रे क्षणांच्या संगतीने….

  • विजय चोरमारे

साल होतं २००८. महिना होता एप्रिल. १३ तारखेला संगीतकार दशरथ पुजारी यांचं निधन झालं. त्यावेळी मी मुंबईत लोकमतमध्ये चीफ रिपोर्टर होतो. कोल्हापूरहून मुंबईत येऊन महिनाच झाला होता. सोमवारी १४ तारखेला अपर्णा वेलणकर यांचा फोन आला. त्या लोकमतच्या रविवार पुरवणीचं काम बघायच्या. म्हणाल्या, सुमन कल्याणपूर भेटतात का बघता का? त्यांनी दशरथ पुजारी यांच्या आठवणी सांगितल्या तर रविवारसाठी घेता येतील. (Suman Kalyanpur passes away)

त्यांनी आपल्याकडचा एक नंबरही दिला, म्हणाल्या, हा माझ्याकडे असलेला त्यांचा नंबर आहे. बदलला असेल तर तुम्ही मिळवा. ठीक आहे म्हटलं.

त्यांनी दिलेल्या लँडलाइन नंबरवर फोन केला, तर तोच नंबर होता. सुमनताईंनीच पलीकडं फोन उचलला.

त्यांना माझी ओळख सांगितली. म्हटलं, दशरथ पुजारी यांच्या आठवणी तुम्ही सांगाव्यात.

त्यांना काही त्यात रस दिसेना. फार तुटकपणे म्हणाल्या, अशा सांगण्याजोग्या आठवणी काही नाहीत माझ्याकडं.

म्हटलं, इतकी गाणी गायलीत तुम्ही त्यांच्याकडं त्यासंदर्भानं काही आठवणी असतील.

त्यांना काही कंटेंट गवसत नसावा. त्यामुळं त्यांचा प्रतिसाद थंडच होता. (Suman Kalyanpur passes away)

मी अत्यंत आदरपूर्वक विनंती करीत होतो. बघा प्रयत्न करून. आठवतील. तुम्ही नाही सांगितल्या तर कोण सांगणार त्या उपेक्षित संगीतकाराबद्दल. वगैरे वगैरे. माझे प्रयत्न सुरू होते.

माझी चिकाटी पाहून त्या म्हणाल्या, उद्या दुपारी या. तीनची वगैरे वेळ होती. घरचा पत्ता फोनवरच सांगितला, तो मी लिहून घेतला. खारचा पत्ता होता.

मला खार एरियाबद्दल माहीत नव्हतं. मागं एकदा कधीतरी खारदांड्याला गेलो होतो. त्यामुळं तसा एरिया असेल असं वाटलं.

सुमन कल्याणपूर यांनी गाणं थांबवलं होतं. मंगेशकर भगिनींच्या राजकारणामुळं त्यांची उपेक्षा झाली, वगैरे कानावर होतं.

दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. फ्लॅटची बेल वाजवली. कुणीतरी दरवाज उघडला. मी एका एका लॅव्हिश अपार्टमेंटमध्ये पोहोचलो होतो.. तोपर्यंत एवढं उंची घर मी पाहिलं नव्हतं.

जाऊन बसलो. पाणी आलं. काही मिनिटांतच सुमनताई आल्या. थक्क होऊन पाहात राहिलो.

मी एका उपेक्षित गायिकेला भेटायला गेलो होतो, त्यामुळं तशा अनुषंगानं काहीएक प्रतिमा मनात होती. त्या प्रतिमेला छेद देणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.

एखाद्या राजघराण्यात शोभावं असं रुबाबदार व्यक्तिमत्त्व. खानदानी सौंदर्य. वात्सल्यमूर्ती वाटावं असं व्यक्तिमत्त्व.  

मंद हसल्या. मी उठून नमस्कार केला.

म्हणाल्या, तुमचा फोन आला तेव्हा खरंच मी ब्लँक होते, काय सांगावं असा प्रश्न होता.

