मुंबई; प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. यातील बहुतेक एक्झिट पोलमध्ये, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तथापि, महायुती आणि मविआच्या नेत्यांकडून मात्र विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. किंबहुना, आमचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वासही व्यक्त केला जात आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एक्झिट पोल काहीही सांगत असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल. तेही काँग्रेसच्या नेतृत्वात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने प्रचारादरम्यान ‘व्होट जिहाद,’ अशी टीका करत होते, मग ब्राह्मणांनी भाजपाला मतदान केले तर आम्ही काय त्याला ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचे का? असा सवालही पटोलेंनी केला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा निश्चित मिळतील, असे भाकीतही त्यांनी केले. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा पराभव निश्चित होणार असून, आम्ही आणि आमचे सर्व मित्रपक्ष बहुमताचा आकडा पार करणार आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ठाकरे गटाचे प्रवक्ते अंबादास दानवे यांनीही असाच विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही तळागाळातील माणसाशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे मविआला पूर्ण बहुमत मिळेल. जनतेने विद्यमान सरकारविरोधात उठाव केला आहे. त्यामुळे सर्वेक्षणातून काहीही येवो, आघाडीला पूर्ण बहुमत मिळणारच आणि महायुतीचा सुपडासाफ होणारच असे, दानवे यांनी म्हटले आहे.
महायुतीच्या नेत्यांनीही आमचेच सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. एक्झिट पोल म्हणतात त्यानुसार महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रातील एकूण चित्र पाहता महायुतीचेच सरकार येईल, असे स्पष्ट दिसत आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
सामान्य जनतेसाठी महायुतीचे सरकार सत्तेवर यावे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. साईबाबांनी मला प्रत्येक गोष्ट दिली. सामान्य जनतेसाठी आम्ही पुन्हा सत्तेत यावे, अशी भूमिका केसरकर यांनी बोलून दाखवली.
एक्झिट पोल काहीही येवोत, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल. तेही काँग्रेसच्या नेतृत्वात येणार आहे.
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रातील एकूण चित्र पाहता महायुतीचेच सरकार येईल, असे स्पष्ट दिसत आहे.
छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस