आरएमएस टायटॅनिक हे सागरी इतिहासातील सर्वांत चर्चेचा विषय ठरलेले जहाज आहे. त्याचे कारण टायटॅनिकचा अपघात हा जगातील विनाशकारी सागरी अपघातांपैकी एक मानला जातो. टायटॅनिक हे एक ब्रिटिश लक्झरी प्रवासी जहाज होते. त्याकाळी ‘‘हे जहाज बुडणार नाही,’’ असं मानलं जात होतं. पण पहिल्याच प्रवासात अपघात झाला आणि टायटॅनिक बुडालं. त्या अपघाताला १५ एप्रिलला ११३ वर्षे झाली. त्यानिमित्त कसं होतं हे जहाज…त्यात सुविधा काय होत्या..किती प्रवासी होते… त्या रात्री नेमकं काय घडलं… चूक कोणाची आणि जे घडलं ते टळू शकलं असतं का… याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (Titanic story)
- प्रतिनिधी
टायटॅनिक हे जहाज व्हाइट स्टार लाइन या कंपनीने बांधलं होतं. उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट इथल्या हार्लंड आणि वुल्फ शिपयार्डमध्ये टायटॅनिक तयार करण्यासाठी चार वर्षे लागली.
३१ मार्च १९०९ ला टायटॅनिक जहाजाचं बांधकाम सुरू झालं आणि ३१ मे १९११ ला पूर्ण झालं. त्याच्या बांधकामादरम्यान दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आणि २४६ जण जखमी झाले होते.(Titanic story)
हे जहाज त्याकाळी सर्वांत मोठे आणि आलिशान होते, ज्याची लांबी २६९ मीटर म्हणजे ८८२ फूट आणि वजन ५२ हजार ३१० टन होते.
अनेक परवानग्यांनंतर टायटॅनिकने आपला पहिला प्रवास दहा एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडच्या साउथॅम्प्टन येथून न्यूयॉर्क, अमेरिकेसाठी सुरू केला.
जहाजावर २२२४ प्रवासी आणि कर्मचारी होते. ज्यात अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींचा समावेश होता.
प्रवाशांचे तीन वर्ग
टायटॅनिकवर प्रवाशांमध्ये तीन वर्ग होते. जहाजाची मूळ क्षमता १०३४ (प्रथम वर्ग), ५१० (द्वितीय वर्ग) आणि १०२२ (तृतीय वर्ग) एवढी होती. प्रत्यक्षात प्रथम वर्गात ३२९ प्रवासी, द्वितिय वर्गात २८५ तर तृतीय वर्गात ७१० प्रवासी होते. प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती. तर तृतीय वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.
सगळं सुरळीत सुरू आहे, अशी शक्यता दिसतानाच ती रात्र आली. १४ एप्रिल १९१२ ला रात्री ११.४० वाजता, उत्तर अटलांटिक महासागरात टायटॅनिक एका हिमनगाला धडकले. खरंतर टायटॅनिकचा प्रचारच मुळी न बुडणारं जहाज असा केला होता. याचं कारण असं होतं की, अनेक तळघरं वॉटरटाईट भिंतींनी बांधली होती. तळघरांच्या दोन रांगांमध्ये पाणी भरलं तरी जहाज बुडणार नव्हतं.(Titanic story)
यात पूर टाळण्यासाठी सोळा वॉटरटाइट कंपार्टमेंट होती. त्यामुळे हे जहाज बुडणार नाही असा विश्वास निर्मात्यांना होता. पण हिमनगाशी टक्कर झाल्यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले. आणि वॉटरटाइट कंपार्टमेंटच्या अनेक भिंती नष्ट झाल्या.”
फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना प्राधान्य
टायटॅनिकवरील बऱ्याच जणांना घटनेचे गांभीर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची, त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतली. त्यामुळे सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पूर्णपणे न भरताच गेल्या. त्यामुळे केवळ ७०६ लोकांचेच प्राण वाचू शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण −२ °C इतके होते. ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटांत मृत्यू येतो.(Titanic story)
खरंतर जहाजाच्या डिझाइनमध्ये काही त्रुटी होत्या. उदाहरणार्थ, वॉटरटाइट कंपार्टमेंट्स पूर्णपणे प्रभावी नव्हते, लाइफबोट्सची संख्या अपुरी म्हणजे निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील एवढी होती. केवळ ११७८ लोकांना लाईफ बोट्स सामावून घेऊ शकत होत्या. जहाजावरील लोकांची संख्या दुप्पट, २२२४ होती. या त्रुटींमुळे हिमनगाला धडकल्यानंतर काही तासातच…. १५ एप्रिल १९१२ रोजी पहाटे २.२०वाजता जहाज पूर्णपणे बुडाले.
या दुर्घटनेत १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ज्यामुळे ही सागरी इतिहासातील सर्वात मोठी आपत्ती ठरली.
बचावकार्यासाठी RMS कार्पेथिया हे जहाज मदतीला आले, ज्याने सातशेहून अधिक लोकांना वाचवले.
जहाज सुरक्षेसाठी नवे नियम
टायटॅनिकच्या दुर्घटनेमुळे जहाजांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू झाले. त्यातील ठळक म्हणजे पुरेशा लाइफबोट्सची व्यवस्था आणि२४-तास रेडिओ संपर्क.
