Turkey : तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल

Turkey

नवी दिल्ली : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला असून तुर्कस्तानची अत्याधुनिक युद्धनौका कराची बंदरावर दाखल झाली आहे. काही दिवसापूर्वी तुर्कस्थानची हवाईदलाची कार्गो विमाने दारुगोळ्याचा मोठा साठा घेऊन पाकिस्तानात उतरल्याची माहिती पुढे आली आहे. तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताचा इन्कार केला होता. पण कार्गो विमानानंतर तुर्कस्थानची युद्धनौका कराची बंदरात दाखल झाल्याने तुर्कस्थान पाकिस्तानला युद्धाच्या तयारीसाठी मदत करत असल्याचा संशय बळावला आहे. (Turkey)

तुर्कीच्या नौदलातील टीसीजी बुयुकाडा ही युद्धनौका रविवारी कराची बंदरामध्ये दाखल झाली आहे. तुर्की नौदलाचे जहाज सद्भावना म्हणून कराचीमध्ये आल्याचे स्पष्टीकरण यावर पाकिस्तानच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. (Turkey)

तुर्कीची युद्धनौका कराची बंदरात पोहोचल्यावर पाकिस्तानकडून तुर्कीच्या नौदलाचं जंगी स्वागत करण्यात आले. तुर्की नौदल आणि पाकिस्तानी नौदलामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये युद्ध प्रशिक्षण, मदत, परस्पर सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कस्तानची युध्दनौकात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. या युद्धनौकेवर अँटी सबमरिन हेलिकॉप्टरसाठी डेक आणि अँटी शीप क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. तुर्कस्तानची युद्धनौका भारत आणि पाक या दोन देशात तणाव असताना ही युद्धनौका आत्ताच कराची बंदरात का दाखल झाली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कराची हे पाकिस्तानचे प्रमुख बंदर असून ते सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तानने तुर्कस्तानची अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली युद्धनौका मदतीसाठी बोलावली असावी असा तर्क लढवला जात आहे. (Turkey)

तुर्कस्तानने यापूर्वी पाकिस्तानामध्ये विमाने उतरवली होती. त्यातून पाकिस्तानला मोठा प्रमाणात दारुगोळा पाठवला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आम्ही पाकिस्तानला कोणताही दारुगोळा पाठवलेला नाही. आमचे विमान पाकिस्तानमध्ये केवळ इंधन भरण्यासाठी उतरले होते असे तुर्कस्तानने स्पष्ट केले आहे. लढाऊ विमानानंतर युद्धनौका पाठवून तुर्कस्तान पाकिस्तानला रसद जमवण्यासाठी मदत करत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. युद्धनौकेबाबत तुर्कस्तान काय स्पष्टीकरण देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Turkey)

Related posts

ठाकरे, पवारांच्या पंगतीला ममता बॅनर्जी येणार?

अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?

१५ लाख कोटींचा डोलारा, एलआयसी ला १६०० कोटींचा फटका