जमीर काझी : मुंबई : दसऱ्याला खरंतर सोने लुटायचे असते पण देशातील सत्ताधाऱ्यांनी लोकशाही व मतांची लुट चालवली आहे.त्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे देशातील जनता देशोधडीला लागत असल्याचे तरुणाईमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे आम्ही ‘रेजिम चेंज ‘करणारच असून तरुणाई देशातील सत्ता उलटवून लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा खणखणीत इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सत्ताधाऱ्यांना दिला. (Uddhav Thackeray issues a warning to the government at the Dussehra rally)
मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजिलेल्या दसरा मेळाव्यात त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार,केंद्र व राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला. फडणवीस यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी लॉरेन्स बिश्नोईला मुंबईत आणून दाखवावे असा आव्हान दिले. तर खासदार संजय राऊत यांनी लॉरेन्स बिस्नोई म्हणजे गृहमंत्री अमित शहाच आहेत, असा टोला लगावला.
दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने शिवसैनिक यांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले’ गद्दारांना तुमची खुर्ची टिकवण्यासाठी ५० कोटी रुपये देता आणि ज्यांच्यामुळे तुम्ही अन्न खाता, त्या शेतकऱ्यांना केवळ ५ हजार देतायेत. राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं होतं की, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपलं काहीही नुकसान झालं नाही. पण प्रत्यक्षात आपल्या ६ जवान शहीद झाले होते. देशासाठी धारातीर्थी पडलेल्या जवानांची बातमी आम्हाला वर्षभरानं मिळते, पण गद्दारांची बातमी क्षणाक्षणाला मिळते. असले हिंदुत्व आम्हाला अपेक्षित नाही. तुम्ही हिंदुत्व नासवत आहात, हिंदुत्वाला बदनाम करत आहात. आतापर्यंत तुम्ही घोटाळे करत आहात. १२ वर्षे तुम्ही विश्वगुरू म्हणून बसला आहात, तरीही तुम्हाला ‘हिंदू खतरे में है’ अशी आवई का उठवावी लागते? असा सवाल त्यांनी केला. (Uddhav Thackeray issues a warning to the government at the Dussehra rally)
उद्धव ठाकरे म्हणाले, दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची आणि खरेदी करण्याची आपली जुनी परंपरा आहे. सोने हे एका चांगल्या भावनेचं प्रतीक आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सोने खरेदी करू नका. आज देशात सोनं लुटणं तर दूर राहिलं, उलट संपूर्ण लोकशाहीच लुटली जात आहे. लोकांची मते चोरली जात आहेत.सत्ताधाऱ्यांकडून सर्व यंत्रणा लुटून झाल्यानंतर जनतेला साधी दाद मागण्याचीही सोय उरलेली नाही. न्यायालय, पोलीस, नोकरशाही आणि मुख्यमंत्री अशा सगळ्यांचे दरवाजे ठोठावून झालं, तरीही न्याय मिळत नाही. त्यामुळे एखादा नागरिक चिडून, संतापून स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो, तेव्हा हे सरकार त्याला थेट ‘नक्षलवादी’ किंवा ‘गुंड’ ठरविते.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बाबत बोलताना ते म्हणाले की,सुदैवाने टायगर श्रॉफ वाचला. पण वार वर्मी लागला असता, तर काय झालं असतं? कोणत्या पद्धतीने सरकार चालवता? संताप याच गोष्टीचा येतो की, पोलीस आणि इतर सर्व संस्थांनी सत्ताधाऱ्यांची धुणीभांडी करायची बाकी ठेवली आहेत. तुमच्या नाकाबंदी कशासाठी असतात? नवरात्र सुरू आहे. आमच्याकडे जरा काही खुट्ट झालं की लगेच पोलिसांत बोलावलं जातं. पण शस्त्रे घेऊन येणारे हल्लेखोर पोलिसांना दिसले नाहीत. हे हल्लेखोर शस्त्रे घेऊन आलेच कसे? घात झाला असता, तर कोणत्या तोंडाने टिमकी वाजवली असती? मुळात, हल्लेखोर शस्त्रे घेऊन आले, तेव्हाच त्यांना अडवायला पाहिजे होतं. पण कोणालाही कशाचं काही पडलेलं नाही.
राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च
खासदार संजय राऊत म्हणाले,’ राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. पण या जेन झीने एक रुपयाही खर्च न करता नरेंद्र मोदींना ‘छप्पन इंच का छोटा बंदर’ केलं. जेन झीच्या आंदोलनातील माझी आवडती गोष्ट म्हणजे एका मुलीने म्हटलं, ‘बाप की चड्डी फटी पड़ी है, घर में चूल्हा नहीं जल रहा और घर का बेटा मोदी-मोदी बोल रहा है.’
ते म्हणाले,’ ही बाळासाहेब ठाकरेंचा टिकाऊ माल आहे आणि विकाऊ माल तिकडे आहे. तिकडे काय आहे, तर अमित शाहांचा दांडिया आहे. ते तिथे दांडिया खेळत बसले असतील. विचार नाही, संघर्ष नाही. महाराष्ट्र, देश आणि स्वाभिमान यांबाबत कोणतीही भूमिका नाही. विचार आणि महाराष्ट्र धर्म इथे आहे. इथे प्रत्येकाच्या हातात बांबू आहे, तो कुठे जाईल, हे सांगता येणार नाही. लॉरेन्स बिश्नोई म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून अमित शाह हेच आहेत.या देशाचा गृहमंत्री, ज्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तोच एक माफिया आहे. लॉरेन्स बिश्नोईचं नाव आहे; पण या देशातील माफियांची टोळी कोणी चालवत असेल, तर तो गुजरातचा अमित शाह आहे. तोच लॉरेन्स बिश्नोई आहे. म्हणूनच आम्हाला रेजिम चेंज करायचा आहे. असे त्यांनी म्हटले.
बिश्नोई गँग राज्याच्या गृहमंत्रालयाची लायकी काढत आहे.
बिश्नोई गँग राज्याच्या गृहमंत्रालयाची लायकी काढत आहे. मुंबईत होणाऱ्या हल्ल्यांची बिश्नोई गँग खुलेआम जबाबदारी घेत आहे. आम्ही कालही हल्ला केला होता, आजही केला, काय केलं तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचं?बिश्नोई गँगचा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की लॉरेन्स बिश्नोई ज्या जेलमध्ये आहे, ती गुजरातमधील साबरमती जेल आहे. गुजरातमध्ये सत्ता कोणाची? भाजपाची. गुजरातच्या जेलमध्ये बसून लॉरेन्स बिश्नोई गँग चालवतोय, मग गृहमंत्री कुठे आहेत? अनमोल बिश्नोई तिहार जेलमध्ये आहे. या सगळ्या घटना घडल्या कुठे? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात सत्ता कोणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला (Uddhav Thackeray issues a warning to the government at the Dussehra rally)