मी बोलणं सुरू ठेवण्यासाठी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, सांगीतिक प्रवास अशा गोष्टी विचारू लागलो. त्याही मोकळेपणानं सांगू लागल्या. काहीवेळ गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं. म्हणाल्या, आपण दशरथ पुजारींबद्दल बोलणार आहोत ना, मग ही बायोग्राफिकल चर्चा कशासाठी?

म्हटलं, सहज माझ्या माहितीसाठी.

त्यानंतर मग दशरथ पुजारींचा विषय निघाला. (Suman Kalyanpur passes away)

एका खुर्चीवर मी बसलोय. समोर टी पॉय आहे. आणि समोरच्या खुर्चीवर सुमनताई. त्या बोलताहेत, मी कागदावर लिहून घेतोय.

तो काळ होता एचएमव्हीचा. १९५५-५६ चा सुमार असावा. मराठी भावसंगीताला बहराचा काळ होता. एचएमव्हीकडंच सगळी कामं व्हायची. एका रेकॉर्डवर दोनच गाणी असायची. एका आर्टिस्टला एका वर्षात दोनच गाणी करता यायची. एचएमव्हीच्या जी. एन. जोशी यांनी दशरथ पुजारींची सुमनताईंशी ओळख करून दिली आणि सांगितलं, यांची गाणी ऐका. आवडतात का बघा. पहिलं गाणं होतं, ‘सावळ्या विठ्ठला’ आणि दुसरं ‘नंदाघरी नंदनवन फुलले’.

सुमनताईंनी विठ्ठलाचं गाणं म्हणून ‘सावळ्या विठ्ठला’ पहिल्यांदा निवडलं. दोन्ही गाणी रेकॉर्डिंग झाली. आज पंचाहत्तर वर्षांनंतरही ही गाणी ऐकवली जातात. या गाण्यांचं यश हे दशरथ पुजारी यांच्या संगीताचं असल्याचं त्यांनी त्यावेळी कृतज्ञतापूर्वक सांगितलं होतं.

पहिली दोन्ही गाणी लोकप्रिय झाल्यामुळं पुढच्या वर्षी सुमनताईंनी पुजारींचीच गाणी निवडली. यावेळी त्यांना चार गाणी ऐकवली. त्यातली दोन गाणी निवडली आणि उरलेली दोन गाणी पुढच्या वर्षीसाठी ठेवली. (Suman Kalyanpur passes away)

दशरथ पुजारी यांच्या आठवणी सांगताना सुमनताई खूप हळव्या झाल्या होत्या. बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या जुन्या काळात हरवत गेल्या. आठवणींना उजाळा देता देताच दशऱथ पुजारींच्या गाण्यांची एक मैफल आकाराला आली.

महान गायिका सुमनताई कल्याणकर. बोलताहेत. गाणे आठवले की ते गाताहेत.

आणि समोर मी एकटा श्रोता.

झिमझिम झरती श्रावणधारा (रिमझिम नव्हे) या गाण्याची आठवण भन्नाट होती. त्यावर्षी मुंबईत जून संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. प्रचंड उकाडा जाणवत होता. झिमझिम झरती श्रावणधारा या गाण्याचं रेकॉर्डिंग संपलं. स्टुडिओच्या खिडक्या उघडल्या. दशऱथ पुजारी वारा घ्यायला खिडकीजवळ गेले तर काय आश्चर्य, बाहेर पाऊस सुरू झाला होता. तिथं असलेले सगळे सरसरून शहारले. तिथं असलेल्या साथीदारांपैकी एक होते हरिप्रसाद चौरासिया. ते म्हणाले, बघा तुमच्या गाण्यात किती ताकद आहे. गाणं पुरं झालं आणि पाऊस सुरू झाला.

ते गाणं आजही मराठी रसिकांना चिंब अनुभव देतं.

सुमनताई गाऊ लागतात, झिमझिम झरती श्रावणधारा.

बाहेर रणरणतं ऊन. आणि मी सुमनताईंच्या स्वरांमध्ये चिंब.

आठवणींना उजाळा देता देताच काही छान जमलेल्या गाण्यांविषयी त्या सांगत. तुम्हाला ते गाणं आठवतंय का – `मृदुल करांनी छेडित तारा…` असं म्हणून त्या लगेच ते गाणं गायला लागत.

कवीचे शब्द वाचून संगीतकाराला चाल सुचली पाहिजे. शब्द साधे आणि चाल चांगली असेल तर त्याचं स्वरुपच बदलून जातं. हे सांगताना त्या गायला लागतात –

`नकळत सारे घडले

मी वळता पाऊल पडले..`.

आणखी एका गाण्याचं वैशिष्ट्य त्यांना विशेष भावलेलं –

`प्रीतसागरी तुझ्या स्मृतीचे

गर्जत आले वारे वादळ वारे`

शब्द साधेच आहेत. प्रीतीचा सागर आहे. आठवणींचे वादळ वारे आहेत. आणि ते गर्जत आले आहेत. आणि हे गाणं एक गायिका गाणार आहे. तिचा नाजूक आवाज या सगळ्याचं भान आवश्यक होतं. इथं एखाद्या संगीतकाराला खूप काही कारागिरी करता आली असती. पण दशरथ पुजारी कसल्याही कारागिरीच्या मोहात पडले नाहीत. त्यांनी शब्दांना अशी काही चाल लावली की बस्स….. सुमनताई दशरथ पुजारी यांचं वैशिष्ट्य सांगता सांगताच ते गाणं गाऊ लागतात. (Suman Kalyanpur passes away)

त्या एकेका गाण्यात शिरू लागल्या. चालींसह. दशरथ पुजारींनी बांधलेल्या सुरावटींसह ती गाणी त्यांच्या ओठांवर यायला लागली.

`देव माझा विठू सावळा`

`हे नयन बोलले काहीतरी`

`आकाश पांघरूनि जग शांत झोपलेले`

`आईस देव माना,वंदा गुरुजनांना`

`या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार`

`या झोपल्या जगात नाही कुणीच जागे`

`हसण्याचे बहु मोल उमगले आसू ढळताना`

`जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे`

अशा गाण्यांच्या चालींची वैशिष्ट्ये त्यांनी उलगडून दाखवली. या सगळ्या गाण्यांचे मुखडे, एकेक कडवे गाऊन दाखवले.

सुमारे दीडेक तासांची ही मैफल होती. त्या गात होत्या तेव्हा राहून राहून वाटत होतं, यांनी गाणं का थांबवलं असेल?

`रे क्षणांच्या संगतीने मी अशी भारावले`, हे सुमनताईंनी गायिलेलं गीत अजरामर आहे. माझी अवस्था अगदी तशीच झाली होती.

आयुष्यातले काही मोजके दिवस कुणी निवडायला सांगितलं तर सुमनताईंची मैफल अनुभवलेला हा दिवस मी प्राधान्यानं निवडेन.

त्यावेळी सगळं कागदावर टिपून घेणं होतं. ना रेकॉर्डिंग होतं. ना व्हिडिओ शूटिंग. ना स्मार्टफोन. ना फोटो. त्यामुळं या मैफिलीचा मानकरी फक्त आणि फक्त मी एकटाच होतो.

सुमनताई गेल्या आणि या मैफलीची झिमझिम मनात सुरू झाली.

Related posts

पंडित नेहरू आणि गुरुदत्तः संवेदनशील भारताच्या कल्पनेचे ओझे वाहणारे द्रष्टे

बशीर बद्र यांनी बकरीदच्या दिवशी स्वतःलाच कुर्बान केले

लोकशाही टिकवण्यासाठी टोकाचा संघर्ष करावाच लागेल