म्युनिच : भारताची नेमबाज सिफत कौर सामराने आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे पदक आहे. (Sift kaur Samra)
जर्मनीतील म्युनिच येथे ही स्पर्धा सुरू आहे. ५० मी. रायफल थ्री पोझिशनमध्ये सिफत प्राथमिक फेरीत दुसऱ्या स्थानावर होती. तिने निलिंगमध्ये १९७, प्रोनमध्ये १९९ आणि स्टँडिंमध्ये १९६ असे एकूण ५९२ गुण मिळवले. फ्रान्सची कॅमिली गिरार्ड ५९२ गुण मिळवून अग्रस्थानी राहिली. दोघींचे गुण समान असले, तरी कॅमिलीने ३४ वेळा अचूक लक्ष्यवेध घेतल्याने ती पहिल्या, तर सिफत २९ अचूक लक्ष्यवेधामुळे दुसऱ्या स्थानावर राहिली. (Sift kaur Samra)
अंतिम फेरीत सिफतने निलिंग राउंडअखेर १५२.९, तर प्रोन राउंडअखेर ३०९.५ गुण मिळवले होते. स्टँडिंगच्या एलिमिनेशन फेरीत चौथ्या राउंडपर्यंत सिफत सुवर्ण व रौप्यपदकाच्या शर्यतीत होती. मात्र, चौथ्या राउंडअखेर तिचे ४५३.१ गुण झाल्यामुळे तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. नॉर्वेची जेनेट हेग ड्युस्टाड ४६६.९ गुणांसह सुवर्णपदकाची मानकरी ठरली. स्वित्झर्लँडच्या एमेली जॅगीने ४६४.८ गुणांसह रौप्यपदकावर नाव कोरले. प्राथमिक फेरीत अग्रस्थानी असणारी कॅमिली ४१५.८ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिली. (Sift kaur Samra)
दरम्यान, भारताची ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनू भाकेर महिलांच्या २५ मी. रॅपिड फायर पिस्टल गटात अंतिम फेरीमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. प्राथमिक फेरीमध्ये मनू ५८८ गुण मिळवून पाचव्या स्थानी राहिली होती. या प्रकारातून अंतिम फेरी गाठणारी ती भारताची एकमेव नेमबाज होती. भारताची एशा सिंह ५८५ गुणांसह अकराव्या स्थानी राहिल्याने अंतिम फेरी गाठू शकली नाही. अंतिम फेरीत मात्र मनूला सहा राउंडअखेर २० गुण मिळवता आले. चीनच्या युजिए सूनने ३८ गुणांसह सुवर्ण, तर दक्षिण कोरियाच्या येजिन ओहने ३६ गुणांसह रौप्यपदक पटकावले. कोरियाच्याच जिन यँग ३२ गुणांसह ब्राँझपदक विजेती ठरली. (Sift kaur Samra)
हेही वाचा :
स्मिथ, वेबस्टरने ऑस्ट्रेलियाला सावरले