शिवाजी विद्यापीठाचा ‘नॅसकॉम’समवेत सामंजस्य करार

कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज् अर्थात ‘नॅसकॉम’चे आयटी सेक्टर स्किल्स कौन्सिल यांच्यामध्ये शुकवारी ४ रोजी कॉर्पोरेट कॅम्पस कनेक्टसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यापीठामध्ये माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य शिक्षण मिळेल, त्याचप्रमाणे आयटी उद्योगालाही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला. (Shivaji University)

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि नॅसकॉमचे वरिष्ठ संचालक डॉ. चेतन सामंत यांनी स्वाक्षरी केल्या. या करारामुळे नॅसकॉममार्फत फ्युचर स्किल प्रोग्रॅमच्या माध्यमातून तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नॅसकॉमकडून डेटा टेक लॅब (पुणे), टुडीप टेकनॉलॉजिज् (पुणे) आणि व्हिक्रेटेक कन्सल्टिंग (पुणे) या तीन कंपन्यांच्या मार्फत अधिविभागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त कौशल्ये आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचे चे प्रशिक्षण मोफत मिळेल. औद्योगिक क्षेत्राला पूरक शिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना या कंपन्यांच्या मार्फतही राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. या करारामुळे भविष्यात तंत्रज्ञान अधिविभागामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स या संदर्भातील सेंटर ऑफ एक्सलेन्स स्थापन करण्यासाठीही नॅसकॉमच्या तज्ज्ञांचे सहाय्य उपलब्ध होईल.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या कराराचे स्वागत करताना सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ऑन जॉब प्रशिक्षणाचा समावेश आहेच. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना करारबद्ध कंपन्यांमध्ये चांगले प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. त्यातून कृषी, आरोग्य, ऊर्जा या क्षेत्रांतील शाश्वत विकासाच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा विज्ञान यांचा उपयुक्त वापर करण्याची दिशा लाभेल.यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना थेट उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढून ते अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करण्यास सिद्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. (Shivaji University)

स्वागत व प्रास्ताविक तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली यांनी केले. यावेळी नॅसकॉमचे उपसंचालक सौरभ मिश्रा व रोहित प्रसाद यांच्यासह डेटा टेक लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित अंदरे, व्हिक्रेटेक कन्सल्टिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक राठी, टुडीप टेकनॉलॉजिजचे कृष्णकुमार व्दिवेदी आणि निलेश ढपले उपस्थित होते. अधिविभागाच्या प्रशिक्षण व रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ.गणेश पाटील, डॉ. चेतन आवटी, अमर डुम, डॉ. श्यामकुमार चव्हाण, डॉ. रश्मी देशमुख आणि प्रवीण प्रभू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.a

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी