‘लाडकी बहीण’चा हप्ता अधिवेशनानंतर जमा, सर्व आश्वासने पूर्ण करणार

नागपूर; विशेष प्रतिनिधी : राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. ईव्हीएम मशीनबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपाचे पुराव्यानिशी खंडन केले. मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्र भेदता येते, असे टोला लगावला. तसेच महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १ जुलै २०२२ पासून ३ लाख ४८ हजार ७० कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. यामुळे २ लाख १३ हजार २६७ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे, असा दावा त्यांनी केला. राज्यात वसुलीबाजांना थारा दिला नाही तर राज्याच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. अशा वसुलीबाजांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा संविधानानुसार दिला. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी मिळणार आहे. तसेच विद्वानांना दोन पुरस्कार मिळणार आहेत. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांसह आपण आपली भाषा रूजविणार आहोत. आता न्यायालयाचे निवाडे मराठीत उपलब्ध करण्यास सुरूवात होणार असल्याचेही फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. (CM Devendra Fadnavis)

राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या अडीच वर्षात १६७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे २५.२१ लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखील येणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे. वैनगंगा-नळगंगा, नारपार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे असे नदी जोडप्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे, असे ते म्हणाले.

पालघर येथे ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर उभारण्यात येत आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठे आहे. राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात वाढवण बंदरचे मोठे योगदान राहणार आहे. अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (CM Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची दिशा स्पष्ट करताना, महाराष्ट्र आता थांबणार नाही. सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशा शब्दांत भूमिका मांडली.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