टायटॅनिकची कथा आजही लोकांना आकर्षित करते, आणि त्यावर अनेक पुस्तके, चित्रपट आले. १९९७ चा जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘‘टायटॅनिक’’ हा चित्रपट जगभरात गाजला. इतर अनेक माहितीपटही बनले आहेत.
१९१२ मध्ये टायटॅनिक जहाज बुडाले आणि १०० वर्षांहून अधिक काळानंतरही त्याचे गूढ कायम आहे. इतक्या वर्षांनंतरही लोक त्याचा ढिगारा पाहण्यासाठी खोल समुद्रात जातायत. लोकांना आता जाणून घ्यायचे आहे की त्या जहाजात काय होते.(Titanic story)
अपघात टाळता आला असता का?
आता विषय हा अपघाताचा… हा अपघात टाळता आला असता का…तर असं म्हटले जाते की, हिमखंड पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांनी ३० सेकंदांपूर्वी इंजिन उलटे करण्याचे आदेश दिले होते, परंतु हिमखंड टाळण्यासाठी हे पुरेसे नव्हते. जर हिमखंड आणखी ३० सेकंद आधी दिसला असता तर कदाचित टायटॅनिक बुडण्यापासून वाचू शकले असते.
चार दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार, १४ एप्रिल दुपारी १३.४५ ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळणाऱ्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहनाची प्रमुख कामगिरी असल्याने हा संदेश त्यांनी गांभीर्याने घेतले नाही.(Titanic story)
दुर्बिणीचा अभाव
दुसरं म्हणजे दुर्बिणीचा अभाव हे देखील त्याच्या अपघाताचे कारण सांगितले जाते.
क्रू मेंबर्सकडे दुर्बिणी नव्हती. असे सांगितले जाते की, ज्या लॉकरमध्ये दुर्बिणी ठेवली त्याची चावी हरवली होती. अन्यथा दुर्बिणीच्या मदतीने हिमखंड लवकर दिसला असता.
त्यामुळे या अपघातात मानवी निष्काळजीपणा किती कारणीभूत हा ही एक चर्चेचा विषय.
हे जहाज इतके शक्तिशाली होते की त्याचा आवाज १६ किमीपर्यंत ऐकू येत होता.
जहाज हळूहळू बुडत होतं.. पण जहाज बुडल्याची बातमी ऐकूनही, संगीतकारांनी गाणी वाजवणे सुरूच ठेवले. मरणाच्या वाटेवरचे लोक त्यांचे शेवटचे काही क्षण आनंदाने घालवू शकतील, हे त्यामागचे कारण होते.(Titanic story)
टायटॅनिकची भव्यता
टायटॅनिक बाहेरून जेवढे भव्य होते तेवढेच आतून देखील होते. त्यात भव्य जिना, लोखंडी आणि काचेच्या घुमटाचे छप्पर, ओक पॅनेलिंग होते. शंभर फूट लांब प्रथम श्रेणीचा डायनिंग हॉल होता. हे स्थान जहाजाच्या मध्यभागी होते. खोलीला शिसे असलेल्या खिडक्या, जेकोबीन शैलीतील अल्कोव्ह होते. प्रवाशांना जेवणासोबत उत्तम वाइनची निवड करण्याची विशेष सुविधा होती. प्रथम श्रेणीतील प्रवाशांसाठी आ ला कार्टे रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बुकींग करण्याची सुविधा होती. लहान टेबल क्रिस्टल दिव्यांनी प्रकाशित करण्यात आले होते.(Titanic story)
टायटॅनिक जहाजाच्या आतल्या भागाची रचना आणि सुविधा अत्यंत आलिशान आणि आधुनिक होती. जहाजावर विविध श्रेणीचे निवासस्थान, सार्वजनिक क्षेत्र, आणि मनोरंजन सुविधा होत्या. प्रथम श्रेणीतील प्रवाशांसाठी अत्यंत आरामदायी आणि उत्कृष्ट सुविधा होत्या, तर इतर श्रेणीतील प्रवाशांसाठी देखील उत्तम व्यवस्था होती.
जहाजाच्या प्रथम श्रेणीमध्ये उत्कृष्ट निवास व्यवस्था होती, जिथे आरामदायी केबिन, भव्य जिने, आणि मनोरंजनासाठी विविध सुविधा होत्या. स्विमिंग पूल, टर्किश बाथ, स्क्वॅश कोर्ट, व्यायामशाळा, सलून सुद्धा होते.
टायटॅनिकबद्दल आजही कुतूहल
टायटॅनिक बद्दल आजही कुतूहल आहे. समुद्राच्या तळाशी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटन सुरु झालंय.
टायटन पाणबुडी ही अशीच एक पाणबुडी होती, जी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रात गेली होती. ही पाणबुडी स्फोट होऊन त्यात असलेले पाचही प्रवासी मृत्युमुखी पडले, ज्यामुळे ही दुर्घटना जगभर प्रसिद्ध झाली. खरंतर टायटॅनिक हे फक्त एक जहाज नसून ती एक दंतकथा बनली आहे.
हेही वाचा :
चोक्सीला आणायचे आहे की त्यालाच यायचे आहे?
पाच लुटेरे…