ग्लास्गो : नेदरलँड्स आणि नेपाळ यांच्यातील मंगळवारी रंगलेला टी-२० क्रिकेट सामना विशेष ठरला. या सामन्यात निर्धारित २० षटकांअखेर दोन्ही संघांची धावसंख्या समान असल्यामुळे नियमानुसार सुपर-ओव्हरचा अवलंब करण्यात आला. परंतु, दोन सुपर-ओव्हरनंतरही बरोबरीत राहिलेला हा सामना अखेर तिसऱ्या सुपर-ओव्हरमध्ये नेदरलँड्सने जिंकला. तीन सुपर-ओव्हर खेळवण्यात आलेला हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच सामना ठरला. (Super overs)
स्कॉटलंडमध्ये ही तिरंगी टी-२० स्पर्धा सुरू आहे. या सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या. नेदरलँड्सकडून तेजा निदामानारूने ३५, तर विक्रमजीत सिंगने ३० धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल नेपाळलाही २० षटकांत ८ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारता आली. अखेरच्या षटकात नेपाळला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. मात्र, संदीप लामिशेन आणि नंदन यादव यांना या षटकात १५ धावाच करता आल्या. (Super overs)
त्यानंतर, पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळने पाच चेंडूंमध्येच १९ धावा फटकावल्या. शेवटच्या चेंडूवर नेपाळचा कुशल भुर्तेल बाद झाला. नेदरलँड्सला विजयासाठी २० धावा हव्या असताना नेदरलँड्सने सुरुवातीच्या चार चेंडूंमध्ये ९ धावा केल्या होत्या. अखेरच्या दोन चेंडूवर नेदरलँड्सच्या ऑडॉडने अनुक्रमे षटकार व चौकार मारून संघाला १९ धावांपर्यंत पोहोचवले. पुन्हा दोन्ही संघांमध्ये धावांची बरोबरी झाल्याने दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यावेळी नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना १ बाद १७ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना नेपाळने सुरुवातीच्या तीन चेंडूंमध्ये ११ धावा फटकावल्या होत्या. मात्र, त्यानंतरचे दोन चेंडू निर्धाव गेले. अखेरच्या चेंडूवर आयरीने षटकार खेचून पुन्हा नेपाळला धावांची बरोबरी साधून दिली. (Super overs)
तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळने प्रथम फलंदाजी करताना एकही धाव न करता चार चेंडूंमध्ये दोन विकेट गमावल्या. त्यामुळे, नेदरलँड्सला विजयासाठी एकच धाव आवश्यक होती. यावेळी, पहिल्याच चेंडूवर लेव्हिटने षटकार खेचत नेदरलँड्सचा विजय साकारला. याअगोदर, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील जानेवारी, २०२४ मध्ये झालेल्या टी-२० सामना दोन सुपरओव्हरपर्यंत रंगला होता. हा सामना भारताने दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये जिंकला होता.
संक्षिप्त धावफलक : नेदरलँड्स – २० षटकांत ७ बाद १५२ (विक्रमजीत सिंग ३०, तेजा निदामानुरू ३५, साकिब झुल्फिकार नाबाद २५, संदीप लामिछाने ३-१८, नंदन यादव २-१८) टाय विरुद्ध नेपाळ – २० षटकांत ८ बाद १५२ (रोहित पौडेल ४८, कुशल भुर्तेल ३४, रूपेश सिंह १९, डॅनिएल डोराम ३-१४, विक्रमजीत सिंग २-३०).
हेही वाचा :
स्मृती मानधना पुन्हा अग्रस्थानी
गंभीर इंग्लंडला परतणार