाद्यांनी या रायफलचा वापर केला.

नुकत्याच मिळालेल्या गुप्तचर अहवालानुसार, सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने अनेक दहशतवादी एकत्र येत आहेत. ते सातत्याने भारतात घुसखोरीचे प्रयत्न करत आहेत. बर्फवृष्टीचा फायदा घेत त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करायची आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या एका बैकीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांसह दहशतवादी संघटनांचे म्होरके उपस्थित होते, असे वृत्त आहे. यामध्ये दहशतवाद्यांना धोकादायक शस्त्रे दिल्याचीही चर्चा होती. एम ४ ही कार्बाइन ही एक हलकी, गॅसवर चालणारी रायफल आहे. त्यातून एका मिनिटात ७०० ते ८०० शॉट्स मारता येतात. त्याची श्रेणी ५०० ते ६०० मीटर आहे. बुलेट तीन किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करू शकते. त्यामुळेच ही धोकादायक रायफल सुरक्षा दलांसाठी चिंतेचा विषय आहे.

Related posts

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

आयफोन आता ‘देवा’चा झाला !